Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Joshua 6 >> 

1कारण आता इस्राएल सैन्याच्या भीतीमुळे यरीहोची सर्व प्रवेशद्वारे मजबूत लावून घेण्यात आली होती; कोणी बाहेर गेला नाही की आत आला नाही.

2देव यहोशवाला म्हणाला, पाहा, यरीहो, त्याचा राजा व त्याचे कसलेले योध्दे मी तुझ्या हाती दिले आहेत.

3तुम्ही सगळे योद्धे या नगरासभोवती एक प्रदक्षिणा घाला. असे सहा दिवस करा.

4सात याजकांनी एडक्याच्या शिंगाचे सात कर्णे घेऊन कोशापुढे चालावे; सातव्या दिवशी तुम्ही नगराला सात प्रदक्षिणा घालाव्या आणि याजकानी कर्णे वाजवावे,

5नंतर ते एडक्याच्या शिंगाच्या कर्ण्यानी दीर्घनाद करतील आणि जेव्हा तुम्ही कर्ण्याचा आवाज ऐकाल तेव्हा सर्व लोकांनी मोठा जयघोष करावा म्हणजे नगराच्या भींती जागच्या जागी कोसळतील; मग तुम्ही प्रत्येकाने सरळ आत चालून जावे.

6नंतर नुनाचा मुलगा यहोशवा याने याजकांना बोलावले आणि त्यांना म्हटले, कराराचा कोश उचलून घ्या आणि सात याजकांनी सात एडक्याच्या शिंगाचे कर्णे घेऊन परमेश्वराच्या कोशापुढे चालत जावे.

7तो लोकांना म्हणाला, चला, नगरला प्रदक्षिणा घाला, आणि सशस्र पुरुष परमेश्वराच्या कोशापुढे चालावेत.

8यहोशवाने लोकांना सांगितल्याप्रमाणे सात याजक परमेश्वर देवापुढे सात एडक्याच्या शिंगाचे कर्णे वाजवत चालले आणि परमेश्वराचा कराराचा कोश त्यांच्या मागोमाग निघाला.

9सशस्र लोक कर्णे वाजविणाऱ्या याजकांपुढे चालत होते आणि कर्ण्याची गर्जना होत असताना पाठीमागचे संरक्षक सैन्य कोशाच्या मागोमाग येत होते.

10मग यहोशवाने लोकांना अशी आज्ञा केली की, मी तुम्हांला सांगेपर्यंत जयघोष करू नका, त्यांच्या कानी तुमचा आवाज जाऊ देऊ नका व तुम्ही आपल्या तोंडातून एक शब्दही काढू नका; मग मी सांगेन तेव्हाच जयघोष करा.

11या प्रकारे परमेश्वर देवाच्या कोशाची नगरासभोवती एक वेळ प्रदक्षिणा झाली. त्यानंतर त्यांनी छावणीत येऊन तेथे रात्री मुक्काम केला.

12यहोशवा भल्या पहाटेस उठला आणि याजकांनी परमेश्वराचा कोश उचलून घेतला.

13सात याजक एडक्याच्या शिंगाची कर्णे घेऊन परमेश्वराच्या कोशापुढे ती एकसारखी वाजवीत निघाले आणि सशस्त्र लोक त्यांच्यापुढे चालले; कर्णे वाजवली जात असताना पिछाडीचे लोक परमेश्वराच्या कोशामागे चालत होते.

14ते दुसऱ्या दिवशीही नगराला एक प्रदक्षिणा घालून छावणीत परत आले; असे त्यांनी सहा दिवस केले.

15सातव्या दिवशी अगदी पहाटेस उठून त्यांनी अशाच प्रकारे त्या नगरला सात प्रदक्षिणा घातल्या; त्या दिवशी मात्र त्यांनी त्या नगरला सात प्रदक्षिणा घातल्या.

16सातव्या वेळी याजक कर्णे वाजवीत असताना यहोशवा लोकांना म्हणाला, जयघोष करा, कारण परमेश्वराने हे नगर तुमच्या हाती दिले आहे;

17हे नगर व ह्यात जे काही असेल ते सर्व परमेश्वराला समर्पित करावे; मात्र राहाब वेश्येला आणि जे कोणी तिच्याबरोबर तिच्या घरी असतील त्यांना जिवंत ठेवावे, कारण आपण पाठवलेल्या जासुदांना तिने लपवून ठेवले होते.

18तुम्ही मात्र समर्पित वस्तूंपासून सर्वथा दूरच राहा; त्या समर्पित झाल्यावर त्यातली एखादी वस्तू तुम्ही घ्याल तर इस्राएलाच्या छावणीवर शाप आणाल व तिला संकटात पाडाल.

19पण सर्व सोने, रूपे आणि तांब्याची व लोखंडाची ही सर्व पात्रे परमेश्वराकरता पवित्र आहेत; ती परमेश्वराच्या भांडारात जमा केली पाहिजेत.

20तेव्हा लोकांनी जयघोष केला आणि कर्णे वाजत राहिली, कर्ण्याचा आवाज ऐकताच लोकांनी मोठ्याने जयघोष केला आणि तट जागच्याजागी कोसळला; लगेच लोकांनी आपआपल्यासमोर त्या नगरात सरळ चालून जाऊन ते काबीज केले.

21त्या नगरांतील पुरूष, स्त्रिया, तरूण, वृध्द, गुरेमेंढरे, गाढवे वगैरे सर्वांचा त्यांनी तलवारीने समूळ नाश केला.

22तेव्हा जे दोन पुरूष तो देश हेरावयाला गेले होते त्यांना यहोशवा म्हणाला, तुंम्ही शपथ वाहिल्याप्रमाणे त्या वेश्येच्या घरी जाऊन तिला आणि तिचे जे कोणी असतील त्यांना बाहेर आणा.

23तेव्हा त्या तरूण हेरांनी आत जाऊन राहाबेला, तिच्या आई वडिलांना, भाऊबंदांना, तिचे जे कोणी होते त्या सर्वांना म्हणजे तिच्या सर्व आप्तजनांना बाहेर आणून इस्राएलाच्या छावणीबाहेर नेऊन ठेवले.

24मग त्यांनी ते नगर व त्यांतले सर्व काही आग लावून जाळले; मात्र सोने, रूपे आणि तांब्याची व लोखंडाची पात्रे ही त्यांनी परमेश्वराच्या घराच्या भांडारात ठेवली.

25यहोशवाने राहाब वेश्या, तिच्या वडिलांचा परिवार व तिचे जे कोणी होते ते सर्व वाचविले; तिचा वंश आजपर्यंत इस्राएल लोकांमध्ये वस्ती करून आहे; कारण जे जासूद यरीहो हेरायला यहोशवाने पाठवले होते, त्यांना तिने लपवून ठेवले होते.

26त्या समयी यहोशवाने त्यांना शपथ घातली आणि तो त्यांना म्हणाला की, जो कोणी यरीहो नगर पुन्हा बांधील त्याला परमेश्वराचा शाप लागेल. त्याचा पाया घालताच त्याचा ज्येष्ठ पुत्र मरेल आणि त्याच्या वेशी उभारताच त्याचा कनिष्ठ पुत्र मरेल.

27याप्रमाणे परमेश्वर यहोशवाबरोबर राहिला, आणि त्याची किर्ती सर्व देशभर पसरली.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Joshua 6 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran