Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Leviticus 6 >> 

1परमेश्वर मोशेला म्हणाला,

2जर कोणी परमेश्वराविरुद्ध आज्ञेचा भंग करून पाप केले म्हणजे एखाद्याने गहाण ठेवलेली वस्तू किंवा ठेव ह्या बाबतीत आपल्या शेजाऱ्याला फसवले किंवा लुट करून फसविले व त्याच्यावर जुलूम केला.

3किंवा आपल्या शेजाऱ्याची हरवलेली वस्तू सापडली असता सापडली नाही अशी लबाडी केली व तिच्याविषयी खोटी शपथ वाहिली, अशा ज्या गोष्टी करून लोक पाप करीतात त्यापैकी एखादी करून कोणी अपराधी ठरला;

4म्हणजे असले पाप करून दोषी झाला; तर त्याने चोरलेली किंवा जुलूम करून जे घेतले असेल ते किंवा आपल्या जवळची कोणाची गहाण ठेवलेली वस्तू बूडविली असेल ती, किंवा कोणाची हरवलेली वस्तू त्याला सापडली असून त्याने परत केली नसेल ती,

5किंवा एखाद्या कामाबद्दल खोटी शपथ वाहीली तर ती त्याने पूर्ण भरून द्यावी ज्या वस्तुचा त्याने अपहार केला असेल तीची पूर्ण भरपाई आपल्या दोषार्पणाच्या दिवशी करून देऊन त्या वस्तूंच्या किंमतीचा पांचवा हिस्सा अधिक भरावा;

6त्याने परमेश्वरासाठी याजकाने सांगितलेल्या किंमतीचा एक निर्दोष मेंढा दोषार्पण म्हणून याजकापाशी आणावा;

7मग याजकाने तो मेंढा घेऊन परमेश्वरासमोर जावे व त्याच्यासाठी प्रायश्चित करावे; आणि मग ज्या अपराधामुळे तो दोषी ठरला असेल त्याची क्षमा होईल.

8परमेश्वर मोशेला म्हणाला,

9अहरोन व त्याचे मुलगे ह्याना आज्ञा कर की होमापर्णाचे असे नियम आहेत. होमबली अग्नीकुंडावर रात्रभर ठेवून तो सकाळपर्यंत राहू द्यावा; आणि वेदीवरील अग्नी तिच्यावर जळतच ठेवावा.

10मग याजकाने आपला तागाचा झगा व चोळणा अंगात घालून होमार्पणमुळे वेदीवर राहिलेली राख उचलावी व ती वेदीजवळ ठेवावी.

11मग याजकाने आपली वस्त्रे काढावी व दुसरी वस्त्रे घालून ती राख छावणीबाहेर एखाद्या स्वच्छ ठिकाणी न्यावी;

12परंतु वेदीवरील अग्नी जळतच ठेवावा, तो विझवू देऊ नये; याजकाने रोज सकाळी त्या अग्नीवर लाकडे ठेवून तो पेटता ठेवावा व त्याच्यावर होमबली रचुन शांत्यर्पणाच्या अर्पणातील चरबीचा होम करावा.

13वेदीवरील अग्नी सतत जळत ठेवावा, तो विझू देऊ नये.

14हा अन्नार्पणाचा नियम आहे: अहरोनाच्या मुलांनी परमेश्वरासमोर वेदीपुढे आणावे;

15याजकाने त्या अन्नार्पणातून मूठभर मैदा, थोडे तेल व धूप घ्यावा व त्याचा वेदीवर होम करावा; ते परमेश्वरासाठी स्मारक भाग म्हणून त्याच्या चांगूलपणासाठीचे सुवासीक हव्य होय,

16अन्नार्पणातून जे काही उरलेले, व खमीर नसलेले अहरोन व त्याच्या मुलांनी दर्शनमंडपाच्या अंगणात पवित्र ठिकाणी बसून खावे.

17ते खमीर घालून भाजू नये; माझ्या अर्पणातून याजकाचा वाटा म्हणून मी ते त्यांना दिलेले आहे; पापार्पण व दोषार्पण ह्या सारखेच हेही परमपवित्र आहे.

18ह्या अर्पणाला खाण्याचा हक्क अहरोनाच्या संतानातील प्रत्येक पुरुषाला आहे; परमेश्वराच्या अर्पणातून हा त्यांचा वाटा पिढ्यानपिढया सतत चालू राहावा; ह्या अर्पणास जो स्पर्श करेल तो पवित्र होईल.

19परमेश्वर मोशेला पुन्हा म्हणाला,

20अहरोनाच्या अभिषेकाच्या दिवशी अहरोन व त्याच्या मुलांनी परमेश्वराला अर्पण आणावयाचे ते हे: एक दशांश एफा मैदा नित्याचे अन्नार्पण म्हणून द्यावे व त्यापैकी अर्धा सकाळी व अर्धा संध्याकाळी अर्पावा.

21ते तव्यावर तेलात परतावे त्यात तेल चांगले मुरल्यावर ते आत ओतावे व परतलेल्या त्या अन्नार्पणाचे तुकडे करून ते परमेश्वराप्रीत्यर्थ सुवास म्हणून अर्पावे.

22त्याच्या मुलांपैकी जो त्याच्या जागी अभिषिक्त याजक म्हणून निवडला जाईल त्यानेही असेच अर्पण करावे. कायमचा विधी म्हणून ह्या अन्नार्पणाचा परमेश्वरासाठी पूर्णपणे होम करावा.

23याजकाच्या प्रत्येक अन्नार्पणाचा संपूर्ण होम करावा; ते अन्नार्पण खाऊ नये.

24परमेश्वर मोशेला म्हणाला,

25अहरोन व त्याचे मुलगे ह्याना सांग की पापार्पणाचा विधि असा. ज्याठिकाणी होमबलीचा वध करतात त्याच ठिकाणी परमेश्वरासमोर पापबलीचाही वध करावा; तो परमपवित्र आहे.

26जो याजक पापबली अर्पील त्याने तो खावा. दर्शनमंडपाच्या अंगणात पवित्र ठिकाणी खावा.

27ज्याला मांसाचा स्पर्श होईल तो पवित्र होईल; त्याचे रक्त जर कोणाच्या वस्त्रावर उडाले तर ते वस्त्र तू पवित्रस्थानी धुवावे.

28मांस जर मडक्यात शिजवले असेल तर ते मडके फोडून टाकावे; पण ते जर पितळेच्या भांड्यात शिजवले असेल तर ते भांडे घासून पाण्याने धुवावे.

29याजकाच्या घराण्यातील प्रत्येक पुरुषाला ते खाण्याचा हक्क आहे; ते परमपवित्र आहे;

30आणि ज्या पापबलीचे थोडे रक्त दर्शनमंडपात पवित्र ठिकाणी प्रायश्चितासाठी आणले जाईल त्याचे मांस खाऊ नये; ते अग्नीत जाळावे.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Leviticus 6 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran