Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Leviticus 7 >> 

1दोषार्पणाविषयीचा विधि असा आहे: हे अर्पण परमपवित्र आहे.

2ज्या स्थानी होमबलीचा वध करावयाचा त्याच स्थानी दोषार्पणाच्या बळीचा वध करावा, आणि याजकाने त्या बळीचे रक्त वेदीवर सभोवती टाकावे.

3त्याची सर्व चरबी त्याने अर्पावी; त्याचे चरबीदार शेपूट, आंतड्यावरील चरबी,

4दोन्ही गुरदे, त्याच्यावरील कमरेजवळील चरबी व गुरद्यापर्यंतचा काळजावरील चरबीचा पडदा वेगळे करावेत,

5ह्या सर्वांचा याजकाने होम करावा; हे परमेश्वरासाठी होमार्पण आहे. हेच दोषार्पण होय.

6याजक वर्गातील प्रत्येक पुरुषाला हे दोषार्पण बळी खाण्याचा हक्क आहे; ते परमपवित्र आहे, ते पवित्र स्थानी बसून खावे.

7दोषार्पण पापार्पणासारखेच आहे; त्या दोघांचे विधि एकच आहेत; जो याजक ह्याच्याद्वारे प्रायश्चित करील त्याचा त्या अर्पणावर हक्क आहे.

8प्रायश्चित करणाऱ्या याजकाचा त्या होमार्पमाच्या बळीच्या कातड्यावरही हक्क असेल.

9भट्टीत भाजलेले कढईत किंवा तव्यावर तळलेले सर्व अन्नार्पण, ते अर्पण करणाऱ्या याजकाचे होईल.

10प्रत्येक अन्नार्पण तेल मिश्रित किंवा कोरडे, ते अर्पण करणाऱ्या अहरोनाच्या मुलांचे आहे; त्या सर्वाचा त्यांच्यावर सारखाच हक्क आहे.

11परमेश्वरासाठी कोणाला शांत्यर्पणाचा यज्ञ करावयाचा असेल तर त्याचा विधि असा:

12त्याला तो शांत्यर्पणाचा यज्ञ उपकारस्तुतीसाठी करावयाचा असेल तर त्याने तेलात मळलेल्या, बेखमीर पोळया तेल लावलेल्या बेखमीर चपात्या आणि तेलात मळलेल्या मैद्याच्या तळलेल्या पोळया उपकारस्तुतीच्या यज्ञासोबत अर्पाव्या.

13त्याच्या उपकारस्तुतीच्या शांत्यर्पणाच्या यज्ञासोबत त्याने खमीर घातलेल्या भाकरीही अर्पाव्या

14ह्या प्रत्येक अर्पणातून परमेश्वरासाठी प्रत्येकी एक पोळी अर्पावी; शांत्यर्पणाचे रक्त शिंपडणाऱ्या याजकाचा त्या पोळीवर हक्क आहे.

15त्याने उपकारस्तुतीसाठी केलेल्या शांत्यर्पणाच्या यज्ञबलीचे मांस, अर्पण करण्याच्या दिवशीच खावे; त्यातील काही सकाळपर्यंत ठेवू नये.

16यज्ञबलीचे अर्पण नवसाचे किंवा स्वखुशीचे असेल तर ज्या दिवशी तो ते अर्पील त्यादिवशी त्याने ते खावे आणि जर त्यातून काही उरेल तर त्याने दुसऱ्या दिवशीही खावे.

17त्या यज्ञबलीचे काही मांस तिसऱ्या दिवसापर्यंत उरले तर ते अग्नीत जाळूत टाकावे.

18जर कोणी शांत्यर्पणाच्या यज्ञबलीच्या मांसातून तिसऱ्या दिवशी मांस खाईल तर परमेश्वराला ते आवडणार नाही, व तो ते अर्पण मान्य करणार नाही; ते अर्पण अमंगळ होईल; त्या पापाबद्दल भोगाव्या लागणाऱ्या शिक्षेस तो स्वत: जबाबदार राहील.

19ज्या मांसाला कोणत्याही अशुद्ध वस्तूचा स्पर्श झाला असेल ते खाऊ नये; ते अग्नीत जाळून टाकावे. शुद्ध असणाऱ्यानेच यज्ञबलीचे मांस खावे;

20परंतु जर कोणी अशुद्ध असून परमेश्वराला अर्पिलेल्या शांत्यर्पणाच्या यज्ञबलीचे मांस खाईल तर त्याला आपल्या लोकांतून बाहेर काढावे.

21एखादा माणूस जर एखाद्या अशुद्ध वस्तूला स्पर्श करील मग ती अशुद्धता माणसाची, पशूची किंवा दुसऱ्या कोणत्या अमंगळ पदार्थाची असो, तर तो अशुद्ध होईल आणि परमेश्वराला अर्पण केलेल्या शांत्यर्पणाच्या यज्ञबलीचे जर तो मांस खाईल तर त्याला आपल्या लोकांतून बाहेर काढावे.

22परमेश्वर मोशेला म्हणाला,

23सर्व इस्राएल लोकांना असे सांग: तुम्ही बैलाची मेंढराची किंवा बकऱ्याची चरबी खाऊ नये.

24मेलेल्या जनावराची चरबी किंवा इतर पशूंनी फाडून टाकलेल्या जनावराची चरबी तुम्ही इतर कामासाठी वापरावे पण ती मुळीच खाऊ नये.

25परमेश्वराला होमाद्ववारे अर्पिलेल्या पशूची चरबी जर कोणी खाईल तर त्याला आपल्या लोकांतून बाहेर काढावे

26“तुम्ही कोठेही राहत असला तरी आपल्या घरात पक्ष्याचे किंवा जनावराचे रक्त तुम्ही कधीही खाऊ नये.

27जर कोणी कोणतेहि रक्त खाईल तर त्याला आपल्या लोकांतून बाहेर काढावे.”

28परमेश्वर मोशेला म्हणाला,

29“इस्राएल लोकांना असे सांग: जर कोणी परमेश्वरासमोर आपल्या शांत्यर्पणाचा यज्ञबली अर्पील तर त्याने त्या अर्पणातून काही भाग परमेश्वराकडे आणावा.

30त्याने आपल्या हाताने परमेश्वरासाठी अर्पणे आणावी; त्याने चरबी व ऊर याजकाकडे आणावा; ते ऊर परमेश्वरासमोर ओवाळले जाईल; हे ओवाळणीचे अर्पण होय.

31मग याजकाने त्या चरबीचा होम करावा परंतु ऊर अहरोन व त्याचे मुलगे ह्यांचा होईल.

32तसेच तुम्ही आपल्या शांत्यर्पणाच्या यज्ञबलीची उजवी मांडीही समर्पित केलेला अंश म्हणून याजकाला द्यावी.

33अहरोनाच्या मुलांपैकी जो कोणी शांत्यर्पणाचे रक्त व चरबी अर्पील त्याचा त्या मांडीवर हक्क असावा.

34मी परमेश्वर इस्राएल लोकांच्या शांत्यर्पणाच्या यज्ञबलीतून ओवाळणीचा ऊर व उजवी मांडी काढून घेऊन अहरोन याजक व त्याचे मुलगे ह्याना दिली आहे; हा इस्राएल लोकांकडून त्यांना मिळणारा नेहमीचा हिस्सा आहे. इस्राएल लोकांनी हा निरंतरचा विधी म्हणून पिढ्यानपिढया पाळावा.”

35परमेश्वराकरिता अर्पिलेल्या अर्पणातून हे भाग अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना देण्यात आलेले आहेत; जेव्हा जेव्हा ते याजक म्हणून परमेश्वराची सेवा करतात तेव्हा तेव्हा त्या समर्पणातून ते भाग त्यांना मिळावेत. देवाची सेवा करणारे याजक म्हणून ज्या दिवशी त्यांची नेमणूक करण्यात आली त्याच दिवसापासून असे ठरले आहे.

36परमेश्वराने ज्या दिवशी त्यांना अभिषेक केला त्यादिवशी त्याने इस्राएल लोकांकडून हा भाग त्यांना मिळावा अशी आज्ञा दिली व हा त्यांचा पिढ्यानपिढ्या कायमचा हक्क ठरला आहे.

37हे विधि होमार्पण, अन्नार्पण, पापार्पण, दोषार्पण, याजकाच्या समर्पणाच्या वेळेच अर्पण आणि शांत्यर्पण ह्या विषयीचे आहे;

38इस्राएल लोकांनी परमेश्वराकरिता काय अर्पणे आणावीत ह्या विषयी त्याने त्यांना सीनाय रानात आज्ञा दिली त्यावेळी त्याने मोशेला ह्याप्रमाणे सीनाय पर्वतावर हे विधी लावून दिले.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Leviticus 7 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran