Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Esther 2 >> 

1काही काळानंतर राजा अहश्वेरोशचा राग शमला. त्याला वश्तीची आणि तिच्या वागण्याची आठवण झाली. तिच्याविषयी आपण दिलेल्या आज्ञा आठवल्या.

2तेव्हा राजाच्या व्याक्तिगत सेवेतील सेवकांनी सुचवले, राजासाठी तरुण, सुंदर कुमारींचा शोध घ्यावा.

3आपल्या राज्यातील प्रत्येक प्रांतातून राजाने एकेक अधिकारी निवडावा. त्या अधिकाऱ्यांनी सर्व सुरेख, सुकुमार कुमारीकांना शूशन या राजधानीत घेऊन यावे. त्यांना अंत:पुरात ठेवावे. तेथे अंत:पुराचा प्रमुख व हेगे या खोजाच्या निगराणीखाली त्यांना ठेवावे. त्याने त्यांना तेल आणि सुगंधित द्रव्य देऊन त्यांच्यावर सौंदर्य उपचार करावेत.

4त्यांच्यामधून मग जी कन्या राजाला पसंत पडेल तिला वश्तीच्या ऐवजी राणीपद मिळावे.” राजाला ही सूचना आवडली आणि त्याने ती मान्य केली.

5बन्यामीनाच्या घराण्यातील मर्दखय नावाचा एक यहूदी शूशन राजवाड्यात होता. तो याईराचा पुत्र आणि याईर शिमईचा पुत्र आणि शिमई कीश याचा पुत्र होता.

6बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर याने यहूदाचा राजा यखन्या याच्याबरोबर जे लोक पकडून नेले होते त्यांच्यामध्ये यालाही यरुशलेमेहून पकडून नेले होते.

7आणि तो आपल्या चुलत्याची कन्या हदस्सा म्हणजे एस्तेर हिला आईवडील नसल्यामुळे तीची काळजी घेत असे. मर्दखयानेच तिचा सांभाळ केला होता. मर्दखयाने तिला आपली स्वतःची कन्या मानून वाढवले होते. ती अतिशय रुपवती आणि सुरेख होती.

8राजाची आज्ञा लोकांपर्यंत पोचल्यावर पुष्कळ मुलींना शूशन राजवाड्यात त्यांना हेगेच्या देखभालीखाली ठेवण्यात आले. त्या मुलींमध्ये एस्तेरही होती. हेगे राजाच्या जनानखान्याचा प्रमुख होता.

9हेगेला एस्तेर आवडली आणि तिच्यावर त्याची कृपादृष्टी झाली. त्यामुळे त्याने तिला ताबडतोब शुध्दतेच्या वस्तु पुरवल्या आणि खास आहार दिला. राजवाड्यातील सात दासींची त्याने निवड केली आणि एस्तेरच्या दिमतीला त्यांना नेमले. एस्तेरला आणि त्या सात दासींना त्याने अंत:पुरातील उत्तम जागा राहण्यास दिली.

10मर्दखयाने बजावल्यामुळे एस्तेरने आपल्या लोकांविषयी व नातलगाविषयी कोणालाही सांगितले नव्हते.

11आणि एस्तेर कशी आहे व तिचे काय होणार हें जाणून घेण्यासाठी मर्दखय प्रत्येक दिवशी अंतःपुराच्या अंगणासमोर फेऱ्या घालीत असे.

12स्रियांसाठी केलेल्या नियमाप्रमाणे, बारा महिने झाल्यावर, अहश्वेरोश राजाकडे जाण्याची पाळी एकेका तरुणीला येत असे. तिला बारा महिने सौंदर्योपचार घ्यावे लागत. त्यापैकी सहा महिने गंधरसाच्या तेलाचे तर सहा महिने सुंगधी द्रव्ये आणि प्रसाधने यांचे उपचार होत असत.

13आणि राजाकडे जायच्या वेळी अशी पध्दत होती. अंत:पुरातून राजमंदिरात जाण्यासाठी जे काही ती मागे ते तिला मिळत असे.

14संध्याकाळी ती राजाकडे जाई. सकाळी ती दुसऱ्या अंतःपुरात परत येत असे. तिथे शाशगज नावाच्या खोजाच्या हवाली केले जाई. शाशगज हा राजाच्या उपपत्नीची देखरेख करणारा खोजा होता. राजाला जी कन्या पसंत पडेल तिला तो नांव घेऊन बोलावत असे. एरवी या मुली पुन्हा राजाकडे जात नसत.

15एस्तेरची राजाकडे जायची पाळी आली तेव्हा स्रियांचा रक्षक राजाचा खोजा हेगे याने जे तिला देण्याचे ठरविले होते त्याहून अधिक काही मागून घेतले नाही. (मर्दखयाचा चुलता अबीहइल याची कन्या जिला मर्दखयाने कन्या मानली होती) जे कोणी एस्तेरला पाहीले त्या सर्वांची कृपादृष्टी तिच्यावर झाली.

16तेव्हा अहश्वेरोश राजाच्या महालात एस्तेरची रवानगी झाली. तो राजाच्या कारकिर्दीच्या सातव्या वर्षातला दहावा म्हणजे तेबेथ महिना होता.

17इतर सर्व मुलींपेक्षा राजाने एस्तेरवर अधिक प्रीति केली. आणि इतर सर्व कुमारीहून तिजवर त्याची मर्जी बसली व तिच्यावर कृपादृष्टी झाली. तेव्हा राजा अहश्वेरोशने एस्तेरच्या मस्तकावर राजमुकुट घालून वश्तीच्या जागी तिला राणी केले.

18आपले सर्व प्रमुख अधिकारी सेवक यांना राजाने एस्तेरसाठी मोठी मेजवानी दिली. सर्व प्रांतांमध्ये त्याने लोकांना कर माफी जाहीर केली. आपल्या उदारपणाप्रमाणे त्याने लोकांना बक्षीसे दिली.

19सर्व मुली दुसऱ्यांदा एकत्र जमल्या तेव्हा मर्दखय राजद्वारी बसला होता.

20एस्तेरने आपले लोक व नातलगाविषयी कोणाला कळू दिले नव्हते. मर्दखयाने तिला तसे बजावले होते. तो तिचा सांभाळ करत असताना ती त्याचे ऐकत असे तशीच ती अजूनही त्याच्या आज्ञेत होती.

21मर्दखय राजद्वारी बसलेला असताना, बिग्थान व तेरेश प्रवेशद्वारातील राजाचे पहारेकरी, राजावरील रागाने, राजा अहश्वेरोशला मारून टाकण्याचा कट करु लागले.

22पण मर्दखयाला त्यांचा बेत कळल्यामुळे त्याने राणी एस्तेरला खबर दिली. राणी एस्तेरने मर्दखयाला या कटाचा सुगावा लागला असे राजाला सांगितले.

23मग या बातमीचा तपास करण्यात आला. मर्दखयची खबर खरी असल्याचे आढळून आले. ज्या पहारेकऱ्यांनी राजाच्या खुनाचा कट केला होता त्यांना फाशी देण्यात आली. या सर्व गोष्टी राजासमक्ष राजांच्या इतिहासाच्या ग्रंथात नोंदवून ठेवण्यात आल्या.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Esther 2 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran