Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Esther 1 >> 

1अहश्वेरोश राजाच्या कारकिर्दीत (अहश्वेरोश हिंदुस्तानापासून कूशापर्यंतच्या एकशेंसत्तावीस प्रांतांवर तो राज्य करत होता.)

2असे झाले की, त्या दिवसात शूशन या राजवाड्यातील राजासनावर राजा अहश्वेरोश बसला होता.

3आपल्या कारकिर्दीच्या तिसऱ्या वर्षी, त्याने आपले प्रधान आणि सेवक यांना मेजवानी दिली. पारस आणि मेदय या प्रांतांमधले सैन्याधिकारी आणि महत्वाचे कारभारीही त्याच्यासमोर उपस्थित झाले.

4त्यांना त्याने पुष्कळ दिवस म्हणजे एकशेऐंशी दिवसपर्यंत आपल्या वैभवी राज्याची संपत्ती आणि आपल्या महान प्रतापाचे वैभव त्याने सर्वांना दाखविले.

5आणि ते दिवस संपल्यावर राजाने शूशन राजवाडयातील सर्व लोकांना, लहान थोरांना, बागेच्या अंगणात सात दिवस मेजवानी दिली.

6या बागेतील अंगणात तलम सुताचे पांढरे व जांभळे शोभेचे पडदे खोलीभर टांगले होते. हे पडदे पांढऱ्या जांभळया दोऱ्यांनी रुप्याच्या कड्यांमध्ये अडकवून संगमरवरी स्तंभाला लावले होते. तेथील मंचक सोन्यारुपाचे असून तांबड्या, पांढऱ्या व काळ्या संगमरवरी पाषाणांच्या आणि इतर रंगीत मूल्यवान खड्यांच्या नक्षीदार फरशीवर ठेवले होते.

7सोन्याने बनवलेल्या पेल्यांतून पेय-पदार्थ वाढले जात होते. आणि प्रत्येक पेला अव्दितीय असा होता. आणि राजाच्या उदारपणामुळे राजाला शोभेल असा उत्तम प्रतीचा द्राक्षारस भरभरुन देण्यात आला.

8हे पिणे नियमानुसार होते. कोणी कोणाला आग्रह करीत नसे. प्रत्येक आमंत्रिताच्या इच्छेप्रमाणे करावे अशी राजाने आपल्या राजमहालातील सर्व सेवकांना आज्ञा केली होती.

9वश्ती राणीनेही राजा अहश्वेरोश याच्या राजमहालातील स्त्रियांना मेजवानी दिली.

10मेजवानीच्या सातव्या दिवशी राजा अहश्वेरोश द्राक्षारस प्याल्याने उत्तेजित मन:स्थितीत होता. तेव्हा आपल्या सेवा करत असलेल्या महूमान, बिजथा, हरबोना, बिगथा, अवगथा, जेथर आणि कर्खस,या सात खोजांना आज्ञा केली की,

11वश्ती राणीला राजमुकुट घालून आपल्याकडे आणण्यास सांगितले. आपले सर्व अधिकारी व सरदार यांच्यासमोर तिची सुंदरता दाखवावी अशी त्याची इच्छा होती.कारण ती दिसायला फार आकर्षक होती.

12पण त्या सेवकांनी जेव्हा राणी वश्तीला राजाची ही आज्ञा सांगितली तेव्हा तिने येण्यास नकार दिला. तेव्हा राजा फार संतापला.

13पंडितांचा आणि ज्योतिष्यांचा सल्ला घ्यायची राजाची प्रथा होती. त्यानुसार कायदे जाणणाऱ्या पंडितांशी राजा बोलला. ही सुज्ञ मंडळी राजाला जवळची होती.

14त्यांची नावे अशी: कर्शना, शेथार, अदमाथा, तार्शीश, मेरेस, मर्सना ममुखान. हे सातजण पारस आणि मेदय मधले अत्यंत महत्वाचे अधिकारी होते. राजाला भेटण्याचा त्यांना विशेषाधिकार होता. राज्यातले ते सर्वात उच्च पदावरील अधिकारी होते.

15राजाने त्यांना विचारले “राणी वश्तीवर काय कायदेशीर कारवाई करावी? कारण तिने अहश्वेरोश राजाची जी आज्ञा खोजांमार्फत दिली होती तिचे उल्लंघन केले आहे.”

16तेव्हा ममुखानाने सर्व अधिकाऱ्यांसमक्ष राजाला सांगितले, वश्ती राणीने केवळ अहश्वेरोश राजाचाच अपमान केला नाहीतर राज्यातील सर्व सरदार व प्रजेचाही केला आहे.

17माझे म्हणणे असे आहे की राणी वश्ती अशी वागली हे इतर सर्व स्त्रियांना समजेल. तेव्हा त्या आपल्या पतींचा अनादर करतील. त्या आपापल्या पतींना म्हणतील, अहश्वेरोश राजाने राणीला आपल्यापुढे आणायला सांगितले पण तिने यायला नकार दिला.

18राणीचे कृत्य आजच पारस आणि मेदय इथल्या अधिकाऱ्यांच्या स्त्रियांच्या कानावर गेले आहे. त्या स्त्रियाही मग राजाच्या अधिकाऱ्यांशी तसेच वागतील. त्यातून अनादर आणि संताप होईल.

19“तर राजाची मर्जी असल्यास एक सूचना करतो. राजाने एक राजकीय फर्मान काढावे आणि त्यात काही फेरबदल होऊ नये म्हणून पारसी आणि मेदय यांच्या कायद्यात ते लिहून ठेवावे. राजाज्ञा अशी असेल की वश्तीने पुन्हा कधीही राजा अहश्वेरोशच्या समोर येऊ नये. तसेच तिच्यापेक्षा जी कोणी चांगली असेल तिला राजाने पट्टराणी करावे.

20राजाच्या या विशाल साम्राज्यात ही आज्ञा एकदा जाहीर झाली की सर्व स्त्रिया आपापल्या पतीशी आदराने वागतील. लहानापासून थोरापर्यंत सर्वांच्या स्त्रिया आपल्या पतींचा मान ठेवतील.

21या सल्ल्याने राजा आणि त्याचा अधिकारी वर्ग आनंदित झाला. ममुखानची सूचना राजा अहश्वेरोशने अंमलात आणली.

22राजा अहश्वेरोशने सर्व राज्यभर प्रत्येक प्रांतात त्या प्रांताच्या तिथल्या भाषेत पत्र पाठवले. प्रत्येक पुरुषाची आपल्या घरात सत्ता चालावी असे त्या पत्रांमध्ये सर्वांना समजेल अशा भाषेत लिहिलेले होते.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Esther 1 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran