Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Nehemiah 13 >> 

1त्यादिवशी मोशेचे पुस्तक सर्व लोकांना ऐकू जाईल अशाप्रकारे मोठ्याने वाचले गेले. त्या पुस्तकात त्यांना हा नियम लिहिलेला आढळला: कोणत्याही अम्मोनी आणि मवाबी व्यक्तीला देवाच्या लोकांमध्ये कधीही मिसळता येणार नाही.

2या लोकांनी इस्राएली लोकांना अन्न आणि पाणी दिले नव्हते म्हणून हा नियम लिहिला गेला. शिवाय बलामने इस्राएलींना शाप द्यावा म्हणून या लोकांनी त्याला पैसेही देले होते. पण आपल्या देवाने त्या शापाचे आशीर्वादात रूपांतर केले.

3त्यामुळे इस्राएलींनी जेव्हा हा नियम ऐकला तेव्हा त्यांनी त्याचे पालन केले. या परकी लोकांच्या प्रजेपासून ते वेगळे झाले.

4पण हे होण्यापूर्वीच एल्याशीबाने तोबीयाला मंदिरात एक खोली दिली होती. एल्याशीब हा याजक देवाच्या मंदिरातील कोठाराचा रक्षक होता. आणि तो तोबीयाचा जिवलग मित्र होता. ही खोली धान्यार्पणे,धूप, मंदिरातील पात्रे व इतर वस्तू ठेवण्यासाठी वापरली जात असे.

5तिथले लेवी, गायक व द्वारपाल यांना लागणारा धान्याचा दशामांश, नवीन द्राक्षरस, ऊद, पात्रे आणि तेल या समर्पित अंशाची अर्पणे तेथे ठेवली जात तरीही एल्याशीबाने ती खोली तोबीयाला दिली.

6हे सर्व होत होते तेव्हा मी यरुशलेमामध्ये नव्हतो. बाबेलच्या राजाकडे मी परत गेलो होतो. बाबेलचा राजा अर्तहशश्त कारकिर्दीच्या बत्तिसाव्या वर्षी मी बाबेलला गेलो होतो. नंतर मी राजाकडे यरुशलेमेला परत जायची परवानगी मागितली.

7आणि मी यरुशलेमेला परतलो. एल्याशीबाच्या वर्तनाची ही दु:खद बातमी मला यरुशलेमामध्ये समजलीली. आपल्या देवाच्या मंदिरात एल्याशीबाने तोबीयाला खोली दिलेली होती.

8एल्याशीबाच्या या वर्तनाने मी अतिशय क्रोधीत झालो. तोबीयाचे सगळे सामान मी खोलीबाहेर फेकून दिले.

9त्या खोल्या शुध्द आणि स्वच्छ करून घ्यायची मी आज्ञा दिली. मग देवाच्या मंदिरातील पात्रे, वस्तू, अन्नार्पणे, ऊद वगैरे मी पूर्ववत तिथे ठेवले.

10लोकांनी लेव्यांना त्यांचा वाटा दिलेला नाही हे ही माझ्या कानावर आले. त्यामुळे लेवी आणि गायक आपापल्या शेतांवर कामाला गेले होते.

11म्हणून मी आधिकाऱ्यांना सांगितले की त्यांचे चुकले. मी त्यांना विचारले, “तुम्ही देवाच्या मंदिराची देखभाल का केली नाही,?” मग मी सर्व लेव्यांना बोलवून घेतले. मंदिरातील आपापल्या जागी आपापल्या कामावर जायला त्यांना सांगितले.

12त्यानंतर यहूदातील सर्व लोकांनी पिकाचा एकदशांश वाटा, नवीन द्राक्षारस आणि तेल मंदिरात आणले. या सगळया गोष्टी कोठारात ठेवण्यात आल्या.

13कोठारांवर या माणसांना मी नेमले: शलेम्या हा याजक, सादोक शिक्षक, आणि पदाया नावाचा लेवी. मत्तन्याचा पुत्र जक्कूर याचा पुत्र हानान याला त्यांचा मदतनीस म्हणून नेमले. ही माणसे विश्वासू आहेत हे मला माहीत होते. आपल्या नातलगांना नेहमी लागणाऱ्या वस्तूंचे वाटप करणे हे त्यांचे काम होते.

14देवा, मी केलेल्या या गोष्टींचे स्मरण असू दे. माझ्या देवाचे मंदिर आणि तिथली सेवेसाठी मी जी चांगली कामे केली आहेत ती पुसून टाकू नकोस.

15यहूदात त्या काळात मी शब्बाथ दिवशी लोकांना काम करताना पाहिले. द्राक्षारसासाठी द्राक्षे तुडवताना मी त्यांना पाहिले. धान्य आणून ते गाढवांवर लादताना मी पाहिले. द्राक्षे, अंजीर आणि इतर बऱ्याच गोष्टी शहरात नेताना मी लोकांना पाहिले. शब्बाथ दिवशी ते या सर्व गोष्टी यरुशलेमामध्ये आणत होते. तेव्हा मी त्याबद्दल त्यांना ताकीद दिली. शब्बाथ दिवशी अन्नधान्याची विक्री करायची नाही हे मी त्यांना सांगितले.

16तेव्हा सोरे नगरातील काही लोक यरुशलेमामध्ये राहत होते. ते मासे आणि आणखी पुष्काळशा गोष्टी शब्बाथ दिवशी यरुशलेमामध्ये आणून विकत. आणि यहूदी लोक त्या विकत घेत.

17यहूदातील मान्यवर लोकांना मी हे चुकीचे असल्याचे सांगितले. त्यांना मी म्हणालो, “तुम्हीही फार वाईट गोष्ट करत आहात. तुम्ही शब्बाथाला अपवित्र करीत आहात. शब्बाथाला तुम्ही इतर दिवसांसारखाच एक करत आहात.

18तुमच्या पूर्वजांनी याच गोष्टी केल्या आहेत ना? म्हणूनच देवाने आपल्यावर आणि आपल्या नगरावर अरिष्ट आणले आहे ना? शब्बाथ दिवस पवित्र न मानता इस्राएलावर आणखी संकटे आणावयास पाहता.”

19म्हणून मी केले ते असे: दर शुक्रवारी रात्री अंधार पडण्यापूर्वी द्वारपालांना मी यरुशलेमच्या वेशींचा कडेकोट बंदोबस्त करायला सांगितले. शब्बाथ दिवस होऊन गेल्याखेरीज दरवाजे उघडायचे नाहीत असा आदेश दिला. माझी काही माणसे मी वेशीवर उभी केली. शब्बाथ दिवशी कोणताही माल यरुशलेमेमध्ये येणार नाही याची खात्री करून घ्यायला मी त्यांना सांगितले.

20एकदोन वेळेला व्यापाऱ्यांना आणि विक्रेत्यांना यरुशलेमेबाहेर रात्र काढावी लागली.

21पण मी त्या व्यापाऱ्यांना आणि विक्रेत्यांनाही समज दिली. मी त्यांना म्हणालो, “कोटाच्या भिंतीलगत रात्री मुक्काम करु नका. पुन्हा तुम्ही तसे केल्यास तुम्हाला पकडण्यात येईल.” तेव्हापासून ते पुन्हा शब्बाथ दिवशी त्यांच्या वस्तू विकायला आले नाहीत.

22मग मी लेवीना त्यांच्या शुद्धीकरणाची आज्ञा दिली. ते पार पाडल्यावर त्यांना वेशींची राखण करायची होती. शब्बाथ हा दिवस म्हणून राखून ठेवला होता याची खात्री करण्यासाठी असे केले होते.देवा, या गोष्टी केल्याबद्दल कृपया माझे स्मरण ठेव. माझ्यावर लोभ असू दे आणि तुझे महान प्रेम मला मिळूदे.

23त्या काळात माझ्या असेही लक्षात आले की काही यहूदी लोकांनी अश्दोदी, अम्मोनी आणि मवाबी स्रियांशी लग्ने केली होती.

24आणि त्यांची मुले अश्दोदी भाषा अर्धवट बोलत. त्यांना यहूदी भाषा येत नव्हती. ते आपआपल्या जातीची मिश्र भाषा बोलत होते.

25तेव्हा त्यांच्याशी वाद केला.त्यांना शाप दिला. आणि काहींना मारहाण करून व त्यांचे केस उपटले. त्यांना देवाची शपथ घ्यायला लावून, म्हणालो, “तुम्ही आपल्या कन्या त्यांच्या पुत्रांना देऊ नका,आणि आपल्या पुत्रांना किंवा आपणांला त्यांच्या कन्या पत्नी करून घेऊ नका.

26अशा विवाहांमुळेच शलमोनाच्या हातून पाप झाले. पुष्कळ राष्ट्रात त्याच्यासारखा कोणी राजा नव्हता. तो आपल्या देवाला प्रिय होता,आणि देवाने सर्व इस्राएलावर शलमोनाला राजा केले. पण अन्य जातीच्या स्त्रियांनी त्यालाही पापात पाडले.

27तुमचे ऐकून आम्ही अन्य स्त्रियांशी विवाहबध्द व्हावे व तसेच आमच्या देवाचे भयंकर पातक करावे काय?”

28योयादा हा मुख्य याजक एल्याशीब याचा पुत्र. योयादाचा एक पुत्र होरोनाच्या सनबल्लटचा जावई होता. त्याला मी आपल्याजवळून पळवून लावले.

29हे माझ्या देवा, त्यांनी याजकपणाला अपवित्र केले आहे. याजकपणाचा आणि लेवीपणाचा करार त्यांनी मोडला आहे.म्हणून त्यांची आठवण कर.

30म्हणून मी त्यांना सर्व परकीयांपासून शुध्द केले. लेवी आणि याजक यांना त्यांची कामे आणि जबाबदाऱ्या ठरवून दिल्यात.

31लाकडाचे अर्पण व प्रथमफळ आणण्याची वेळ मी ठरवून दिली. हे माझ्या देवा, या सत्कृत्यांसाठी माझी आठवण कर.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Nehemiah 13 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran