Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  1 Samuel 22 >> 

1मग दावीद तेथून निघून अदुल्लाम गुहेत पळून गेला आणि त्याचे भाऊ व त्याच्या बापाचे घरचे सर्व हे ऐकून तेथे खाली त्याच्याकडे गेले.

2आणि कोणी अडचणीत पडलेले कोणी कर्जदार व कोणी त्रासलेले असे सर्व त्याच्याकडे एकत्र मिळाले आणि तो त्यांचा सरदार झाला; आणि सुमारे चारशे माणसे त्याच्याजवळ होती.

3आणि दावीद तेथून मवाबातील मिस्पा येथे जाऊन मवाबाच्या राजाला म्हणाला मी तुला विनंती करतो देव माझ्यासाठी काय करील हे मला कळेल तोपर्यत माझ्या आईबापांना तुझ्याजवळ येऊन राहू दे.

4मग त्याने त्यांना मवाबाच्या राजाकडे आणले आणि दावीद गडात वस्तीस होता तोपर्यत ते त्याच्याजवळ राहिले.

5मग गाद भविष्यवादी दावीदाला म्हणाला गडात राहू नको तर तू निघून यहूदा देशात जा. तेव्हा दावीद निघून हरेथ रानात आला.

6आणि दावीद व त्याच्याबरोबरची माणसे यांचा शोध लागला असे शौलाने ऐकले. शौल तर रामातल्या गिब्यात एशेल झाडाखाली बसला होता; त्याचा भाला त्याच्या हातात होता व त्याचे सर्व चाकर उभे होते.

7तेव्हा शौल आपल्याजवळ जे आपले चाकर उभे होते त्यांना म्हणाला अहो बन्यामीनी लोकांनो ऐका हो इशायाचा मुलगा तुम्हा प्रत्येकाला शेते व द्राक्षमळे देणार आहे काय? तो तुम्हा सर्वाना हजाराचे व शंभराचे सरदार करणार आहे काय?

8म्हणून तुम्ही सगळे माझ्यावर फितुरी करीत आहा आणि माझा मुलगा इशायाच्या मुलाशी करार करतो तेव्हा मला कोणी कळवीत नाही आणि तुम्हातला कोणी माझ्यासाठी दुखि:त होत नाही आणि माझ्या मुलाने माझ्या चाकराला आजच्यासारखे माझ्यासाठी टपून बसायला चेतवले आहे हे कोणी मला कळवीत नाही.

9मग दवेग अदोमी जो शौलाच्या चाकरावर नेमलेला होता त्याने उत्तर देऊन म्हटले मी इशायाच्या मुलाला नोब येथे अहीटूबाचा मुलगा अहीमलेख याच्याकडे येताना पाहिले;

10आणि त्याने त्याच्यासाठी देवाला विचारले व त्याला अन्न दिले आणि गथ पलिष्टी याची तरवार त्याला दिली.

11तेव्हा राजाने अहीटूबाचा मुलगा अहीमलेख याजक याला व त्याच्या बापाच्या सर्व घराण्यातले जे याजक नोब येथे होते त्यांना बोलावायला माणसे पाठवली आणि ते सर्व राजाकडे आले.

12तेव्हा शोलाने म्हटले अहीटूबाच्या मुला आता ऐक. तो म्हणाला माझ्या प्रभू मी येथे आहे.

13आणि शौल त्याला म्हणाला तू आणि इशायाचा मुलगा अशा तुम्ही दोघांनी माझ्यावर फितुरी केली तू त्याला भाकर व तरवार दिली आणि त्याच्यासाठी देवापाशी विचारले यासाठी की त्याने आजच्यासारखे माझ्यावर उठून माझ्यासाठी टपून बसावे?

14तेव्हा अहीमलेखाने राजाला उत्तर देऊन म्हटले तुझ्या सर्व चाकरांमध्ये दावीदासारखा कोण विश्वासू आहे? तो राजाचा जावई आहे व एकांती तुझ्याजवळ मसलतीला येत असतो व तुझ्या घरात प्रतिष्ठीत आहे.

15आजच मी त्याच्यासाठी देवाला विचारू लागलो काय? असे करणे माझ्यापासून दूर असो; राजाने आपल्या दासाला किंवा माझ्या बापाच्या घराण्यातील कोणाला अपराध लावू नये कारण या सर्वांतले अधिक उणे काहीच तुझ्या दासाला ठाऊक नाही.

16राजा म्हणाला अहीमालेखा तुला खचित मेले पाहिजे; तुला व तुझ्या बापाच्या घराण्यातील सर्वाना मेले पाहिजे;

17मग राजा आपणाजवळ जे शिपाई उभे होते त्यांना म्हणाला यहोवाच्या याजकांच्या अंगावर जाऊन त्यांना मारा कारण त्यांनीही दावीदाचा पक्ष धरला आहे; आणि तो पळाला असे त्यांना कळले असता त्यांनी मला कळवले नाही. परंतु राजाचे चाकर देवाच्या याजकांवर तुटून पडायला आपले हात पुढे करीनात.

18मग राजाने दवेगाला म्हटले तू याजकांच्या अंगावर जा. तेव्हां दवेग अदोमी याजकांच्या अंगावर जाऊन तुटून पडला. आणि त्या दिवशी त्याने तागाचे एफोद नेसलेल्या पंच्याऐंशी मनुष्यांना जिवे मारले.

19आणि त्याने याजकांचे नोब नगर याचा तरवारीच्या धारेने नाश केला; पुरुष बायका बाळके व तान्ही गुरे गाढवे व मेंढरे ही त्याने तरवारीच्या धारेने जिवे मारली.

20तेव्हां अहीटूबाचा मुलगा अहीमलेख याचा अब्याथार नांवाचा एक मुलगा सुटून दावीदाकडे पळून गेला.

21आणि शौलाने देवाच्या याजकांना जिवे मारले हे अब्याथाराने दावीदाला कळवले.

22तेव्हा दावीदाने अब्याथाराला म्हटले दवेग अदोमी येथे होता त्यादिवशी मला समजले की तो शौलाला खचित सांगेल. मी तुझ्या बापाच्या घराण्याच्या सर्व मनुष्यांस मरणास कारण झालो आहे.

23माझ्यापाशी राहा भिऊ नको; कारण जो मला जिवे मारायला पाहतो तोच तुला जिवे मारायला पाहतो पण माझ्याजवळ तुझे रक्षण होईल.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  1 Samuel 22 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran