Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Joshua 14 >> 

1आणि कनान देशात इस्राएलच्या लोकांनी जी वतने घेतली, म्हणजे एलाजार याजक व नुनाचा पुत्र यहोशवा व इस्राएल लोकांच्या वंशाच्या वडिलांच्या घराण्याचे पुढारी यानी त्यास जी वतने दिली ती ही आहेत.

2देवाने मोशेच्या व्दारे नऊ वंशाविषयी व अर्ध्या वंशाविषयी जशी आज्ञा दिली होती, तसे चिठ्या टाकून त्यांचे वतनाचे वाटे झाले.

3कारण दोन वंशास व अर्ध्या वंशास मोशेने यार्देनेच्या पलीकडे वतन दिले होते, परंतु त्यांच्या बरोबर लेव्यास वतन दिले नाही.

4वास्तविक पाहता योसेफ वंशाचे दोन वंश मनश्शे व एफ्राइम असे होते, आणि लेव्यास देशात त्यांनी वांटा दिला नाही, केवळ वस्तीसाठी नगरे, आणि त्यांच्या पशूसाठी व त्यांच्या मालमतेसाठी त्यांना फक्त काही नगरात त्यांची जागा दिली.

5जशी परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली होती, तसे करून इस्राएल लोकांनी देश वाटून घेतला.

6आणि यहूदा वंशाचे लोक गिलगालात यहोशवाजवळ आले तेव्हा कनिज्जी यफुन्नेचा पुत्र कालेब तो त्यास म्हणाला, कादेशबर्ण्यामध्ये देवाचा माणूस मोशे याला मजविषयी व तुजविषयी काय सांगितले होते ते तुला माहितच आहे.

7परमेश्वराचा सेवक मोशे याने जेव्हा मला कादेशबर्ण्यापासून देश हेरावयाला पाठवले, तेव्हा मी चाळीस वर्षाचा होतो, आणि मला त्या देशाविषयी काय वाटते ती बातमी मी त्याला कळवली.

8पण माझे बंधु जे माझ्या बरोबर वर चढून गेले होते त्यांनी लोकांचे मन घाबरून जाईल असे केले, परंतु मी माझा देव परमेश्वर याला पूर्णपणे अनुसरलो.

9तेव्हा त्याच दिवशी मोशेने शपथ वाहून सांगितले की, ज्या भूमीवर तुझे पाऊल चालले तो खात्रीने तुझा व तुझ्या वंशजाचे वतन असा सर्वकाळ होईल; कारण की तू माझा देव परमेश्वर याला पूर्णपणे अनुसरलास.

10तर आता पाहा इस्राएलाच्या रानांत चालत असता, परमेश्वराने सांगितले होते, तसे त्याने मला या पंचेचाळीस वर्षात जीवंत ठेवले आहे; आणि आता पाहा, मी आज पंचाऐशी वर्षांचा आहे.

11जेव्हा मोशेने मला पाठवले होते, तेव्हाच्या दिवसाप्रमाणे मी आजही सामर्थ्यवान आहे. लढाई करण्याचे व ये जा करण्याचे सामर्थ्य माझ्यात जसे त्या वेळी होते तितकेच आजही आहे.

12तर परमेश्वराने त्या दिवशी ज्या डोंगराळ प्रदेशाविषयी सांगितले, तो हा आता मला दे; कारण त्या दिवशी तू ऐकले होते की, तेथे अनाकी लोक आणि मोठी तटबंदीची नगरे आहेत; तरी पण परमेश्वर माझ्याबरोबर असला तर त्याने सांगितल्या प्रमाणे मी त्यांना वतनातून बाहेर घालवीन.

13तेव्हा यहोशवाने त्याला आशीर्वाद दिला; आणि यफुन्नेचा पुत्र कालेब याला हेब्रोनाचे वतन दिले

14यास्तव कनिज्जी यफुना याचा पुत्र कालेब याचे हेब्रोन वतन आजपर्यंत चालत आहे; कारण की तो इस्राएलाचा देव परमेश्वर याला पूर्ण अनुसरला.

15पूर्वीच्या काळी हेब्रोनाचे नाव किर्याथ आर्बा होते; तो आर्बा अनाकी लोकांमध्ये मोठा माणूस होता; नंतर लढाईपासून देशाला विसावा मिळाला.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Joshua 14 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran