Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  John 10 >> 

1“मी तुम्हाला खचीत खचीत सांगतो, जो मेंढवाड्यांत दारातून न जातां दुसरीकडून चढून जातो, तो चोर आणि लुटारू आहे

2जो दाराने आत जातो तो मेंढपाळ आहे.

3त्याच्यासाठी द्वारपाल दार उघडतो आणि मेंढरे त्याची वाणी ऐकतात. तो आपल्या मेंढरांना ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारतो आणि त्यांना बाहेर नेतो;

4आणि आपली सर्व मेंढरे बाहेर काढल्यावर तो त्यांच्यापुढे चालतो, आणि मेंढरे त्याच्यामागे चालतात; कारण ती त्याचा वाणी ओळखतात.

5ती परक्याच्या मागें कधीच जाणार नाहीत, तर ती त्याच्यापासून पळतील; कारण ती परक्यांची वाणी ओळखीत नाहींत.”

6येशूने त्यांना हा दाखला सांगितला. तरी ज्या गोष्टी तो त्यांच्याबरोबर बोलला त्या काय आहेत हे त्यांना समजले नाही.

7म्हणून येशू त्यांना पुन्हा, म्हणाला मी तुम्हाला खचीत खचीत सांगतो की, मी मेंढरांचे दार आहे.

8जे माझ्या पूर्वी आले ते सर्व चोर आणि लुटारू आहेत, त्याचे मेंढरांनी ऐकले नाही.

9मी दार आहे; माझ्याद्वारे कोणी आत जाईल तर त्याचे तारण होईल; तो आत येईल आणि बाहेर जाईल, आणि त्याला खावयास मिळेल.

10चोर येतो, तो केवळ चोरी, घात व नाश करायला येतो. मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे.

11मी उत्तम मेंढपाळ आहे; उत्तम मेंढपाळ मेंढरांकरिता आपला जीव देतो.

12जो मेंढपाळ नाही तर मोलकरीच आहे आणि ज्याची स्वतःची मेंढरे नाहीत, तो लांडग्याला येत असलेले पाहून मेंढरे सोडून पळून जातो; आणि लांडगा त्यांच्यावर झडप घालून धरतो त्यांची दाणादाण करतो.

13मोलकरी पळून जातो कारण तो मोलकरीच आहे, आणि त्याला मेंढरांची काळजी नाही.

14-15 मी उत्तम मेंढपाळ आहे; आणि, जसा पिता मला ओळखतो आणि मी पित्याला ओळखतो तसे जे माझे आहेत त्यांना मी ओळखतो, आणि जे माझे आहेत ते मला ओळखतात; आणि मी मेंढरांसाठी आपला जीव देतो.

16ह्या मेंढवाड्यातली नाहीत अशी माझी दुसरी मेंढरे आहेत; तीहि मला आणली पाहिजेत, आणि ती माझी वाणी ऐकतील. मग एक कळप आणि एक मेंढपाळ असे होईल.

17मी आपला जीव परत घेण्याकरिता देतो म्हणून पिता माझ्यावर प्रीती करतो.

18कोणी तो माझ्यापासून घेत नाही. तर मी होऊनच तो देतो. मला तो देण्याचा अधिकार आहे, आणि मला तो परत घेण्याचा अधिकार आहे. ही आज्ञा मला माझ्या पित्यापासून मिळाली आहे.”

19म्हणून ह्या शब्दांवरून यहुद्यांत पुन्हा फूट पडली.

20त्यांच्यातील पुष्कळजण म्हणाले, “त्याला भूत लागले आहे, आणि तो वेडा आहे. तुम्ही त्याचे का ऐकता?”

21दुसरे म्हणाले, “ही वचने भूत लागलेल्या मनुष्याची नाहीत. भूताला आंधळ्याचे डोळे उघडता येतात काय?”

22तेव्हा यरुशलेमेंत पुनःस्थापनेचा सण असून हिंवाळा होता.

23आणि येशू मंदिरात शलमोनाच्या देवडीत फिरत होता.

24म्हणून यहूदी त्याच्याभोवती जमले आणि त्याला म्हणाले, “आपण कोठवर आमची मने संशयात ठेवणार? तुम्ही ख्रिस्त असाल तर आम्हास उघडपणे सांगा.”

25येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हाला सांगितले तरी तुम्ही विश्वास ठेवत नाही. मी माझ्या पित्याच्या नावाने जी कामें करतो ती माझ्याविषयी साक्ष देतात.

26तरी तुम्ही विश्वास ठेवत नाही, कारण तुम्ही माझ्या मेंढरांपैकी नाही.

27माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो, आणि ती माझ्यामागें येतात.

28मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो; त्यांचा कधीही नाश होणार नाही, आणि कोणी त्यांना माझ्या हातातून हिसकून घेणार नाही.

29पित्याने मला जे दिले ते सर्वांहून मोठे आहे, आणि पित्याच्या हातातून ते कोणी हिसकून घेऊ शकत नाही.

30मी आणि पिता एक आहो.”

31तेव्हा यहुद्यांनी त्याला दगडमार करायला पुन्हा दगड उचलले.

32येशू त्यांना म्हणाला, “मी माझ्या पित्याकडची पुष्कळ चांगली कामें तुम्हाला दाखवलीत. त्या कामांतील कोणत्या कामाकरता तुम्ही मला दगडमार करता?”

33यहुद्यांनी त्याला उत्तर दिले, “आम्ही चांगल्या कामासाठी तुला दगडमार करीत नाही, पण दुर्भाषणासाठी; आणि, कारण तू मनुष्य असून तू स्वतःला देव म्हणवितो.”

34येशूने त्यांना म्हटले, ‘तुम्ही देव आहा’, असे मी म्हणालो हे तुमच्या शास्त्रात लिहिले नाही काय?

35ज्यांना देवाचे वचन प्राप्त झाले त्यांना जर त्याने देव म्हटले, आणि शास्त्रलेखाचा भंग होत नाही,

36तर ज्याला पित्याने पवित्र कार्यास्तव नेमून जगात पाठवले, त्या मला, मी देवाचा पुत्र आहे असे म्हटल्यावरून तुम्ही ‘दुर्भाषण करता’ असे तुम्ही म्हणता काय?

37मी जर माझ्या पित्याची कामें करीत नसेन तर माझ्यावर विश्वास ठेवू नका.

38पण जर मी ती करीतो तर माझ्यावर विश्वास न ठेवला तरी त्या कामांवर विश्वास ठेवा. अशासाठी की, माझ्यामध्ये पिता आहे आणि पित्यामध्ये मी आहे.”हे तुम्ही आेळखून घ्यावे.

39ते त्याला पुन्हा धरावयास पाहू लागले, परंतु तो त्यांच्या हाती न लागता निघून गेला.

40मग तो पुन्हा यार्देनेच्या पलीकडे जेथे योहान पहिल्याने बाप्तिस्मा करीत असे त्याठिकाणी जाऊन राहिला.

41तेव्हा पुष्कळ लोक आले; ते म्हणाले, , “योहानाने काही चिन्ह केले नाही, खरे तरी योहानाने ह्याच्याविषयी जे काही सांगितले ते सर्व खरे आहे.”

42तेथे पुष्कळ जणांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  John 10 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran