Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Revelation 9 >> 

1मग पाचव्या देवदूताने कर्णा वाजवला, तेव्हा एक तारा आकाशातून पृथ्वीवर पडलेला मला दिसला; त्या ताऱ्याला अगाधकूपाची (खोल असा खड्डा ज्याला शेवट नाही) चावी दिली होती.

2त्याने अगाधकूप उघडला, तेव्हा मोठ्या भट्टीच्या धुरासारखा धूर कूपातून निघून वर चढला आणि कूपाच्या धुराने सूर्य आणि अंतराळ ही अंधकारमय झाली.

3त्या धुरातून टोळ निघून पृथ्वीवर आले आणि जशी पृथ्वीवरील विंचवास शक्ती आहे तशी त्यांना शक्ती दिली होती.

4यांना असे सांगितले होते की, पृथ्वीवरील गवत व कोणतीही हिरवळ व झाड यांना हानी करू नका. परंतु ज्या माणसांच्या कपाळांवर शिक्का नाही त्यांना मात्र इजा करा.

5त्या लोकांना जिवे मारण्याची परवानगी त्यांना दिलेली नव्हती, तर फक्त पाच महिने यातना देण्यास सांगितले. विंचू माणसाला नांगी मारतो तेव्हा त्याला जी वेदना होते त्या वेदनेसारखी ती होती.

6त्यादिवसात माणसे मरण शोधतील, परंतु ते त्यांना मिळणार नाही, ते मरणासाठी अती उत्सुक होतील, परंतु मरण त्यांच्यापासून दूर पळेल.

7टोळांचे आकार लढाईसाठी तयार केलेल्या घोड्यांसारखे होते. त्यांच्या डोक्यावर जणू काय सोन्यासारखे मुगूट होते, आणि त्यांचे चेहरे माणसांच्या चेहऱ्यासारखे होते.

8त्यांचे केस स्त्रियांच्या केसांसारखे होते, आणि त्यांचे दात सिंहाच्या दातांसारखे होते.

9त्यांना उरस्त्राणे होती, ती लोखंडी उरस्त्राणांसारखी होती, आणि त्यांच्या पंखाचा आवाज लढाईस धावणाऱ्या पुष्कळ घोड्यांच्या रथांच्या आवाजासारखा होता.

10त्यांना विंचवांसारखी शेपटे व नांग्या आहेत आणि माणसांस पाच महिने हानी करण्याची त्यांची शक्ती त्यांच्या शेपटात आहे.

11अगाधकूपाचा दूत तो त्यांच्यावर राजा आहे; त्याचे नाव इब्री भाषेत अबद्दोन आहे आणि ग्रीक भाषेत त्याचे नाव अपल्लूओन आहे.

12पहिला अनर्थ होऊन गेला, पाहा, यापुढे आणखी दोन अनर्थ येतात.

13मग सहाव्या देवदूताने कर्णा वाजवला, तेव्हा देवासमोरच्या सोन्याच्या वेदीच्या चार शिंगामधून आलेली एक वाणी मी एेकली.

14ज्या सहाव्या देवदूताजवळ कर्णा होता त्याला ती वाणी म्हणाली, मोठ्या फरात नदीजवळ बांधून ठेवलेले जे चार दूत त्यांना मोकळे सोड.

15तेव्हा माणसांपैकी तिसरा भाग जिवे मारायला तो नेमलेला तास व दिवस व महिना व वर्ष यांसाठी जे चार दूत तयार केलेले होते ते सोडण्यात आले.

16घोडदळांची संख्या वीस कोटी होती, ही त्यांची संख्या मी एेकली.

17त्या दृष्टांन्तात घोडे व त्यावर बसलेले स्वार मला दिसले ते असे, त्यांना अग्नी व नीळ व गंधक यासारखी उरस्राणे होती, आणि त्या घोड्यांची डोकी सिंहाच्या डोक्यांसारखी होती, आणि त्यांच्या तोंडातून अग्नी व धूर व गंधक ही निघत होती.

18त्यांच्या तोंडातून निघणाऱ्या धूर व अग्नी व गंधक या तीन पीडांनी माणसांचा तिसरा हिस्सा जिवे मारला गेला.

19कारण त्या घोड्यांची शक्ती त्यांच्या तोंडात व शेपटात आहे. त्यांची शेपटे सापासारखी असून त्यांनाही डोकी आहेत, आणि त्यांनी ते माणसांना जखमा करून पीडा देतात.

20त्या पीडांमुळे जे जिवे मारले गेले नाहीत अशा बाकीच्या माणसांनी आपल्या हातच्या कृत्यांविषयी पश्चाताप केला नाही, म्हणजे, भूतांची व ज्यास पाहता, एेकता व चालता येत नाही अशा सोन्याच्या, रूप्याच्या, पितळेच्या, दगडाच्या व लाकडाच्या मूर्तीची पूजा करणे त्यांनी सोडले नाही.

21आणि त्यांनी केलेल्या खुनाविषयी जादूटोणा, जारकर्म, व चोऱ्या ह्यांबद्दलहि पश्चाताप केला नाही.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Revelation 9 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran