Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Revelation 13 >> 

1(12-18) आणि तो अजगर समुद्राच्या वाळूवर उभा राहिला. (13-1) आणि मी बघितले की, एक पशू समुद्रातून वर आला. त्याला दहा शिंगे आणि सात डोकी होती. त्याच्या शिंगांवर दहा मुगुट होते व त्याच्या डोक्यांवर देवाचा अपमान करणारी नावे होती.

2आणि मी पाहिलेला पशू तो चित्त्यासारखा होता, त्याचे पाय अस्वलाच्या पायासारखे व त्याचे तोंड सिंहाच्या तोंडासारखे होते. त्याला अजगराने आपली शक्ती आणि सिंहासन दिले आणि मोठा अधिकार दिला.

3त्या पशूच्या डोक्यापैकी, त्याच्या एका डोक्याला जीवघेणी जखम झाली होती, त्यामुळे तो मरून जाईल असे वाटले. पण त्याची ती जखम बरी झाली, आणि सर्व पृथ्वी आश्चर्य करीत त्या पशूच्यामागे गेली.

4आणि त्यांनी अजगराला नमन केले, कारण त्याने आपला अधिकार त्या पशूला दिला होता; आणि त्यांनी त्या पशूलाही नमन करून म्हटले, ‘ह्या पशूसारखा कोण आहे? ह्याच्याशी कोण लढू शकेल?’

5आणि, त्या पशूला मोठ्या गर्विष्ठ गोष्टी व अपमानास्पद शब्द बोलणारे तोंड दिले होते; आणि त्याला हे करायला बेचाळीस महिने अधिकार दिला होता.

6त्या पशूने देवाविरुध्द त्याच्या नावाविषयी, त्याच्या मंडपाविषयी, आणि स्वर्गात राहणार्‍यांविषयी निंदा करायला आपले तोंड उघडले.

7आणि पवित्र जनांशी लढाई करण्यास, आणि त्यांच्यावर विजय मिळवण्यास त्या पशूला परवानगी देण्यात आली आणि त्याला प्रत्येक वंश, लोक, भाषा बोलणार्‍यांवर आणि राष्ट्रांवर अधिकार दिलेला होता.

8आणि ज्यांची नावे जगाच्या स्थापनेपासून वधलेल्या कोकर्‍याच्या जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली नाहीत असे पृथ्वीवर राहणारे सर्व जण त्या पशूला नमन करतील.

9जर कोणाला कान असेल तर तो ऐको.

10जो कैदेत जायचा तो कैदेत जाताे; जो तलवारीने जीवे मारील त्याला तलवारीने मरणे भाग आहे. ह्यात पवित्र जनांची सहनशिलता आणि विश्वास दिसून येतो.

11आणि मी बघितले की, आणखी एक पशू भूमीतून वर येत आहे. त्याला कोकर्‍यासारखी दोन शिंगे होती, आणि तो अजगरासारखा बोलत होता.

12तो पहिल्या पशूची सर्व सत्ता त्याच्यासमक्ष स्वतः चालवतो; आणि ज्या पहिल्या पशूची जीवघेणी जखम बरी झाली होती त्याला पृथ्वीने व तीवर राहणार्‍यांनी नमन करावे असे तो करतो.

13तो मोठी चिन्हे करतो; आणि लोकांच्या दृष्टीपुढे आकाशातून पृथ्वीवर अग्नी उतरेल असे तो करतो,

14आणि त्याला त्या पशूच्या देखत जी चिन्हे करायची मुभा आहे ती करून दाखवून तो पृथ्वीवर राहणार्‍यांना फसवतो आणि ज्या पशूला तरवारीचा घाव लागला असताही जो जिवंत आहे त्याची त्यांनी मूर्ती करावी असे तो पृथ्वीवर राहणार्‍यांस सांगतो.

15दुसऱ्या पशूला, पहिल्या पशूच्या मूर्तीला जीवन देण्याची परवानगी होती. म्हणजे त्या पशूच्या मूर्तीने बोलावे, आणि असे करावे की, जितके लोक त्या पशूच्या मूर्तीला नमन करणार नाहीत तितक्यांना जिवे मारले जावे.

16आणि तो असे करतो की, लहान व मोठे, धनवान व दरिद्री, स्वतंत्र व दास, अशा सर्वांनी आपल्या उजव्या हातावर किंवा कपाळांवर एक खूण घ्यावी,

17आणि ती खूण म्हणजे त्या पशूचे नाव किंवा त्याच्या नावाची संख्या आहे, त्याच्यावाचून इतर कोणाला काही विकत घेता येऊ नये किंवा विकता येऊ नये.

18येथे ज्ञानीपणच आहे; ज्याला बुध्दी असेल त्याने पशूच्या संख्येचा हिशोब करावा. कारण, ती एका मनुष्याची संख्या आहे, आणि त्याची संख्या सहाशे सहासष्ठ आहे.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Revelation 13 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran