Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Deuteronomy 16 >> 

1अबीब महिन्यात लक्षात ठेवून तुमचा देव परमेश्वराप्रित्यर्थ वल्हांडण हा सण साजरा करा. कारण याच महिन्यात तुमचा देव परमेश्वर याने तुम्हाला रात्रीच्या वेळी मिसरदेशातून बाहेर काढले.

2परमेश्वराने आपल्या निवासासाठी निवडलेल्या जागी जा. तेथे वल्हांडणाचा यज्ञपशू परमेश्वराला अर्पण करा. शेळ्यामेंढ्या किंवा गाय बैल यापैकी हा पशू असावा.

3त्यावेळी खमीर घातलेली भाकर खाऊ नका. बेखमीर भाकरी तुम्ही सात दिवस खावी. ही भाकरी म्हणजे दु:ख स्मरणाची भाकर होय. त्याने तुम्हाला मिसरमधील कष्टांची जन्मभर आठवण राहील. किती गडबडीने तुम्हाला तो देश सोडावा लागला होता! त्याचा तुम्ही आमरण विसर पडू देऊ नका.

4तेव्हा या सात दिवसात देशभर कुणाच्याही घरी खमीर दिसता कामा नये. तसेच पहिल्या दिवशी संध्याकाळी जो बळी द्याल तो सुर्याेदयापुर्वी खाऊन संपवून टाका.

5वल्हांडणाच्या पशूचे यज्ञार्पण तुमचा देव परमेश्वर याने तुम्हाला वस्तीसाठी दिलेल्या कोणत्याही नगराच्या आत करु नका.

6देव आपले निवासस्थान निवडील तेथेच व सुर्य अस्त होण्याच्या वेळीच ते केले पाहिजे. मिसरमधून परमेश्वराने तुम्हाला बाहेर काढल्याप्रित्यर्थ वल्हांडण सण आहे.

7तुझा देव परमेश्वर जे स्थान निवडील तेथेच हा यज्ञपशू शिजवून खा. मग सकाळी आपापल्या घरी परत जा.

8सहा दिवस बेखमीर भाकर खा. सातव्या दिवशी कोणतेही कामकाज करु नये. या दिवशी तुमचा देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ पवित्र मेळा भरवावा.

9पीक काढल्यापासून सात आठवडे मोजा उभ्या पिकाला विळा लागल्यापासून सात आठवडे मोजा.

10मग, आपल्या खुशीने एखादी विशेष भेटवस्तू आणून आपला देव परमेश्वर याच्यासाठी सप्ताहांचा सण साजरा करा. आपल्याला परमेश्वर देवाच्या कृपेने किती मिळाले याचा अंदाज घेऊन किती द्यायचे ते ठरवा.

11परमेश्वराने निवडलेल्या त्याच्या विशेष निवासस्थानी जा. तेथे तुमचा देव परमेश्वर याच्या सान्निध्यात सहकुटुंब सहपरिवार आनंदात वेळ घालवा. आपली मुलेबाळे, दास, गावातील लेवी, परके, अनाथ, विधवा या सर्वांना बरोबर घ्या.

12तुम्ही मिसरमध्ये दास होता हे विसरु नये म्हणून. हे विधी न चुकता पाळा.

13खळयातील आणि द्राक्षकुंडामधील उत्पन्न जमा केल्यावर सात दिवसांनी मंडपाचा सण साजरा करा.

14हा सणही मुले आणि मुली, दासदासी, लेवी, शहरातील वाटसरु, परके, अनाथ, विधवा, यांच्यासह साजरा करा.

15तुमचा देव परमेश्वर याने निवडलेल्या निवासस्थानी, त्याच्या सन्मानार्थ सात दिवस हा सण साजरा करा. तुमच्या पिकांवर आणि तुम्ही घेतलेल्या कष्टांवर तुमचा देव परमेश्वर याची कृपादृष्टि आहे. तेव्हा आनंदात राहा.

16तुमचा देव परमेश्वर याच्या पवित्र निवासस्थानी तुम्हातील सर्व पुरुषांनी वर्षातून तीनदा एकत्र जमले पाहिजे. बेखमीर भाकरीचा सण, सप्ताहांचा सण आणि मंडपाचा सण हे ते तीन प्रसंग होत. येताना प्रत्येकाने भेटवस्तू आणली पाहिजे.

17प्रत्येकाने यथाशक्ति दिले पाहिजे परमेश्वराने आपल्याला काय आशीर्वाद दिला याचा विचार करून आपण काय द्यायचे ते ठरवावे.

18तुमचा देव परमेश्वर याने तुम्हाला दिलेल्या नगरांमध्ये आपापल्या वंशाप्रमाणे न्यायाधीश व अधिकारी यांच्या नेमणुका कराव्यात. या व्यक्तींनी नीतीने न्यायदान करावे.

19त्यांनी नेहमी नि:पक्षपाती असले पाहिजे. त्यांनी लाच घेऊन न्यायनिवाडा करता कामा नये. पैसे पाहून भल्या भल्यांचेही डोळे फिरतात व ते निरपराध लोकांच्या म्हणण्याचा विपर्यास करतात.

20चांगुलपणा आणि नि:पक्षपातीपणा यांचीच नेहमी कास धरावी. म्हणजे तुमचा देव परमेश्वर याने तुम्हाला दिलेला हा प्रदेश संपादन करून तेथे तुम्ही सुखाने राहाल.

21जेव्हा तुमचा देव परमेश्वर यासाठी तुम्ही वेदी उभाराल तेव्हा तिच्याशेजारी अशेरा देवीच्या सन्मानार्थ लाकडी स्तंभ उभारु नका.

22कोणत्याही खोट्या दैवतांसाठी स्तंभ उभारु नका. तुमचा देव परमेश्वर ह्याला अशा गोष्टींचा तिरस्कार वाटतो.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Deuteronomy 16 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran