Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Deuteronomy 13 >> 

1स्वप्नांचे अर्थ सांगणारा एखादा संदेष्टा तुमच्याकडे एखाद्या वेळी येईल. आपण काही चिन्ह, किंवा चमत्कार दाखवतो असे तो म्हणेल.

2कदाचित् त्या चिन्हाचा तुम्हाला पडताळा येईल किंवा चमत्कार खराही ठरेल. मग तो, तुम्हाला अपरिचित अशा इतर दैवतांची सेवा करायला सुचवेल.

3तरी त्या संदेष्टयाचे किंवा स्वप्न पाहणाऱ्याचे ऐकू नका. कारण तुम्ही आपला देव परमेश्वर ह्यांच्यावर संपुर्ण मनाने व संपुर्ण जिवाने प्रीती करता कि नाही हे पाहण्यासाठी तुमचा देव परमेश्वर तुमची परीक्षा पाहात असेल.

4तेव्हा तुम्ही आपल्या परमेश्वर देवालाच अनुसरा. त्याचे भय बाळगावे त्याच्या आज्ञा पाळाव्या. त्याची वाणी ऐकावी, त्याची सेवा करावी आणि त्यालाच बिलगूण राहावे.

5तसेच त्या संदेष्ट्याला किंवा स्वप्न सांगणाऱ्याला ठार मारा. कारण तुमचा देव परमेश्वर याने तुम्हाला मिसर देशात गुलाम होता तेव्हा आपल्याला तेथून सोडवले आहे. परमेश्वर देवाने आज्ञा देऊन नेमून दिलेल्या जीवनमार्गापासून हा माणूस तुम्हाला दूर नेतो म्हणून आपल्यामधून तुम्ही ह्या दुष्टाईचे निर्मूलन करा.

6तुमच्या निकटची एखादी व्यक्ती हळूच तुम्हांला दुसऱ्या दैवताच्या भजनी लावायचा प्रयत्न करील. ही व्यक्ति म्हणजे तुमचा सख्खा भाऊ, मुलगा, मुलगी, प्रिय पत्नी, किंवा जिवलग मित्रही असू शकतो. तो म्हणेल, चल आपण या दुसऱ्या दैवताची पूजा करु. (तुझ्या किंवा तुझ्या पूर्वजांच्या ऐकण्यातही नसलेले हे दैवत असेल

7मग ते देव तुमच्या भोवताली जवळपास किंवा लांब राहणारे अासपासच्या किंवा दुर राष्ट्राचे असोत.

8त्या व्यक्तीच्या म्हणण्याला मान्यता देऊ नका. त्याचे ऐकू नका. त्याची गय येऊ देऊ नका. त्याला मोकळा सोडू नका. तसेच त्याला लपवू नका.

9त्याला ठार करा. त्याला दगडांनी मारा. पहिला दगड तुम्ही उचला आणि मारायला सुरुवात करा. मग इतर जण त्याला दगडांनी मारतील.

10मरेपर्यंत त्याला दगडमार करावा; कारण मिसरमधून ज्याने तुम्हाला दास्यातून सोडवले त्या परमेश्वर देवापासूनच हा तुम्हाला बहकवायचा प्रयत्न करत आहे.

11ही गोष्ट सर्व इस्राएलांच्या कानावर गेली की ते ही भीति वाटेल, आणि अशी दुष्कृत्ये करायला धजावणार नाहीत.

12तुम्हाला राहण्याकरता तुमचा देव परमेश्वर नगरे देईल. त्यापैकी एखाद्या नगरातून तुमच्या कानावर वाईट बातमी येईल. ती अशी की

13तुमच्यापैकीच काही नीच माणसे आपल्यापैकी काही जणांना कुमार्गाला लावत आहेत. आपण अन्य दैवतांची सेवा करु या अस म्हणून त्यांनी नगरातील लोकांना बहकावले आहेत. (ही दैवते तुम्हाला अपारिचित असतील.)

14असे काही कानावर आल्यास ते खरे आहे की नाही याचा आधी पूर्ण शहानिशा करून घ्या. ते खरे निघाले, असे काही भयंकर घडल्याचे सिद्ध झाले

15तर त्या नगरातील लोकांना त्याचे शासन द्या. त्या सर्वांचा तलवारीने वध करा. त्यांच्या जनावरांनाही शिल्लक ठेवू नका. ते शहर पूर्णपणे उध्वस्त करा.

16मग तेथील सर्व मौल्यवान वस्तू गोळा करून शहराच्या मध्यभागी आणा. आणि त्याचबरोबर सर्व शहर बेचिराख करून टाका. तो आपल्या परमेश्वराचा होमार्पण असेल. ते शहर पुन्हा कधीच वसवता कामा नये.

17ते नगर नाश करायला परमेश्वराच्या हवाली केले जावे म्हणून त्यातील कोणतीही वस्तू स्वत:साठी ठेवून घेऊ नका. ही आज्ञा ऐकलीत तर परमेश्वराचा तुमच्यावरचा क्रोध ओसरेल. त्याला तुमची दया येईल तुमच्याबद्दल प्रेम वाटेल तुमच्या पूर्वजांना त्याने कबूल केल्याप्रमाणे त्याच्याकृपेने तुमच्या देशाची भरभराट होईल. नगरे उध्वस्त करण्याविषयी

18तुमचा देव परमेश्वर याचे ऐकलेत, त्याच्या आज्ञा पाळल्यात तरच हे घडेल. तेव्हा तुमचा देव परमेश्वर याच्या दृष्टीने जे योग्य तेच तुम्ही करा.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Deuteronomy 13 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran