Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Deuteronomy 12 >> 

1परमेश्वर हा तुमच्या पूर्वजांचा देव आहे. त्याने दिलेल्या प्रदेशात तुम्ही हे विधी व नियम यांचे पालन काटेकोरपणे जिवंत राहाल तोपर्यंत काळजीपूर्वक पाळा.

2आता तेथे असलेल्या ज्या राष्ट्रांना ताब्यात घेणार आहात. त्यातले लोक ज्या ठिकाणी, उंच पर्वत, टेकड्यांवर, आणि हिरवीगार झाडी अशा बऱ्याच ठिकाणी आपल्या देवाची उपासना करीत असतील त्या सर्वांचा अवश्य नाश करा.

3तुम्ही तेथील वेद्या मोडून टाका, दगडी स्मारकस्तंभांचा विध्वंस करा. अशेरा मूर्ति जाळा, त्यांच्या दैवतांच्या कोरीव मूर्तीची मोडतोड करा. म्हणजे त्याठिकाणी त्यांची नावनिशाणीही उरणार नाही.

4ते लोक करतात तशी तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याची उपासना करु नका.

5तुमचा देव परमेश्वर तुमच्या सर्व वंशातून एक स्थान निवडून घेईल. आपल्या नावाची स्थापना तेथे करील. ते त्याचे खास निवासस्थान असेल. तेथे तुम्ही उपासनेसाठी जात जा.

6तेथे तुम्ही आपापले होमबली, यज्ञबली, आपल्या पिकांचा व जनावरांचा एक दशांश हिस्सा, काही खास भेटी, नवस फेडण्याच्या वस्तू, खुशीने अर्पण करायच्या वस्तू तसेच आपल्या पाळीव प्राण्यांना झालेला पहिला गोऱ्हा तुम्ही आणा.

7आपल्या कुटुंबियासमवेत तुमचा देव परमेश्वर याच्या सान्निध्यात तुम्ही तेथे भोजन करा. तुम्ही कष्ट करून जे मिळवलेत त्याच्या आनंदात तेथे तुम्ही सर्वजण सामील व्हा. तुमचा देव परमेश्वर याच्या आशीर्वादाने तुम्हाला सर्व गोष्टी मनासारख्या मिळत आहेत याची आठवण ठेवा.

8आतापर्यंत आपण सगळे आपल्या मनाला वाटेल तशी उपासना करत आलो तशी आता करु नका.

9कारण तुमचा देव परमेश्वर देत असलेले हे विसाव्याचे व वतनाचे ठिकाण अजून मिळाले नव्हते.

10पण आता तुम्ही यार्देन नदीपलीकडे परमेश्वर देणार असलेल्या देशात जाऊन राहणार आहात. तेथे तुम्हाला सर्व शत्रूंपासून अभय मिळेल. तुम्हाला स्वस्थता लाभेल.

11मग परमेश्वर एका ठिकाणी आपले खास निवासस्थान निवडेल. त्याला तो आपले नाव देईल. तिथे तुम्ही मी सांगतो त्या सर्व वस्तू घेऊन जा-होमबली, यज्ञबली, धान्याचा व प्राण्यांचा दहावा हिस्सा, परमेश्वराला अर्पण करायच्या वस्तू, नवस फेडायच्या वस्तू आणि पाळीव पशुपक्षी यांचा पहिला गोऱ्हा.

12येताना आपली मुलेबाळे, दासदासी, या सर्वांना या ठिकाणी घेऊन या. तुमच्या वेशींच्या आत राहणाऱ्या लेवींनाही बरोबर आणा (कारण त्यांना जमिनीत व वतनात तुमच्याबरोबर वाटा नाही) सर्वांनी मिळून तुमचा देव परमेश्वर याच्या सान्निध्यात आनंदात वेळ घालवा.

13आपले होमबली वाटेल त्याठिकाणी अर्पण करु नका त्याविषयी सावध असा.

14परमेश्वर तुमच्या वंशाच्या वतनात अशी एक पवित्र जागा निवडील. तेथेच तुम्ही हे होमबली अर्पण करा व ज्या ज्या इतर गोष्टीविषयी मी तुला आज्ञा करत आहे त्या सर्व तेथे कराव्या.

15तथापी, तुम्ही राहता तेथे हरीण, सांबर असे कोणतेही चांगले प्राणी मारुन खाऊ शकता. तुला तुझा देव परमेश्वर याने आशीर्वाद दिल्याप्रमाणे हवे तितके खा. हे मांस शुद्ध, अशुद्ध अशा कोणत्याही लोकांनी खावे.

16फक्त त्यातले रक्त तेवढे खाऊ नका. ते पाण्यासारखे जमीनीवर ओतून टाका.

17आपण राहतो तेथे काही गोष्टी खाणे निषिद्ध आहे. त्या म्हणजे, देवाच्या वाट्याचे धान्य, नवीन द्राक्षारस, तेल, कळपातील पहिला गोऱ्हा, देवाला स्वखुशीने अर्पण करायच्या वस्तू नवस फेडण्याच्या गोष्टी, आणखी काही देवाला अर्पण करायच्या खास गोष्टी वगैरे.

18या गोष्टी तुमचा देव परमेश्वर जे स्थान निवडील तेथेच आणि त्याच्या समवेत खाव्या. आपली मुलेबाळे, दासदासी, वेशीच्या आतील लेवी यांना बरोबर घेऊन तिथे जाऊन त्या खा. जी काम पार पाडली त्याबद्दल तुमचा देव परमेश्वर याच्या सान्निध्यात आनंद व्यक्त करा.

19या देशात राहाल तितके दिवस या सगळ्यात लेवींना न चुकता सामील करून घ्या.

20तुमच्या देशाच्या सीमा वाढवायचे तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हाला वचन दिले आहे. तसे झाले की त्याने निवडलेली जागा तुमच्या राहत्या घरापासून लांब पडेल.

21तेव्हा मांसाची गरज पडली की जे मिळेल ते मांस तुम्ही खा. परमेश्वराने दिलेल्या पशुपक्ष्यांच्या कळपातील कोणताही प्राणी मारलात तरी चालेल. मी आज्ञा दिल्याप्रमाणे तुम्ही राहत्या जागी हे मांस हवे तेव्हा खा.

22हरीण किंवा सांबर यांच्याप्रमाणेच हे खा. शुद्ध, अशुद्ध कोणीही व्यक्तिने ते खावे.

23पण रक्त मात्र खाण्यात येऊ देऊ नका. कारण रक्त म्हणजे जीवन आहे. ज्या मांसात जीवनाचा अंश आहे ते खाणे कटाक्षाने टाळा.

24रक्त सेवन करु नका. ते पाण्यासारखे जमिनीवर ओतून टाका.

25परमेश्वराच्या दृष्टिने जे योग्य तेच तुम्ही करावे म्हणजे तुमचे व तुमच्या वंशजांचे कल्याण होईल.

26देवाला काही विशेष अर्पण करायचे ठरवले तर तुमचा देव परमेश्वर याने निवडलेल्या त्याच्या जागी तुम्ही जावे. नवस बोललात तर तो फेडायलाही तेथे जा.

27आपले होमबली म्हणजे मांस व रक्त तेथे तुझा देव परमेश्वर याच्या वेदीवर अर्पण करा. इतर बळीचे रक्त वेदीवर वाहा. मग त्याचे मांस खा.

28मी दिलेल्या या सर्व आज्ञांचे पालन काळजीपूर्वक करा. जे तुमचा देव परमेश्वर ह्याच्या दृष्टिने चांगले व उचित आहे ते केल्याने तुमचे व तुमच्या मुलाबाळांचे निरंतर कल्याण होईल.

29तुम्ही दुसऱ्यांच्या जमिनीवर ताबा मिळवणार आहात. तुमचा देव परमेश्वर तुमच्यासाठी त्या राष्ट्राचा पाडाव करील. तेव्हा तेथील लोकांना हुसकावून तुम्ही तेथे राहाल.

30एवढे झाल्यावर एक खबरदारी घ्या. त्यांचा पाडाव झाल्यावर तुम्हालाच त्यांचे अनुकरण करण्याचा मोह होईल. आणि त्यांच्या देवांच्या भजनी लागाल. तेव्हा सावध राहा. त्यांच्या दैवतांच्या नादी लागू नका. या राष्ट्रानी ज्याप्रकारे सेवा केली तशीच मी आता करतो असे मनात आणू नका.

31तुमचा देव परमेश्वर याच्या बाबतीत तसे करु नका. कारण परमेश्वराला ज्या गोष्टींचा तिटकारा आहे त्या सर्व गोष्टी हे लोक करतात. ते परमेश्वर देवाकरिता आपल्या मुलाबाळांचा होमसुद्धा करतात.

32तेव्हा मी सांगतो तेच कटाक्षाने करा. त्यात अधिक उणे करु नका.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Deuteronomy 12 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran