Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Ruth 2 >> 

1आणि नामीच्या नवऱ्याचा एक नातेवाईक होता. तो अलीमलेख याच्या कुळांतला असून मोठा धनवान माणूस होता. त्याचे नाव बवाज असे होते.

2आणि मवाबी रूथ नामीला म्हणाली, मला शेतात जाऊ दे, म्हणजे ज्याची कृपादृष्टी माझ्यावर होईल त्याच्यामागून मी धान्याचा सरवा वेचीत जाईन. तेव्हा तिने म्हटले जा, माझ्या मुली.

3मग ती निघून शेतात गेली, आणि कापणी करणाऱ्यांच्या मागे वेचू लागली, तेव्हा अलीमलेखाच्या कुळातला बवाज याच्या शेताच्या भागात जाण्याची संधी तिला मिळाली.

4आणि पहा, बवाज बेथलेहेम गावातून शेतात परत आला तेव्हा तो कापणी करणाऱ्यास म्हणाला, परमेश्वर तुम्हाबरोबर असो, आणि त्यांनी उत्तर दिले" परमेश्र्वर तुला आशीर्वादित करो. "

5मग बवाज कापणी करणाऱ्यांस म्हणाला ही तरुण मुलगी कोणाची?

6कापणी करणाऱ्यांवर देखरेख करणाऱ्याने म्हटले नामीबरोबर मवाब देशाहून आलेली ही मवाबी मुलगी आहे

7ती मला म्हणाली कृपाकरून कापणी करणाऱ्यांच्या मागून पेंढ्यामधला सरवा मला वेचू दे. ती तेथे येऊन सकाळपासून आतापर्यत वेचीत आहे, थोडा वेळ मात्र ती घरांत बसली होती.

8बवाज रूथेस म्हणाला, मुली, तू माझे ऐकतेस ना? तू दुसऱ्याच्या शेतात सरवा वेचावयास जाऊ नको, येथेच माझ्या तरूण नोकरिणीबरोबर राहा.

9हे ज्या शेताची कापणी करत आहेत त्याकडे नजर ठेवून त्यांच्यामागून जा. मी ह्या माणसास तुला त्रास देऊ नये अशी सूचना दिली आहे ना? आणि तुला तहान लागली तर पाण्याच्या भांड्याकडे जाऊन तरूणांनी जे पाणी भरून ठेवले त्यातील पाणी पी.

10तेव्हा ती बवाजापुढे दंडवत घालून म्हणाली, मज परक्या स्त्रीवर कृपादृष्टी करून माझा समाचार घेतला याचे कारण काय?

11आणि बवाज तिला म्हणाला, तुझा पती मेल्यापासून तू आपल्या सासूशी कशी वागलीस व तू आपल्या आईवडिलांना व जन्मदेश सोडून तुला जे लोक परीचित नाहीत अशा लोकांत तू आलीस ही सविस्तर माहिती मला मिळाली आहे.

12देव तुझ्या कृतीचे फळ तुला देवो. आणि ज्याच्या पंखाचा आश्रय करायला तू आलीस तो परमेश्वर इस्राएलाचा देव याच्यापासून तुला, तो तुला पुरे पारीतोषिक देवो.

13मग ती म्हणाली, माझ्या धन्या आपले उपकार मजवर राहू द्यावे. मी आपल्या कोणत्याहि दासीच्या बरोबरीची नसून आपण मजशी ममतेने बोलून माझे समाधान केले आहे.

14आणि भोजनाच्यावेळी बवाज तिला म्हणाला, इकडे ये, भाकर खा. ह्या कढीत आपली भाकर बुडव. त्या कापणी करणाऱ्यांच्या पंक्तीस ती बसली व त्यांनी तिला हुरडा दिला. तो तिने पोटभर खाल्ल्यावर काही शिल्लक राहिला.

15ती सरवा वेचावयास निघाली तेव्हा बवाजाने आपल्या गड्यास सांगितले, तिला पेढ्यांत वेचू द्या, मना करू नका.

16आणि चालता चालता पेंढ्यातून मूठमूठ टाकत जा. तिला वेचू द्या, तिला धमकावू नका.

17तिने याप्रकारे संध्याकाळपर्यत सरवा झोडिला त्याचे एफाभर सातू निघाले.

18ते घेऊन ती नगरात गेली. तिने काय वेचून आणले ते तिच्या सासूने पाहिले. तसेच तिने पुरे इतके खाऊन उरलेले आणले होते तेही तिला दिले.

19तिच्या सासूने तिला विचारले, आज तू कोठे सरवा वेचला? आणि हे काम कोठे केलेस? ज्याने तुला मदत केली ,त्याचे कल्याण होवो. मग आपण कोणाच्या शेतात काम आज केले ते तिने सासूस सांगितले. ती म्हणाली ज्या माणसाच्या शेतात काम केले त्याचे नाव बवाज.

20नामी आपल्या सुनेस म्हणाली, ज्या देवाने जीवंतावर व मृतांवरहि आपली दया करण्याचे सोडले नाही, तो त्याचे कल्याण करो. नामी तिला आणखी म्हणाली, हा माणूस आपल्या नातलगापैकी आहे, एवढेच नव्हे तर आपले वतन सोडविण्याचा त्यास अधिकार आहे.

21मग मवाबी रूथेने सांगितले की तो मला म्हणाला की माझे गडी सर्व कापणी करत तोपर्यत त्याच्या मागोमाग राहा.

22नामी आपली सून रूथ हिला म्हणाली, मुली, तू त्याच्याच नोकरिणीबरोबर जावे, इतरांच्या शेतात तू लोकांस दिसू नये हे बरे.

23याप्रकारेे सातूचा आणि गव्हाचा हंगाम संपेपर्यत तिने बवाजाच्या नोकराणीबरोबर सरवा वेचला. आणि ती आपल्या सासूबरोबर राहिली.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Ruth 2 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran