Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Lamentations 4 >> 

1सोने कसे निस्तेज झाले! शूद्ध सोने कसे बदलले आहे ! पवित्रस्थानाचे दगड प्रत्येक रस्त्याच्या चौकात विखुरले आहेत.

2सियोनाचे मोलवान मुलगे शुद्ध सोन्याच्या बरोबरीचे होते, पण आता ते कुंभाराच्या हाताने केलेल्या केवळ मडक्याप्रमाणे मानलेले आहेत.

3कोल्हीही स्तन पुढे काढून आपल्या पिल्लांना दुध पाजते. पण माझ्या लोकांची कन्या वाळवंटात राहणाऱ्या शहामृगाप्रमाणे निर्दयी झाली आहे.

4तान्ह्या मुलांची जीभ तहानेने टाळूला चिकटली आहे. बालके भाकर मागतात, पण त्यांना कोणीही भाकर देत नाही.

5जे पूर्वी स्वादिष्ट अन्न खात असत, ते आता रस्त्यावर उपाशी पडले आहेत. जे किरमिजी वस्र घालत असत, त्यांनी आता उकिरड्यांचा आश्रय घेतला आहे.

6सदोमावर कोणी हात टाकला नाही तरी त्याचा अकस्मात नाश झाला, त्याच्या पापांपेक्षा माझ्या लोकांच्या कन्येचे दुष्कर्म मोठे आहे. सदोमाचा व गमोराचा अचानक नाश झाला, आणि त्यात कोणत्याही माणसाचा हात नव्हता.

7तिचे सरदार बर्फा सारखे चकाकत असत व दुधापेक्षा पांढरे होते. ते पोवळयांसारखे कांतीने लाल होते. त्यांचे तेज जणू काही नीलमण्यासारखे होते.

8पण आता त्यांचे चेहरे काजळीपेक्षा काळे झाले आहेत. त्यांना रस्त्यांत कोणी ओळखतसुध्दा नाही. त्यांची कातडी सुरकुतली आणि हाडाला चिकटली आहे. ती लाकडाप्रमाणे शुष्क झाली आहे.

9जे उपासमारीने मेले त्यांच्यापेक्षा जे तलवारीने मेले त्यांचे बरे झाले आहे. कारण उपासमार झालेले फारच दु:खी होते. ते व्याकुळ झाले होते. शेतामधून काहीच न मिळाल्यामुळे ते मेले.

10दयाळू स्त्रीयांच्या हातांनी आपली मुले शिजविली, ती माझ्या लोकांच्या कन्येच्या विनाशसमयी ती त्यांचे अन्न झाली.

11परमेश्वराने आपला क्रोध प्रकट केला. त्यांने आपला संतप्त राग ओतला आहे. त्याने सियोनेत आग लावली आहे व त्या आगीत तिचे आधारस्तंभे जाळून टाकले आहेत.

12पृथ्वीवरील राजांचा व पृथ्वीवरील राहणाऱ्यांचा ह्यावर विश्वास बसला नाही की यरुशलेमच्या प्रवेशद्वारांतून शत्रू किंवा वैरी वेशींत शिरतील.

13असे घडले कारण, तिच्या संदेष्ट्यांनी पाप केले, तिच्या धर्मगुरुंनी दुष्कृत्ये केली, त्यांनी नीतीमान लोकांचे रक्त यरुशलेमामध्ये सांडवले होते.

14ते आंधळयांप्रमाणे रस्त्यात भटकत होते. कोणीही त्यांच्या वस्त्रालाही शिवू शकले नाहीत, कारण ती रक्ताने माखली होती.

15दूर व्हा, “दूर व्हा! अमंगळ लोकहो.” आम्हाला स्पर्श नका करु, असे लोक त्यांना म्हणाले, ते पळून जाउन भटकत राहीले, तेव्हा राष्ट्रांमधील लोक म्हणाले, “त्यांनी आमच्याबरोबर राहू नये.”

16परमेश्वराने आपल्या समोरून त्यांना विखरले आहे, तो पुन्हा त्याच्याकडे पाहणार नाही, याजकांची मर्यादा त्यांनी राखली नाही. त्यांनी वडिलांचा मान राखला नाही.

17मदतीची निरर्थक वाट पाहून आमचे डोळे थकले आहेत. आम्ही आतूरतेने वाट पाहत असता जे राष्ट्र आमचा बचाव करू शकले नाही त्याची वाट आम्ही पाहिली आहे.

18आमच्या शत्रूंनी आमची शिकार केली आणि आम्ही रस्त्यांवरसुध्दा जाऊ शकलो नाही. आमचा शेवट जवळ आला! आमचे आयुष्य सरले होते! आमचा अंत आला आहे!

19आमचा पाठलाग करणारे गरुडापेक्षाही वेगवान होते. त्यांनी आमचा डोंगरांत पाठलाग केला. आम्हाला पकडण्यासाठी ते रानात दडून बसले.

20आमच्या दृष्टीने जो राजा सर्वश्रेष्ठ होता जो परमेश्वराचा अभिषिक्त, आमच्या नाकपूड्यातील श्वास. त्यांच्या खाचेत पकडला गेला. ज्याच्या बद्दल आम्ही असे म्हणालो की, “आम्ही त्याच्या सावलीत राहू. तो इतर राष्ट्रापासून आमचे रक्षण करतो.”

21ऊस देशात राहणाऱ्या अदोमाच्या कन्ये आनंदित हो आणि हर्ष कर. पण लक्षात ठेव की प्याला तुमच्याकडेसुध्दा येईल, तेव्हा तू मस्त होऊण आपणास विवस्त्र करशील.

22सियोन कन्ये, तुझी शिक्षा संपली. आता पुन्हा तुला कैद करून नेले जाणार नाही. अदोमाच्या कन्ये, तुमची पापे उघडी करून परमेश्वर तुम्हाला शिक्षा करील.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Lamentations 4 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran