Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Nehemiah 5 >> 

1तेव्हा माणसांनी आणि त्यांच्या स्रियांनी आपल्या यहूदी बांधवांविरुध्द तक्रार करायला सुरुवात केली.

2त्यांच्यापैकी काहीजण म्हणू लागले, “आम्हाला बरीच अपत्ये आहेत. आम्हाला खायला मिळावे आणि आम्ही जिवंत राहावे यासाठी आम्हांला धान्य तर मिळाले पाहिजे.”

3काहीजण म्हणत होते, “ दुष्काळ आहे. धान्यासाठी आम्हाला आमची शेते, द्राक्षमळे आणि घरे गहाण टाकावी लागत आहेत.”

4आणखी काही म्हणत, “आमची शेते आणि द्राक्षमळे यांच्यावर आम्हाला राजाचा कर लागत आहे. पण तो भरणे परवडत नसल्यामुळे आम्हाला पैसे उसने घ्यावे लागत आहेत.

5ते श्रीमंत लोक पाहा! आम्ही त्यांच्यासारखेच तर आहोत. त्यांच्या अपत्यांसारखीच आमची अपत्ये आहेत. पण आम्हांला आमची अपत्ये गुलाम म्हणून विकावी लागली. काहींना तर आपल्या कन्यांना गुलाम म्हणून विकणे भाग पडलेले आहे. आम्ही असहाय्य आहोत. आमची शेती आणि द्राक्षमळे तर गेलेच. ते आता इतर लोकांच्या मालकीचे आहेत.”

6या तक्रारी ऐकल्या तेव्हा मला अतिशय संताप आला.

7पण मी स्वत:ला शांत केले आणि मग श्रीमंत कुटुंबे आणि कारभारी यांच्याकडे गेलो. त्यांना म्हणालो, “तुम्ही लोकांना जी रक्कम कर्जाऊ देता तिच्यावर व्याज द्यायची तुम्ही या आपल्याच माणसांना बळजबरी करत आहात. ते तुम्ही थांबवले पाहिजे.” मग मी सर्व लोकांना एकत्र बोलावले.

8त्यांना मी म्हणालो, “आपले यहूदी बांधव इतर देशामध्ये गुलाम म्हणून विकले गेले होते. त्यांना पुन्हा विकत घेऊन मुक्त करण्याचे आपण सर्वतोपरी प्रयत्न केले. आणि आता पुन्हा तुम्ही त्यांना गुलामासारखे विकत आहा!”ते श्रीमंत लोक आणि अधिकारी गप्प राहिले. त्यांना काही बोलायला जागा उरली नाही.

9तेव्हा मी त्यांच्याशी बोलत राहिलो. मी म्हणालो, “तुम्ही जे करत आहात ते बरोबर नाही. जी राष्ट्रे आमचे वैरी आहेत त्यांच्या निंदेमुळे तुम्ही देवाविषयी भय आणि आदर बाळगावा हे तुम्ही जाणता. इतर लोकांसारखी लाजिरवाणी कृत्ये तुम्ही करु नयेत.

10तसेच मी, माझे सेवक,माझे भाऊ असे आम्ही त्यांस पैसे आणि धान्य उधार देत आहोत. पण त्यावरचे व्याज त्यांना सक्तीने द्यायला लावणे थांबवले पाहिजे.

11त्यांची शेती, द्राक्षमळे, जैतूनाचे मळे आणि घरे तुम्ही त्यांना आत्ताच्या आत्ता परत करा. त्यांना लावलेले व्याजही तुम्ही परत करा. त्यांना जे पैसे, धान्य, नवीन द्राक्षारस आणि तेल तुम्ही कर्जाऊ दिलेत त्यावर तुम्ही एक टक्का व्याज लावले आहे. ते तुम्ही त्यांना परत करा.”

12यावर ते श्रीमंत लोक आणि अधिकारी म्हणाले, “आम्ही ते परत करु आणि आम्ही त्यांच्याकडून आधिक काही मागणार नाही. नहेम्या, आम्ही तुझ्या म्हणण्यानुसार वागू.”मग मी याजकांना बोलावून घेतले. श्रीमंत लोक आणि अधिकारी जे बोलले त्याप्रमाणे वागण्याचे मी त्यांना देवासमोर वचन द्यायला लावले.

13मग मी आपला पदर झटकून म्हणालो, “आपले वचन जो पाळणार नाही त्या प्रत्येकाची गत देव अशीच करो. देव त्यांना त्यांच्या घरातून झटकून टाकील. ज्यासाठी त्यांनी उद्योग केला ते त्यांच्यापासून हिरावून घेतले जाईल. तो माणूस सर्वस्वाला मुकेल.”माझे सांगून झाले. आणि सर्वजण त्याच्याशी सहमत झाले. ते सर्व म्हणाले, “आमेन!” मग त्यांनी परमेश्वराचे गुणगान केले. आपल्या वचनाप्रमाणे लोक वागले.

14शिवाय, यहूद्यांच्या भूमीवर राज्यपाल म्हणून माझी नेमणूक असतानाच्या त्या काळात मी अथवा माझ्या भाऊबंदांनी राज्यपालाच्या दर्जाचे अन्न घेतले नाही. माझ्या अन्नासाठी लोकांवर कर भरायची सक्त मी केली नाही अर्तहशश्त राजाच्या कारकीर्दीच्या विसाव्या वर्षापासून बत्तिसाव्या वर्षापर्यंत मी अधिकारी होतो. मी यहूदाचा बारा वर्षे अधिकारी होतो.

15पण माझ्या आधी सतेवर असलेल्या राज्यपालांनी लोकांवर बोजा लादित व त्यांच्यापासून भाकरी,द्राक्षाारस घेऊन आणखी प्रत्येकी चाळीस शेकेल रुपे बळजबरीने घेत असत. त्यांचे सेवक देखील लोकांवर अधिकार गाजवत. पण मी तसे केले नाही, कारण मला देवाचे भय होते.

16यरुशलेमेची तटबंदी उभारायला मी कष्ट घेतले. भिंतीचे काम करायला माझी सर्व माणसे एकत्र आली. आम्ही कोणाची जमीन बळकावली नाही!

17शिवाय माझ्या मेजावर मी नेहमीच दीडशे यहूदी यांना अगत्याने जेवायला घालत असे. शिवाय आसपासच्या राष्ट्रातून आलेल्या लोकांनाही मी जेवू घालत असे.

18मेजावर माझ्या पंक्तीला बसणाऱ्यांसाठी म्हणून रोजचे अन्नाचे प्रमाण पुढीप्रमाणे असे: एक बैल, सहा निवडक मेंढरे आणि वेगवेगळया प्रकारचे पक्षी, शिवाय दहा दहा दिवसांच्या अंतराने सर्व प्रकारचे द्राक्षारस माझ्या मेजावर पुरवण्यात येत. तरीही, अधिकाऱ्यासाठी ज्या प्रकारच्या अन्नाची मुभा असते त्याची मागणी मी कधीही केली नाही. माझ्या अन्नाची किंमत म्हणून मी लोकांना कर भरायची सक्ती कधीही केली नाही. लोकांचे काम अतिशय कष्टाचे आहे हे मी जाणून होतो.

19हे माझ्या देवा, जे मी या देशाच्या लोकांकरता केले त्याचे तू स्मरण करून माझे बरे कर.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Nehemiah 5 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran