Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Nehemiah 4 >> 

1आम्ही यरुशलेमचा कोट बांधून काढत आहोत हे सनबल्लटाने ऐकले. तेव्हा तो फार संतापला आणि नाराज झाला. त्याने यहूद्यांचा उपहास करायला सुरुवात केली.

2सनबल्लटाने आपले भाऊबंद आणि शोमरोन येथील सैन्य यांच्या उपस्थितीत, तो म्हणाला, “हे दुबळे यहूदी काय करत आहेत? ते आपणासाठी नगर स्थापित करतील काय? ते यज्ञ करतील काय? एका दिवसात सगळे बांधकाम पुरे करतील काय? या उकिरड्यातून आणि घाणीतून ते पुन्हा दगडांना सजीव करतील काय?”

3तोबीया अम्मोनीची सनबल्लटाला साथ होती. तो म्हणाला, “जर एक लहानसा कोल्हा त्यावर चढून गेला तरी तो ही दगडी भिंत पाडून टाकील.”

4“आमच्या देवा, ऐक. आमचा तिरस्कार होत आहे.त्यांचे टोचून बोलणे त्याच्यांमस्तकी त्यांच्यावर उलट आण. ज्या देशात ते बंदीवासात आहेत त्यांत त्यांची लूट होवो.

5त्यांच्या अपराधांची क्षमा करु नकोस. तसेच तुझ्या डोळयादेखत केलेल्या पापांना क्षमा करु नकोस. त्यांनी बांधकाम करणाऱ्यांसमोर तुला राग आणला आहे.”

6यरुशलेमचा कोट आम्ही बांधला. व सर्व कोट अर्ध्या उंचीपर्यत तयार झाला. लोकांनी मनापासून काम केले म्हणून आम्ही एवढे केले.

7पण सनबल्लट, तोबीया, अरबी, अम्मोनी आणि अश्दोदी यांचा मात्र फार संताप झाला. लोकांनी यरुशलेमच्या भिंतीचे काम सुरुच ठेवले आहे हे त्यांनी ऐकले. भिंतीला पडलेली भगदाडे ते बुजवत आहेत हे ही त्यांच्या कानावर आले.

8तेव्हा यासर्वांनी एकत्र येऊन यरुशलेमाविरुध्द हल्ला करण्याचा कट केला. यरुशलेमेमध्ये गोंधळ उडवण्याचा त्यांनी बेत केला. शहरावर चाल करून येऊन हल्ला करायचे त्यांनी ठरवले.

9पण आम्ही आमच्या देवाची प्रार्थना केली. आणि त्यांना तोंड द्यायला सज्ज असावे म्हणून आम्ही रात्रंदिवस पहारा करण्यासाठी भिंतींवर राखणदार नेमले.

10मग त्यावेळी यहूदी लोक म्हणाले, भार वाहकांची शक्ती कमी झाली आहे. वाटेत खूपच घाण आणि केरकचरा माजला आहे. कोटाचे बांधकाम आम्ही चालू ठेवू शकत नाही.

11आणि आपले शत्रू म्हणतात, “यहूद्यांना काही समजायच्या किंवा दिसायच्या अगोदरच आपण त्यांच्यात शिरकाव केलेला असेल. आपण त्यांना मारुन टाकू म्हणजे कामच थांबेल.”

12मग जे यहूदी त्यांच्याजवळ रहात होते ते चोहोकडून आमच्याकडे दहादा येऊन आमच्याविरूध्द त्यांनी जी योजना केली आहे ती सांगितली.

13तेव्हा मी कोटाभोवतालच्या सर्वात सखल जागांच्या मागे काहीजणांना ठेवले. भिंतीतील भगदाडांजवळ त्यांना ठेवले. आपापल्या तलवारी, भाले आणि धनुष्यांसह वंशाप्रमाणेच मी नेमले.

14सगळी परिस्थिती मी डोळ्याखालून घातली. आणि मग उभा राहून मी महत्वाची घराणी, अधिकारी आणि इतर लोक यांना म्हणालो, “आपल्या शत्रूंची भीति बाळगू नका. लक्षात ठेवा, आमचा प्रभू, परमेश्वर जो महान आणि सामर्थ्यशाली आहे त्याचे स्मरण करा. आपले भाऊबंद मुलगे, मुली यांच्याकरता तुम्ही लढा दिला पाहिजे, आपल्या बायका आणि घरेदारे यांच्यासाठी लढले पाहिजे.”

15आपले बेत आम्हाला कळून चुकले आहेत हे मग आमच्या शत्रूंनी ऐकले. देवाने त्यांचे बेत धुळीला मिळवले हे त्यांना समजले. तेव्हा आम्ही पुन्हा कोटाच्या कामाला लागलो. जो तो आपापल्या ठिकाणी जाऊन आपल्या वाटेचे काम करु लागला.

16त्यादिवसापासून माझ्याकडची निम्मी माणसे तटबंदीची काम करत होती. आणि उरलेले निम्मे लोक भाले, ढाली, धनुष्य, चिलखत यासह राखणीला सज्ज होते. भिंतीचे बांधकाम करणाऱ्या सर्व यहूदी लोकांच्या पाठीमागे सैन्यातील अधिकारी उभे होते.

17बांधकाम करणारे आणि त्यांचे मदतनीस यांच्या एका हातात बांधकामाची अवजारे तर दुसऱ्या हातात शस्त्रे होती.

18तलवार कमरेला बांधूनच प्रत्येकजण बांधकाम करत होता. सावधगिरीच्या इशाऱ्याचे रणशिंग वाजवणारा माणूस माझ्या शेजारीच होता.

19मग मी प्रमुख घराणी, अधिकारी आणि इतर लोक यांच्याशी बोललो. त्यांना मी म्हणालो “ही एक प्रचंड कामगिरी आहे आणि आपण भिंतीलगत विखुरलेलो आहोत. एकमेकापासून लांब अंतरावर आहोत.

20तेव्हा कर्ण्याचा आवाज कानी पडताच त्या ठिकाणी धावत या. तेथे आपण एकत्र गोळा होऊ आणि देवच आपल्यासाठी लढेल.”

21तेव्हा आम्ही यरुशलेमेच्या कोटाचे काम चालूच ठेवले. अर्ध्या लोकांजवळ भाले होते. पहाटेपासून ते थेट रात्री आकाशात चांदण्या दिसूपर्यंत आम्ही काम करत होतो.

22त्यावेळी मी लोकांना असेही म्हणालो, “प्रत्येक बांधकाम करणाऱ्याने आपल्या मदतनीसासह रात्री यरुशलेमेच्या आत राहिले पाहिजे. म्हणजे रात्री ते राखणदार म्हणून आणि दिवसा कामगार म्हणून काम करतील.”

23तेव्हा आमच्यापैकी कोणीही अंगावरचे कपडे उतरविले नाहीत. मी, माझे बंधू, माझी माणसे, आणि माझ्यामागून चालणारे राखणदार कोणीही कपडे उतरीत नसत. आम्ही सर्वजण शस्रे होती घेऊन पाण्याला जात.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Nehemiah 4 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran