Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 119 >> 

1ज्यांचे मार्ग निर्दोष आहेत, जे परमेश्वराच्या नियमशास्राप्रमाणे चालतात ते आशीर्वादित आहेत.

2जे त्याच्या आज्ञा प्रामाणिकपणे पाळतात, जे संपूर्ण मनाने त्याचा शोध घेतात ते आशीर्वादित आहेत.

3ते चुकीचे करीत नाहीत; ते त्याच्या मार्गात चालतात.

4तुझे विधी आम्ही काळजीपूर्वक पाळावे म्हणून तू आम्हाला आज्ञा दिल्या आहेत.

5मी जर नेहमी तुझे नियम पाळण्यासाठी माझी वागणूक व्यवस्थित असावी, हेच माझे मागणे आहे.

6तर मी जेव्हा तुझ्या सर्व आज्ञांचा विचार करीन तेव्हा मी कधीही लाजणार नाही.

7मी जेव्हा तुझे न्याय्य निर्णय शिकेन तेव्हा मी मनःपूर्वक तुला धन्यवाद देईन.

8मी तुझे नियम पाळीन; मला एकट्याला सोडू नकोस.

9तरुण माणूस आपला मार्ग कशाने शुध्द राखील? तुझ्या वचनाचे पालन करण्याने.

10मी आपल्या मनापासून तुझा शोध केला आहे; तुझ्या आज्ञांपासून मला बहकू देऊ नकोस.

11मी तुझ्याविरुध्द पाप करू नये म्हणून तुझे वचन आपल्या हृदयात साठवून ठेवले आहे.

12हे परमेश्वरा, तू धन्य आहेस; मला तुझे नियम शिकव.

13मी आपल्या मुखाने तुझ्या तोंडचे सर्व योग्य निर्णय जे तू प्रकट केले ते जाहीर करीन.

14तुझ्या आज्ञेच्या कराराचा मार्ग हीच माझी सर्व श्रीमंती असे मानून मी त्यात अत्यानंद करतो.

15मी तुझ्या नियमांवर मनन करीन आणि तुझ्या मार्गावर लक्ष देईन.

16मी तुझ्या नियमांनी आनंदित होईन; मी तुझे वचन विसरणार नाही.

17आपल्या सेवकावर दया कर याकरता की, मी जिवंत राहावे आणि तुझे वचन पाळावे.

18माझे डोळे उघड म्हणजे तुझ्या नियमशास्रातील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील.

19मी या देशात परका आहे; तुझ्या आज्ञा माझ्यापासून लपवू नकोस.

20तुझ्या योग्य निर्णयांची सतत उत्कंठा धरल्यामुळे माझा जीव चिरडून गेला आहे.

21तू गर्विष्ठांना धिक्कारतोस, तुझ्या आज्ञापासून भरकटतात ते शापित आहेत.

22माझ्यापासून लाज आणि मानहानी दूर कर, कारण मी तुझी कराराची आज्ञा पाळली आहे.

23अधिपतिही माझ्याविरूद्ध कट रचतात आणि निंदा करतात, तुझा सेवक तुझ्या नियमांचे मनन करतो.

24तुझी कराराची आज्ञा मला आनंददायी आहे, आणि ते माझे सल्लागार आहेत .

25माझा जीव धुळीस चिकटून आहे; आपल्या वचनाप्रमाणे मला नवजीवन दे.

26मी तुला आपले मार्ग सांगितले आणि तू मला उत्तर दिलेस; तू मला आपले नियम शिकव.

27मला तुझ्या विधींचा मार्ग समजावून दे . यासाठी की,मी तुझ्या आश्चर्यकारक शिक्षणाचे मनन करीन.

28माझा जीव दुःखाने गळून जातो; आपल्या वचनाने मला उचलून धर.

29असत्याच्या मार्ग माझ्यापासून दूर कर; कृपाकरून तुझे नियमशास्र मला शिकीव.

30मी विश्वासाचा मार्ग निवडला आहे; मी तुझे योग्य निर्णय आपल्यासमोर ठेवले आहेत.

31मी तुझ्या कराराच्या निर्बंधास चिकटून राहिलो आहे; हे परमेश्वरा, मला लज्जित होऊ देऊ नकोस.

32मी तुझ्या आज्ञांच्या मार्गात धावेल, कारण तू ते करण्यास माझे हृदय विस्तारीत करतोस.

33हे परमेश्वरा, तू आपल्या नियमाचा मार्ग मला शिकव आणि मी तो शेवटपर्यत धरून राहिल.

34मला बुद्धी दे म्हणजे मी तुझे नियमशास्र पाळीन; मी आपल्या अगदी मनापासून मी ते पाळीन.

35तू आपल्या आज्ञांच्या मार्गाने मला चालीव, कारण त्यात चालण्यास मला आनंद आहे.

36माझे मन तुझ्या कराराच्या निर्बंधाकडे असू दे आणि अन्याय्य लाभापासून दूर कर.

37क्षुल्लक गोष्टी पाहण्यापासून माझे डोळे वळीव. मला तुझ्या मार्गात पुनरुज्जीवित कर.

38तुझा सन्मान करणाऱ्यांना दिलेले वचन आपल्या सेवकासंबंधाने खरे कर.

39ज्या अपमानाची मला धास्ती वाटते ती दूर कर, कारण तुझे निर्णय उत्तम आहेत.

40पाहा, मला तुझ्या विधींची उत्कंठा लागली आहे. तू मला आपल्या न्यायत्वाने सोडवून सजीव कर.

41हे परमेश्वरा, मला तुझे अचल प्रेम दे. तुझ्याप्रमाणे मला तुझे तारण प्राप्त होवो.

42जो माझी थट्टा करतो त्याला मला उत्तर देता येईल, कारण मी तुझ्या वचनावर विश्वास ठेवला आहे.

43तू माझ्या मुखातून सत्य वचन काढून घेऊ नको, कारण मी तुझ्या योग्य निर्णयाची प्रतिक्षा करतो.

44मी सदैव तुझे नियमशास्र, सदासर्वकाळ आणि कायम पाळीन.

45मी सुरक्षितपणे चालेन, कारण मी तुझे निर्बंध शोधले आहेत.

46मी तुझ्या विधीवत आज्ञेबद्दल राजांसमोर बोलेन आणि मी शरमिंदा होणार नाही.

47मी तुझ्या आज्ञेत आनंद करीन, ज्या मला अतिशय प्रिय आहेत.

48ज्या तुझ्या आज्ञांची मला प्रिय आहेत,त्याकडे मी आपले हात उंचावीन; मी तुझ्या नियमांचे मनन करीन.

49तू आपल्या सेवकाला दिलेले वचनाची आठवण ठेव. कारण तू मला आशा दिली आहेस.

50माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की, तुझे वचन मला नवजीवन देते;

51गर्विष्ठांनी माझी टवाळी केली आहे, तरी मी तुझ्या नियमशास्रापासून भरकटलो नाही.

52हे परमेश्वरा, प्राचीन काळच्या तुझ्या निर्णयाविषयी मी विचार करतो आणि मी आपले समाधान करतो.

53दुष्ट तुझे नियमशास्र नाकारतात म्हणून संताप माझा ताबा घेतो.

54ज्या घरात मी तात्पुरता राहतो तुझे नियम मला माझी गाणी झाली आहेत.

55हे परमेश्वरा, रात्रीत मी तुझ्या नावाचा विचार करतो आणि मी तुझे नियमशास्र पाळतो.

56हे मी आचरिले आहे, कारण मी तुझे विधी पाळले आहेत.

57परमेश्वरा माझा वाटा आहे; तुझे वचन पाळण्याचा मी निश्चय केला आहे.

58मी आपल्या संपूर्ण हृदयाने तुझ्या अनुग्रहासाठी कळकळीची विनंती करतो; तुझ्या वचनाप्रमाणे माझ्यावर दया कर;

59मी आपल्या मार्गाचे परीक्षण केले आणि तुझ्या कराराकडे आपले पावले फिरवली.

60मी तुझ्या आज्ञा पाळण्याची घाई केली आणि मी उशीर केला नाही.

61दुष्टाच्या दोऱ्यांनी मला जाळ्यात पकडले आहे; तरी मी तुझे नियमशास्र विसरलो नाही.

62मी मध्यरात्री तुझ्या न्याय्य निर्णयांबद्दल तुला धन्यवाद देण्यासाठी उठतो.

63तुझे भय धरणाऱ्या सर्वांचा, तुझे विधी पाळणाऱ्यांचा,मी साथीदार आहे.

64हे परमेश्वरा, तुझ्या कराराच्या विश्वासनियतेने सर्व पृथ्वी भरली आहे. तू आपले नियम मला शिकव.

65हे परमेश्वरा, तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या सेवकाचे चांगले केले आहेस.

66योग्य निर्णय घेण्याविषयीचे ज्ञान आणि बुद्धी तू मला दे, कारण तुझ्या आज्ञांवर माझा विश्वास आहे

67पीडित होण्यापूर्वी मी बहकलो होतो, परंतु आता मी तुझे वचन पाळीत आहे.

68तू चांगला आहेस आणि तू चांगले करतोस. मला तुझे नियम शिकव.

69गर्विष्ठांनी माझ्यावर लबाडीने चिखलफेक केली आहे, पण मी तुझे विधी अगदी मनापासून पाळीन.

70त्यांचे हृदय कठीण झाले आहे, पण मला तुझ्या नियमशास्रात आनंद आहे.

71मी पीडित झाल्यामुळे माझे चांगले सोसले ते चांगले झाले यासाठी की, मी तुझे नियमशास्र शिकलो.

72सोने आणि रुपे ह्यांच्या हजारो तुकड्यापेक्षा, मला तुझ्या तोंडचे नियमशास्र अधिक मोलवान आहेत.

73तुझ्या हातांनी मला निर्माण केले आणि आकार दिला; मला बुद्धी दे म्हणजे मी तुझ्या आज्ञा शिकेल.

74तुझा सन्मान करणारे मला पाहून हर्ष करतील कारण मला तुझ्या वचनात आशा सापडली आहे.

75हे परमेश्वरा, तुझे निर्णय न्यायानुसार आहेत हे मला माहित आहेत, आणि तुझ्या विश्वासात मला पीडिले आहे.

76तू आपल्या सेवकाला दिलेल्या वचनानुसार आपल्या कराराच्या विश्वासनियतेने सांत्वन कर.

77मला कळवळा दाखव यासाठी की,मी जिवंत राहीन, कारण तुझे नियमशास्र माझा आनंद आहे.

78गर्विष्ठ लज्जित होवोत, कारण त्यांनी माझी निंदानालस्ती केली आहे; पण मी तुझ्या विधींचे मनन करीन;

79तुझा सन्मान करणारे माझ्याकडे वळोत, म्हणजे त्यांना तुझे निर्बंध कळतील.

80मी लज्जित होऊ नये याकरता माझे हृदय आदराने तुझ्या निर्दोष नियमाकडे लागू दे.

81मी तुझ्या विजयासाठी उत्कंठा धरतो; मी तुझ्या वचनावर आशा ठेवली आहे.

82माझे डोळे तुझे वचन पाहण्यास आसुसले आहेत; तू माझे सांत्वन कधी करशील?

83कारण मी धुरात ठेविलेल्या बुधलीसारखा झालो आहे; तरी मी तुझे नियम विसरलो नाही.

84तुझा सेवक हे किती काळ सहन करत राहणार आहे? जे माझा छळ करतात. त्यांचा न्याय तू कधी करशील?

85गार्विष्ठांनी माझ्यासाठी खाचा खणून ठेविल्या आहेत, तुझे नियमशास्र झुगारले आहे.

86तुझ्या सर्व आज्ञा विश्वासनीय आहेत; ते लोक माझा छळ अनुचितपणे करत आहेत; मला मदत कर.

87त्यांनी पृथ्वीवरून माझा जवळजवळ सर्वनाश केला; पण मी तुझे विधी नाकारले नाहीत.

88तुझ्या कराराच्या विश्वासनियतेने वचन दिल्याप्रमाणे मला जिवंत ठेव, याकरता की,मी तुझ्या तोंडचे निर्बंध पाळीन.

89हे परमेश्वरा, तुझे वचन स्वर्गात सर्वकाळ स्थिर आहे; तुझे वचन स्वर्गात ठामपणे प्रस्थापित आहे.

90तुझा विश्वास सदासर्वदा सर्व पिढ्यानपिढ्यासाठी आहे; तू पृथ्वीची स्थापना केलीस आणि म्हणून ती टिकून राहते.

91त्या सर्व गोष्टी आजपर्यत, तुझ्या निर्णयात म्हटल्याप्रमाणे राहिली आहेत, कारण सर्व गोष्टी तुझे सेवक आहेत.

92जर तुझे नियमशास्र माझा आनंद नसता, तर माझ्या दुःखात माझा नाश झाला असता.

93मी तुझे निर्बंध कधीच विसरणार नाही, कारण त्याद्वारे तू मला सजीव ठेवले आहे.

94मी तुझाच आहे; माझा उध्दार कर. कारण मी तुझे निर्बंध शोधले आहेत.

95दुष्टांनी माझा नाश करायची तयारी केली आहे, पण मी तुझ्या कराराच्या निर्बंधाचा शोध घेईल.

96प्रत्येकगोष्टीला त्याची मर्यादा असते हे मी पाहिले आहे, पण तुझ्या आज्ञा व्यापक,मर्यादे पलीकडे आहेत.

97अहाहा, तुझे नियमशास्र मला किती प्रिय आहेत, दिवसभर मी त्याच्यावर मनन करतो.

98तुझ्या आज्ञा मला माझ्या शत्रूंपेक्षा ज्ञानी करतात, कारण तुझे नियम नेहमी माझ्याजवळ आहेत.

99माझ्या सर्व शिक्षकांपेक्षा मला अधिक बुद्धी आहे. कारण मी तुझ्या कराराच्या निर्बंधाचे मनन करतो.

100वयोवृध्दापेक्षा मला अधिक कळते; कारण मी तुझे विधि पाळतो.

101तुझे वचन पाळावे म्हणून मी आपले पाऊल प्रत्येक वाईट मार्गापासून दूर ठेवतो. या करता,मी तुझे वचन पाळावे.

102मी तुझ्या निर्णयापासून दुसऱ्याबाजूला वळलो नाही, कारण तू मला शिकविले आहे.

103तुझे वचन माझ्या चवीला कितीतरी गोड आहेत, होय माझ्या मुखाला मधापेक्षा गोड आहेत.

104तुझ्या विधींच्याद्वारे मला बुद्धी प्राप्त होते यास्तव मी प्रत्येक खोट्या मार्गाचा द्वेष करतो.

105तुझे वचन माझ्या पावलाकरता दिवा आहे आणि माझ्या मार्गासाठी प्रकाश आहे.

106तुझे निर्णय पाळण्याची मी शपथ वाहिली आहे, व ती पक्की केली आहे.

107मी फार पीडित आहे; हे परमेश्वरा तुझ्या वचनात वचन दिल्याप्रमाणे मला जिवीत ठेव.

108हे परमेश्वरा, माझ्या मुखातील वचने ही स्वसंतोषाची अर्पणे समजून स्विकार कर, आणि मला तुझे निर्णय शिकव.

109माझे जीवन नेहमीच धोक्यात असते, तरी मी तुझे नियमशास्र विसरलो नाही.

110दुष्टांनी माझ्यासाठी पाश रचला आहे, पण मी तुझ्या विधीपासून भरकटलो नाही.

111तुझे निर्बंध माझे सर्वकाळचे वतन म्हणून मी स्वीकारले आहे, कारण त्याच्या योगे माझ्या मनाला आनंद होतो.

112तुझे नियम सर्वकाळ शेवटपर्यत पाळण्याकडे मी आपले मन लाविले आहे.

113परमेश्वरा, जे लोक तुझ्याशी पूर्णपणे प्रामाणिक नाहीत त्या लोकांचा मी तिरस्कार करतो, पण मला तुझी शिकवण आवडते.

114मला लपव आणि माझे रक्षण कर. परमेश्वरा, तू जे काही सांगतोस त्यावर माझा विश्वास आहे.

115वाईट करणाऱ्यांनो माझ्यापासून दूर जा, यासाठी की, मी आपल्या देवाच्या आज्ञा पाळीन.

116तू आपल्या वचनानुसार मला आधार दे म्हणजे मी जगेन, आणि माझ्या आशेची लाज धरू नकोस.

117मला आधार दे आणि मी सुरक्षित राहीन; मी नेहमीच तुझ्या नियमांवर मनन करीन.

118तुझ्या नियमापासून बहकले आहेत त्यांचा तू नाकार करतो, कारण हे लोक फसवणारे आणि अविश्वसनीय आहेत.

119पृथ्वीवरील सर्व दुष्टांना गाळाप्रमाणे दूर करतो; म्हणून मी तुझ्या विधीवत करारावर प्रेम करतो.

120तुझ्या भीतीने माझे शरीर थरथरते, आणि तुझ्या न्याय्य निर्णयाची भीति वाटते.

121मी जे योग्य आहे आणि चांगले आहे तेच करतो; मला जाचणाऱ्याकडे सोडून देऊ नको.

122तू आपल्या सेवकाच्या कल्याणार्थ जामीन हो. गर्विष्ठांना मला जाचू देऊ नकोस.

123तू सिद्ध केलेल्या तारणाची व तुझ्या न्याय्य वचनाची प्रतिक्षा करून माझे डोळे थकले आहेत.

124तुझ्या सेवकाला कराराची विश्वासनियता दाखव आणि मला तुझे नियम शिकव.

125मी तुझा सेवक आहे, मला तुझ्या कराराच्या निर्बधाचे ज्ञान व्हावे म्हणून मला बुद्धी दे.

126परमेश्वराची कृती करण्याची वेळ आली आहे कारण लोकांनी तुझे नियमशास्र मोडले आहे.

127खरोखर मी तुझ्या आज्ञा सोन्यापेक्षा, बावनकशी सोन्यापेक्षा प्रिय मानतो.

128यास्तव मी काळजी पूर्वक तुझे सर्व विधी पाळतो, आणि प्रत्येक असत्य मार्गाचा द्वेष करतो.

129तुझे कराराचे निर्बंध आश्चर्यकारक आहेत; म्हणूनच मी तो पाळतो.

130तुझ्या वचनाच्या उलगड्याने प्रकाश प्राप्त होतो; त्याने अशिक्षीतास ज्ञान प्राप्त होते.

131मी आपले मुख उघडले आणि धापा टाकल्या, कारण मी तुझ्या आज्ञेची उत्कंठा धरली.

132तू माझ्याकडे वळ आणि माझ्यावर दया कर, जशी तुझ्या नावावर प्रीति करणाऱ्यावर तू रिवाजाप्रमाणे दया करतो.

133तुझ्या वचनाप्रमाणे मला मार्गदर्शन कर; माझ्यावर कोणत्याही पापाची सत्ता चालू देऊ नको.

134मनुष्याच्या जाचजुलमापासून मला मुक्त कर याकरता की,मी तुझे विधी पाळीन.

135तू आपला मुखप्रकाश आपल्या सेवकावर पाड, आणि तुझे नियम मला शिकव.

136माझ्या डोळ्यातून अश्रूंचे प्रवाह खाली वाहतात कारण लोक तुझे नियमशास्र पाळत नाहीत.

137हे परमेश्वरा, तू न्यायी आहेस आणि तुझे निर्णय योग्य आहेत.

138तू आपले कराराचे निर्बंध न्याय्य आणि विश्वासाने लावून दिले आहेत.

139रागाने माझा नाश केला आहे कारण माझे शत्रू तुझे वचन विसरले आहेत.

140तुझ्या वचनाची खूपच पारख झाली आहे, आणि ते तुझ्या सेवकाला प्रिय आहे.

141मी उपेक्षणीय आणि तुच्छ मानलेला आहे, तरी मी तुझे विधी विसरत नाही.

142तुझे न्याय्यत्व हे सर्वकाळ योग्य आहे, आणि नियमशास्र सत्य आहे.

143माझ्यावर खूप संकटे आली आणि वाईट वेळाही आल्या परंतु मला तुझ्या आज्ञा आवडतात.

144तुझ्या कराराचे निर्बंध सर्वकाळ न्याय्य आहेत; मला बुद्धी दे म्हणजे मी जगेन.

145मी संपूर्ण मनापासून तुला हाक मारतो, हे परमेश्वरा, मला उत्तर दे, मी तुझे नियम पाळीन.

146मी तुला हाक मारतो; तू मला तार आणि मी तुझे कराराचे नियम पाळीन.

147मी उजडण्यापूर्वी पहाटेस उठतो आणि मदतीसाठी आरोळी मारतो. तुझ्या वचनात माझी आशा आहे.

148तुझ्या वचनावर चिंतन करण्यासाठी रात्रीच्या प्रत्येक प्रहरापूर्वी माझे डोळे उघडे असतात.

149तुझ्या कराराच्या विश्वासनियतेने माझी वाणी ऐक; हे परमेश्वरा, तू आपल्या निर्णयानुसार मला जिवंत ठेव.

150जे माझा छळ करत आहेत ते माझ्याजवळ येत आहेत, पण ते तुझ्या नियमशास्रापासून फार दूर आहेत.

151हे परमेश्वरा, तू जवळ आहेस आणि तुझ्या सर्व आज्ञा सत्य आहेत.

152तुझ्या कराराच्या निर्बंधावरून मला पूर्वीपासून माहित आहे की, ते तू सर्वकाळासाठी ठेवले आहेत.

153माझ्या व्यथेकडे पाहा आणि मला मदत कर, कारण मी तुझे नियमशास्र विसरलो नाही.

154तू माझा वाद चालव आणि माझा उद्धार कर. तू आपल्या वचनात वचन दिल्याप्रमाणे मला राख.

155दुष्टपासून तारण फार दूर आहे, कारण त्यांना तुझे नियम प्रिय नाहीत.

156हे परमेश्वरा, तुझी दयाळूपणाची कृती महान आहे; मला जिवंत ठेव,जसे तुझ्या रिवाजाप्रमाणे करतो.

157मला छळणारे आणि माझे शत्रू पुष्कळ आहेत, तरी मी तुझ्या कराराच्या निर्बंधापासून मागे वळलो नाही.

158मी विश्वासघातक्यांना तिरस्काराने बघतो कारण ते तुझे वचन पाळीत नाहीत.

159पाहा, तुझे विधी मी किती प्रिय मानतो; हे परमेश्वरा, तुझ्या वचनाप्रमाणे कराराच्या विश्वासनियतेने मला जिवंत ठेव.

160तुझ्या वचनाचे मर्म सत्य आहे; तुझ्या न्यायीपणाचा प्रत्येक निर्णय सर्वकाळ आहे.

161अधिपतींनी विनाकारण माझा छळ केला; तुझे वचन न पाळल्यामुळे माझे हृदय भीतीने कापते.

162ज्याला मोठी लूट सापडते त्याच्यासारखा मला तुझ्या वचनाविषयी आनंद होतो.

163मी असत्याचा द्वेेष आणि तिरस्कार करतो, पण मला तुझे नियमशास्र प्रिय आहे.

164मी दिवसातून सात वेळा तुझ्या न्याय्य निर्णयांसाठी मी तुझी स्तुती करतो.

165तुझ्या नियमशास्रावर प्रेम करणाऱ्यास मोठी शांती असते. त्याला कसलेच अडखळण नसते

166हे परमेश्वरा, मी तुझ्या उध्दाराची वाट पाहत आहे आणि मी तुझ्या आज्ञा पाळल्या आहेत.

167मी तुझ्या विधीवत आज्ञांप्रमाणे वागलो, आणि मला ते अत्यंत नियम प्रिय आहेत.

168मी तुझे निर्बंध आणि तुझे विधीवत आज्ञा पाळल्या आहेत, कारण मी जी प्रत्येकगोष्ट केली ते सर्व तुला माहीत आहे.

169हे परमेश्वरा, माझी मदतीसाठीची आरोळी ऐक. तू आपल्या वचनाप्रमाणे मला बुद्धी दे.

170माझी विनंती तुझ्यासमोर येवो; तुझ्या वचनात वचन दिल्याप्रमाणे मला मदत कर.

171तू मला आपले नियम शिकवितो म्हणून माझ्या मुखातून स्तुति बाहेर पडो.

172माझी जीभ तुझ्या वचनाची स्तुति गावो; कारण तुझ्या सर्व आज्ञा न्याय्य आहेत.

173तुझा हात माझे साहाय्य करो, कारण तुझे निर्बध मी निवडले आहेत.

174हे परमेश्वरा, मी तुझ्या तारणाची उत्कंठा धरली आहे आणि तुझे नियमशास्र माझा आनंद आहे.

175माझा जीव वाचो म्हणजे तो तुझी स्तुति करील; तुझे निर्णय मला मदत करो.

176मी हरवलेल्या मेंढराप्रमाणे भरकटलो आहे; तू आपल्या सेवकाचा शोध कर, आणि कारण मी तुझ्या आज्ञा विसरलो नाही.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Psalms 119 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran