Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Mark 16 >> 

1शब्बाथाचा दिवस संपला तेव्हा मरीया मग्दालीया, याकोबाची आई मरीया आणि सलोमी यांनी त्याला लावण्याकरिता सुगंधी तेल विकत आणले.

2आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी, अगदी पहाटे सूर्योदयाच्या वेळी त्या कबरेकडे गेल्या.

3त्या एकमेकीस म्हणत होत्या की, ‘कबरेच्या तोंडावरून आपणासाठी धोंड कोण बाजूला लोटील?’

4नंतर त्यांनी वर पाहिले आणि त्यांना धोंड दूर लोटलेली आढळली. ती फारच मोठी होती.

5त्या कबरेत आत गेल्या तेव्हा त्या चकित झाल्या. त्यांना एक तरुण पुरूष उजव्या बाजूस बसलेला आढळला. त्याने पांढरा शुभ्र झगा घातला होता.

6तो त्यांना म्हणाला, ‘भयभीत होऊ नका, तुम्ही नासरेथकर येशू जो वधस्तंभावर खिळला होता त्याचा शोध करीत आहात. पण तो उठला आहे. येथे नाही. त्यांनी त्याला ठेवले होते ती जागा पाहा.

7जा आणि त्याच्या शिष्यांना व पेत्रालाही सांगा की, तो तुमच्या अगोदर गालीलात जात आहे, त्याने तुम्हास सांगितल्याप्रमाणे तेथे तो तुम्हास दृष्टीस पडेल.’

8मग त्या बाहेर गेल्या आणि भीतीमुळे कबरेपासून पळाल्या. त्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी कोणाला काहीही सांगितले नाही. कारण त्या भयभीत झाल्या होत्या.

9आठवड्याच्या पहिल्या दिवशी येशू उठल्यावर त्याने प्रथम मरीया मग्दालीयाला, जिच्यातून त्याने सात भुते काढली होती, तिला दर्शन दिले.

10ती गेली आणि रडून शोक करणाऱ्या त्याच्या अनुयायांना तिने हे वृत्त सांगितले.

11त्यांनी ऐकले की तो जिवंत आहे. व तिने त्याला पाहिले आहे. तेव्हा त्यांनी तिच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला नाही.

12यानंतर त्यांच्यापैकी दोघे उघड्या माळरानावर चालले होते. गावाकडे जात असता येशू त्यांना दुसऱ्या रुपाने प्रकट झाला.

13ते परत आले व इतरांना त्याविषयी सांगितले परंतु त्यांनी त्यांच्यावरही विश्वास ठेवला नाही.

14नंतर अकरा जण जेवत बसले असता येशू त्यांना प्रकट झाला. त्याने शिष्यांच्या अविश्वासाबद्दल आणि त्यांच्या अंतःकरणाच्या कठोरतेबद्दल त्यांना समज दिली. कारण ज्यांनी त्याला उठल्यावर पाहिले होते त्यांच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही.

15तो त्यांना म्हणाला, ‘सर्व जगात जा आणि सर्व सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा.’

16जो कोणी विश्वास धरतो आणि बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल, परंतु जो विश्वास ठेवत नाही तो शिक्षेस पात्र होईल.

17-18 परंतु जो विश्वास धरतील त्यांच्याबरोबर ही चिन्हे असतील, ते माझ्या नावाने भुते काढतील, ते नव्या नव्या भाषा बोलतील. ते आपल्या हातांनी साप उचलतील आणि ते कोणतेही विष पितील तेव्हा ते त्यांना बाधणार नाही. ते आजाऱ्यांवर हात ठेवतील आणि ते बरे होतील.’

19मग प्रभू येशू त्यांच्याबरोबर बोलल्यानंतर तो स्वर्गात घेतला गेला आणि देवाच्या उजव्या बाजूस जाऊन बसला.

20शिष्य बाहेर गेले आणि त्यांनी प्रत्येक ठिकाणी सुवार्तेची घोषणा केली. प्रभूने त्यांच्याबरोबर कार्य केले, व त्याने वचनाबरोबर असणाऱ्या चिन्हांनी त्याची खात्री केली.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Mark 16 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran