1येशू पवित्र आत्म्याने पूर्ण भरून यार्देन नदीहून परतला. मग आत्म्याने त्याला अरण्यात नेले.
2तेथे सैतानाने त्याला चाळीस दिवस परीक्षेत टाकले. त्यादिवसात येशूने काहीही खाल्ले नाही आणि ती वेळ संपल्यानंतर येशूला भूक लागली.
3तेव्हा सैतान त्याला म्हणाला, जर तू देवाचा पुत्र आहेस तर ह्या दगडाची भाकर हो, अशी आज्ञा कर.
4येशूने त्याला उत्तर दिले, असे लिहिले आहे की, मनुष्य फक्त भाकरीनेच जगेल असे नाही.
5मग सैतान त्याला उंच जागेवर घेऊन गेला, आणि एका क्षणांत जगातील सर्व राज्ये त्याला दाखविली.
6सैतान त्याला म्हणाला, मी तुला या सर्व राज्याचे अधिकार वैभव देईन कारण ते मला दिलेले आहे. आणि मी माझ्या मर्जीनुसार ते देऊ शकतो.
7म्हणून जर तू मला नमन करशील आणि माझी उपासना करशील तर हे सर्व तुझे होईल.
8येशूने उत्तर दिले, पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे. प्रभू तुझा देव याचीच उपासना कर, आणि केवळ त्याचीच सेवा कर.
9नंतर सैतानाने येशूला यरूशलेमेस नेले आणि मंदिराच्या उंच टोकावर त्याला उभे केले आणि तो त्याला म्हणाला, जर तू देवाचा पुत्र आहेस तर येथून खाली उडी मार!
10असे लिहिले आहे की, तुझे रक्षण करण्यास तो आपल्या दूतास तुझ्याविषयी आज्ञा करील,
11आणि तुझा पाय दगडावर आपटू नये म्हणून ते तुला आपल्या हातावर झेलून धरतील.
12येशूने उत्तर दिले. पवित्र शास्त्रात असेही म्हटले आहे, प्रभू, तुझा देव याची परीक्षा पाहू नकोस.
13म्हणून सैतानाने प्रत्येक प्रकारे परीक्षा घेण्याचे संपविल्यावर, योग्य वेळ येईपर्यंत तो येशूला सोडून गेला.
14मग आत्म्याच्या सामर्थ्याने येशू गालीलास परतला आणि त्याच्याविषयीची बातमी सगळीकडे पसरली.
15त्याने त्यांच्या सभास्थानात शिकविले, आणि सर्वांनी त्याची स्तुती केली.
16मग जेथे तो लहानाचा मोठा झाला होता त्या नासरेथांत तो आला. आणि शब्बाथ दिवशी त्यांच्या प्रथेप्रमाणे सभास्थानात जाऊन ग्रंथ वाचण्यासाठी उभा राहिला,
17आणि यशया संदेष्ट्याचा ग्रंथपट त्याला देण्यात आला. त्याने ते पुस्तक उघडले आणि जो भाग शोधून काढला, त्याठिकाणी असे लिहिले आहे,
18प्रभूचा आत्मा मजवर आला आहे, कारण, यासाठी की, गरिबांना सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला आहे. कैदी म्हणून नेलेल्यांस स्वातंत्र्याची घोषणा करण्यासाठी, आणि आंधळ्यांना दृष्टि पुन्हा मिळावी, ज्यांच्यावर जुलूम झाला आहे त्यांची सुटका करण्यासाठी
19आणि प्रभूच्या कृपेच्या वर्षाची घोषणा करण्यासाठी त्याने मला अभिषेक केला आहे मला पाठवले आहे.
20मग त्याने ग्रंथपट बंद करून सभास्थानाच्या सेवकाला परत करून तो खाली बसला. सभास्थानातील प्रत्येक जण त्याच्याकडे रोखून पाहत होता.
21त्याने त्यांच्याशी बोलण्यास सुरुवात केली तुमच्या ऐकण्यामुळे आज हे शास्त्रवचन पूर्ण झाले आहे.
22तेव्हा सर्व लोक त्याच्याविषयी साक्ष देऊ लागले. आणि त्याच्या मुखातून येणाऱ्या कृपेच्या शब्दांबद्दल ते आश्चर्यचकित झाले. आणि ते म्हणाले, “हा योसेफाचाच मुलगा नव्हे काय?
23येशू त्यांना म्हणाला, नक्कीच, तुम्ही मलाही म्हण लागू कराल; हे वैद्या, तू स्वतःलाच बरे कर.’ कफर्णहूमात ज्या गोष्टी तू केल्याचे आम्ही ऐकले त्या गोष्टी तुझ्या स्वतःच्या गावातसुध्दा कर. मग तो पुढे म्हणाला,
24मी तुम्हाला खरे सांगतो, कोणीही संदेष्टा त्याच्या स्वतःच्या गावात स्वीकारला जात नाही.
25मी तुम्हाला खरे सांगतो, इस्राएलात एलीयाच्या काळात पुष्कळ विधवा होत्या, जेव्हा साडेतीन वर्षापर्यंत आकाशातून पाऊस पडला नाही आणि सर्व प्रदेशात मोठा दुष्काळ पडला होता.
26तरीही एलीयाला इतर कोणत्याही विधवेकडे पाठविण्यात आले नाही. त्याला सिदोन प्रांतातील सारफथ येथील विधवेकडेच पाठविण्यात आले.
27अलीशा संदेष्ट्याच्या वेळेस इस्राएलात अनेक कुष्ठरोगी होते परंतु त्यापैकी कोणीही शुध्द झाला नाही. केवळ सूरीया येथील नामान कुष्ठरोग्यालाच शुध्द करण्यात आले होते.
28हे एकूण सभास्थानातील सर्व लोक संतापले.
29ते लोक उठले आणि त्यांनी त्याला (येशूला) शहराबाहेर घालवून दिले आणि ज्या टेकडीवर त्यांचे गाव वसले होते, त्या कड्यावरून त्याला लोटून देण्यास तेथवर नेले.
30परंतु तो त्यांच्यातून निघून आपल्या वाटेने गेला.
31नंतर तो गालीलातील कफर्णहूम गावी गेला. तो शब्बाथ दिवशी सभास्थानात त्यास शिक्षण देत होता.
32ते त्याच्या शिकवणीने आश्चर्यचकित झाले, कारण त्याचे बोलणे अधिकारयुक्त असे.
33त्या दिवशी सभास्थानात, अशुध्द आत्मा लागलेला एक मनुष्य होता आणि तो मोठ्याने ओरडून म्हणाला,
34हे नासरेथकर येशू, तू आमच्यामध्ये का पडतोस? तू आमचा नाश करण्यासाठी आला आहेस काय? तू कोण आहेस हे मला माहीत आहे देवाचा पवित्र, तोच तू आहेस.
35येशूने त्याला धमकावून म्हटले, शांत राहा आणि त्याच्यातून नीघ! तेव्हा त्या अशुध्द आत्म्याने त्या मनुष्याला जमिनीवर खाली पाडले व त्या माणसाला काहीही इजा न करता तो त्याच्यातून बाहेर निघाला.
36तेव्हा सर्व जण आश्चर्यचकित झाले व एकमेकांशी बोलू लागले, हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत? अधिकाराने आणि सामर्थ्याने तो अशुध्द आत्म्याना देखील आज्ञा करतो व ते बाहेर येतात.
37अशाप्रकारे त्याच्याविषयीची किर्ती चहुकडील प्रदेशात पसरत गेली.
38येशू सभास्थानातून निघून शिमोनाच्या घरी गेला. शिमोनाची सासू खुप तापाने आजारी होती. त्यांनी तिला बरे करण्याविषयी त्याला विनंती केली.
39येशू तिच्याजवळ उभा राहिला व त्याने तापाला धमकावले, आणि तिच्यातून ताप निघाला. ताबडतोब उठून ती त्यांची सेवा करू लागली.
40सूर्य मावळत असतांना, सर्व निरनिराळ्या रोगांनी आजारी असलेल्या माणसांना त्याच्याकडे आणले. त्याने प्रत्येकाच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना बरे केले.
41कित्येकांमधून अशुध्द आत्मे बाहेर आले. ते अशुध्द आत्मे ओरडत होते आणि म्हणत होते, तू देवाचा पुत्र आहेस. परंतु तो ख्रिस्त आहे हे त्यांना माहिती असल्याने त्याने त्यांना दटावले व काही बोलू दिले नाही.
42दिवस उगवताच, तो एकांत स्थळी गेला. पण लोक त्याला शोधत होते. तो जेथे होता तेथे ते लगेच आले. आणि त्त्यांच्यातून त्याने निघून जाऊ नये म्हणून त्यांनी प्रयत्न केले.
43परंतु तो त्यांना म्हणाला, देवाच्या राज्याची सुवार्ता मला इतर गावांमध्येही सांगितली पाहिजे. कारण याच कारणासाठी मला पाठवले आहे.
44मग तो संपूर्ण यहूदिया प्रदेशातील सभास्थानामध्ये उपदेश करीत गेला.