Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Acts 2 >> 

1नंतर पेन्टीकॉस्ट म्हणजे पन्नासावा दिवस आला तेव्हा ते सर्व एकत्र जमले असताना,

2अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते वसले होते ते सर्व त्याने भरले.

3आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभांसारख्या जिभा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एकएक अशा बसल्या.

4तेव्हा ते सर्व जण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषांतून बोलू लागले.

5त्यावेळेस आकाशाखालच्या प्रत्येक राष्टांतील भक्तिमान यहूदी यरूशलेमेंत राहत होते.

6तो नाद झाल्यावर लोकसमुदाय एकत्र होऊन गोंधळून गेला; कारण प्रत्येकाने त्यांना आपआपल्या भाषेत बोलताना ऐकले.

7ते सर्व आश्चर्याने थक्क होऊन म्हणाले, पाहा, हे बोलणारे सर्व गालीली ना?

8तर आपण प्रत्येक जण आपआपली जन्मभाषा ऐकतो हे कसे?

9पार्थी, मेदी, एलामी, मेसोपटेम्या, यहूदीया, कप्पुदुकिया, पंत, आसिया,

10फ्रुगिया, पंफूलिया, मिसर, व कुरणेच्या जवळचा लिबुवा देश ह्यात राहणारे, यहूदी व यहूदीयमतानूसारी असे रोमन प्रवासी,

11क्रेतीय, अरब, असे आपण त्यांना आपआपल्या भाषांत देवाची महत्कृत्ये सांगताना ऐकतो.

12तेव्हा ते सर्व विस्मित होऊन व गोंधळून जाऊन एकमेकांस म्हणाले, हे काय असेल?

13परंतु दुसरे कित्येक चेष्टा करीत म्हणाले, हे नवीन द्राक्षारसाने मस्त झाले आहेत.

14तेव्हा पेत्र अकरा प्रेषितांबरोबर उभा राहून त्यांना मोठ्याने म्हणाला, अहो यहूदी लोकांनो व यरूशलेमेतील रहिवाश्यांनो, हे लक्षात आणा व माझे बोलणे ऐकून घ्या.

15तुम्हाला वाटते हे मस्त झाले आहेत; पण असे नाही; कारण हा दिवसाचा पहिला प्रहर आहे;

16परंतु योएल संदेष्ट्याने जे सांगितले होते ते हे आहे.

17देव म्हणतो, शेवटल्या दिवसात 'असे होईल की, मी मनुष्यमात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन; तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या तरूणांस दृष्टांन्त होतील, व तुमच्या वृध्दास स्वप्ने पडतील;

18आणखी त्यादिवसात मी आपल्या दासांवर व आपल्या दासींवर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन; ' म्हणजे ते संदेश देतील;

19आणि वर 'आकाशात अदभूते, व खाली 'पृथ्वीवर' चिन्हे, म्हणजे रक्त, अग्नी व धूम्ररूप वाफ अशी मी दाखवीन;

20परमेश्वराचा महान व प्रसिध्द दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय व चंद्र रक्तमय होईल;

21तेव्हा असे होईल की, जो कोणी परमेश्वराच्या नावाने त्याचा धांवा करील तो तरेल.'

22अहो इस्त्राएल लोकांनो, ह्या गोष्टी ऐका; नासोरी येशूच्या द्वारे देवाने जी महत्कृत्ये, अदभूते व चिन्हे तुम्हाला दाखविली त्यावरून देवाने तुम्हाकरिता मान्यता दिलेला असा तो मनुष्य होता, ह्याची तुम्हाला माहिती आहे.

23तो देवाच्या ठाम संकल्पानुसार व पूर्वज्ञानानुसार तुमच्या स्वाधीन झाल्यावर तुम्ही त्याला धरून अधर्म्यांच्या हातांनी वधस्तंभावर खिळून मारले;

24त्याला देवाने मरणाच्या वेदनांपासून सोडवून उठवले, कारण त्याला मरणाच्या स्वाधीन राहणे अशक्य होते.

25दावीद त्याच्याविषयी असे म्हणतो; 'मी परमेश्वराला आपणापुढे नित्य पाहिले आहे; मी ढळू नये म्हणून तो माझ्या उजवीकडे आहे;

26म्हणून माझे हृदय आनंदित, व माझी जीभ उल्हासित झालीच आणखी माझा देह ही आशेवर राहील.,

27कारण तू माझा जीव मृतलोकात राहू देणार नाहीस, व आपल्या पवित्र पुरुषाला कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस.

28जीवनाचे मार्ग तू मला कळविले आहेत; ते आपल्या समक्षतेने मला हर्षभरीत करिशील.

29बंधुजनहो, कुलाधिपति दावीद ह्याच्याविषयी मी तुम्हाबरोबर प्रशस्तपणे बोलतो. तो मरण पावला, पुरला गेला व त्याची कबर आजपर्यत आपल्यामध्ये आहे.

30तो संदेष्टा होता आणि त्याला ठाऊक होते की, देवाने त्याला अभिवचन दिले की, तुझ्या संतानातील एकाला तुझ्या राजासनावर बसवीन.'

31ह्याचे पूर्वज्ञान असल्यामुळे तो ख्रिस्ताच्या पुनरूत्थानाविषयी असे बोलला की, 'त्याला मृतलोकात सोडून दिले नाही' व त्याच्या देहाला 'कुजण्याचा अनुभव आला नाही.'

32त्या येशूला देवाने उठवले ह्याविषयी आम्ही सर्व साक्षी आहो.

33म्हणून तो देवाच्या उजव्या हाताकडे बसविलेला आहे, त्याला पवित्र आत्म्याविषयीचे वचन पित्यापासून प्राप्त झाले आहे आणि तुम्ही जे पाहता व ऐकता त्याचा त्याने वर्षाव केला आहे.

34कारण दावीद स्वर्गास चढून गेला नाही; पण तो स्वतः म्हणतोः “परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले की,

35मी तुझ्या शत्रूचे तुझ्या पायांसाठी आसन करीपर्यत तू माझ्या उजवीकडे बसून राहा.'

36म्हणून इस्त्राएलाच्या सर्व घराण्याने हे निश्चयपूर्वक समजून घ्यावे की, ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले त्याला देवाने प्रभू व ख्रिस्त असे करून ठेवले आहे.

37हे ऐकून त्यांच्या अंतःकरणास चुटपुट लागली, आणि ते पेत्र व इतर प्रेषित ह्यांना म्हणाले, बंधुजनहो, आम्ही काय करावे?

38पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या; म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल.

39कारण हे वचन तुम्हाला, तुमच्या मुलाबाळांना व 'जे दूर आहेत त्या सर्वांना म्हणजे जितक्यांना परमेश्वर' आपला देव 'स्वतःकडे बोलावील तितक्यांना" दिले आहे.

40आणखी त्याने दुसऱ्या पुष्कळ गोष्टी सांगून त्यास साक्ष दिली व बोध करून म्हटले, ह्या कुटिल पिढीपासून तुम्ही आपला बचाव करून घ्या.

41तेव्हा ज्यांनी त्याच्या संदेशाचा स्वीकार केला त्यांचा बाप्तिस्मा झाला; आणि त्या दिवशी त्यांच्यांत सुमारे तीन हजार माणसांची भर पडली.

42ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात, भाकर मोडण्यांत व प्रार्थना करण्यांत तत्पर असत.

43तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय वाटले; आणि प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भूत कृत्ये व चिन्हे घडत होती.

44तेव्हा विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते, आणि त्यांचे सर्वकाही समाईक होते,

45ते आपआपली जमीन व मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज लागत असे तसतसे सर्वांना वांटून देत असत.

46ते दररोज एकचित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत, घरोघरी भाकर मोडीत असत, आणि देवाची स्तुती करीत हर्षाने व सालस मनाने जेवत.

47सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि प्रभू तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची दररोज त्यांच्यात भर घालीत असे.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Acts 2 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran