Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Exodus 33 >> 

1मग परमेश्वराने मोशेला सांगितले, “तू आणि तुझ्याबरोबर मिसर देशातून तू आणलेले लोक, तुम्ही येथून पुढच्या प्रवासास निघा; आणि जो देश मी तुझ्या संततीला देईन अशी मी अब्राहाम, इसहाक व याकोब यांना शपथ वाहिली होती त्या देशाला तुम्ही जा.

2तुमच्यापुढे चालण्यास मी माझ्या दूताला पाठवीन आणि कनानी, अमोरी, हित्ती, परिज्जी, हिव्वी व यबूसी लोकांना तेथून घालवून देईन.

3दुधामधाचे प्रवाह वाहत असलेल्या देशास तूं जा; मी तुमच्याबरोबर येणार नाही कारण तुम्ही फार ताठमानेचे लोक आहात. मी आलो तर रस्त्यातच तुम्हाला नष्ट करीन.”

4ही वाईट बातमी ऐकल्यावर लोक फार दु:खी झाले आणि त्यानंतर कोणीही आपल्या अंगावर दागदागिने घातले नाहीत;

5कारण परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू इस्त्राएल लोकांस असे सांग, ‘तुम्ही फार ताठमानेचे लोक आहात; मी तुमच्याबरोबर थोडा वेळ जरी असलो तरी मी तुम्हाला भस्म करीन; म्हणून तुम्ही तुमचे दागदागिने काढून ठेवा; मग तुमचे काय करावयाचे ते मी पाहीन.”

6म्हणून होरेब पर्वतापासून पुढे इस्त्राएल लोक दागदागिन्यावाचून राहिले.

7मोशे छावणीबाहेर बऱ्याच अंतरावर तंबू लावत असे. मोशेने त्याला सभामंडप असे नांव दिले होते; ज्या कोणाला परमेश्वराला काही विचारावयाचे असेल तो छावणीबाहेरील सभामंडपाकडे जाई.

8ज्यावेळी मोशे छावणीतून मंडपाकडे जाई त्यावेळी सर्व लोक आपापल्या तंबूच्या दारात उभे राहत आणि मोशे मंडपाच्या आत जाईपर्यत त्याला निरखून बघत.

9जेव्हा मोशे मंडपात जाई तेव्हा मेघस्तंभ खाली उतरून येई आणि मंडपाच्या दारापाशी तो उभा राही; ह्याप्रमाणे परमेश्वर मोशेशी बोलत असे.

10जेव्हा लोक दर्शनमंडपाच्या दारात ढग बघत तेव्हा ते आपापल्या तंबूच्या दारात उभे राहून देवाला नमन करीत.

11मित्रांशी बोलावे त्याप्रमाणे परमेश्वर मोशेबरोबर समोरासमोर बोलत असे. मोशे छावणीकडे माघारी जात असे. तरी मोशेचा मदतनीस नूनाचा मुलगा यहोशवा, हा तरुण मंडप सोडून बाहेर येत नसे.

12मोशे परमेश्वराला म्हणाला, “पाहा ह्या लोकांना घेऊन जाण्यास तू मला सांगितलेस, परंतु तू माझ्याबरोबर कोणाला पाठविणार ते तूं सांगितले नाहीस; तू मला म्हणालास, मी तुला तुझ्या नावाने ओळखतो आणि तुझ्यावर माझी कृपादृष्टि आहे.

13आता माझ्यावर तुझी कृपादृष्टी असल्यास तुझे मार्ग मला दाखीव ना. म्हणजे मला तुझी ओळख घडेल आणि त्यामुळे तुझी कृपादृष्टि माझ्यावर होईल. पाहा, हे राष्ट्र तुझी प्रजा आहे.”

14परमेश्वराने उत्तर दिले, “मी स्वत: तुझ्याबरोबर येईन व तुला विसावा देईन.”

15मग मोशे परमेश्वराला म्हणाला, “जर तूं स्वतः येणार नाहीस तर मग आम्हाला या येथून पुढे नेऊ नकोस.

16तसेच तुझी कृपादृष्टी माझ्यावर व तुझ्या लोकांवर झाली आहे हे कशावरून समजावे? जर तू आमच्याबरोबर आल्याने मी व हे तुझे लोक पृथ्वीवरील इतर सर्व लोकाहून वेगळे झालो आहो यावरूनच ते समजावयाचें ना?”

17मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू मागतोस त्याप्रमाणे मी करीन, कारण माझी कृपादृष्टि तुझ्यावर झाली आहे आणि मी व्यक्तिशः तुला तुझ्या नावाने ओळखतो.”

18नंतर मोशे म्हणाला, “आता कृपाकरून मला तुझे तेज दाखव.”

19मग परमेश्वराने मोशेला उत्तर दिले, मी माझे सर्व चांगुलपण तुझ्यापुढे चालवीन; मी परमेश्वर आहे आणि हे माझे नांव मी जाहीर करीन. ज्यावर कृपा करावीसी वाटेल त्याजवर मी कृपा करीन आणि ज्यावर दया करावीसी वाटते त्यावर दया करीन.

20परंतु तू माझा चेहरा पाहू शकणार नाहीस, कारण माझा चेहरा पाहिलेला कोणीही माणूस जीवंत राहणार नाही.

21परमेश्वर म्हणाला, “माझ्याजवळ ह्या ठिकाणी एक खडक आहे; तू त्यावर उभा राहा.

22माझे तेज त्या जागेजवळून पुढे जाईल तेव्हा मी तुला त्या खडकातील मोठ्या भेगेत ठेवीन; आणि मी निघून जाईपर्यत माझ्या हाताने तुला झाकीन;

23नंतर मी माझा हात काढून घेईन आणि तू माझी पाठ पाहशील; परंतु तू माझा चेहरा पाहणार नाहीस.”


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Exodus 33 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran