Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Exodus 32 >> 

1मोशेला पर्वतावरून उतरण्यास बराच विलंब लागला आहे असे लोकांनी पाहिले तेव्हा सर्व लोक अहरोनाभोवती जमले व त्याला म्हणाले, “पाहा, मोशेने आम्हाला मिसर देशातून बाहेर आणले आहे. परंतु मोशेचे काय झाले ते आम्हांस कळत नाही, म्हणून आमच्यापुढे चालतील असे देव आमच्यासाठी तयार कर.”

2तेव्हा अहरोन लोकांना म्हणाला, “तुम्ही तुमच्या स्रिया, पुत्र व कन्या यांच्या कानातील सोन्याची कुंडले मजकडे आणा.”

3मग सर्व लोकांनी आपल्या कानातील सोन्याची कुंडले काढून अहरोनाकडे आणली.

4अहरोनाने लोकांकडून ते सोने घेतले; आणि ते ओतून व कोरणीने कोरुन त्यापासून वासरू केले. मग लोक म्हणाले, “हे इस्त्राएला, ज्या देवाने तुला मिसर देशातून बाहेर आणले आहे तो हाच देव आहे.”

5अहरोनाने हे सर्व पाहिले तेव्हा त्याने त्या वासरापुढे एक वेदी बांधली आणि जाहीर करून तो म्हणाला, “तुमच्या परमेश्वराकरता उद्या उत्सव होणार आहे.”

6लोक दुसऱ्या दिवशी पहाटेस उठले; त्यांनी होमार्पणे अर्पिली व शांत्यर्पणे आणली. मग ते खाण्यापिण्यास बसले; नंतर उठून ते खेळायला लागले.

7त्यासमयी परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू पर्वत उतरुन लवकर खाली जा, कारण ज्या तुझ्या लोकांना तू मिसर देशातून बाहेर आणले ते बिघडले आहेत.

8ज्या मार्गाने त्यांनी जावे म्हणून मी त्यांना आज्ञापिले होते त्या मार्गापासून किती लवकर ते बहकून गेले आहेत. त्यांनी आपल्यासाठी सोने वितळवून वासराची मूर्ति केली आहे; ते त्याची पूजा करीत आहेत व त्याला बलि अर्पणे वाहात आहेत; ते म्हणत आहेत, ‘हे इस्त्राएला, ह्याच देवांनी तुला मिसर देशातून बाहेर आणले आहे.”

9परमेश्वर मोशेला म्हणाला, “ह्या लोकांना मी पाहिले आहे; ते ताठमानेचे लोक आहेत;

10तर आता मला आड येऊ नको, त्यांना माझ्या रागाच्या तडाख्याने भस्म करतो. नंतर मी तुझ्यापासूनच एक महान राष्ट्र निर्माण करतो.”

11परंतु काकुळतीने विनंती करून मोशे आपला देव परमेश्वर ह्याला म्हणाला, हे परमेश्वरा, तुझ्या महान सामर्थ्याने व भुजप्रतापाने त्यांना मिसर देशातून बाहेर आणले त्यांच्यावर तुझा कोप का भडकावा?

12आणि परमेश्वराने त्यांचे वाईट करण्यासाठी, डोंगरावर त्यांना ठार मारण्यासाठी व पृथ्वीवरुन त्यांचा नायनाट करण्यासाठी त्यांना मिसर देशातून बाहेर आणले असे मिसरी लोकांनी का म्हणावे? आपल्या तीव्र कोपापासून फीर, आणि आपल्या लोकांवर आपत्ति आणण्याच्या हेतूपासून परावृत हो.

13तुझे सेवक अब्राहाम, इसहाक व इस्त्राएल, यांची आठवण कर; तू तुझ्या नावाने शपथ वाहिली होतीस; तू म्हणाला होतास, मी तुमची संतती आकाशातील ताऱ्यांइतकी जास्तीत जास्त करीन, मी ज्या देशाविषयी सांगितले तो सर्व देश मी तुझ्या संततीला देईन व तो सर्वकाळ त्यांचे वतन होईल.

14तेव्हा आपल्या लोकांवर आपत्ति आणण्याचा जो परमेश्वराचा हेतु होता, त्यापासून तो परावृत्त झाला.

15मग मोशे पर्वतावरुन साक्षपटाच्या दोन पाट्या घेऊन पर्वतावरून खाली उतरला. त्या पाट्यावर पुढे व मागे अशा दोन्ही बाजूंना लिहिलेले होते.

16देवाने स्वत:च त्या पाट्या तयार केल्या होत्या व त्यांच्यावर कोरलेला लेख देवाने लिहिलेला होता.

17यहोशवाने लोकांचा गोंगाट ऐकला व तो मोशेला म्हणाला, “छावणीत लढाईसारखा आवाज ऐकू येत आहे.”

18मोशेने उत्तर दिले, “एखाद्या सैन्याच्या विजयाचा हा आवाज नाही किंवा एखाद्या सैन्याच्या पराभवचा हा आक्रोश नाही; मला जो आवाज ऐकू येत आहे तो नाचगाण्यांचा आहे.”

19मोशे छावणीजवळ येऊन पोहोंचल्यावर त्याने ते सोन्याचे वासरू व लोकांच्या नाचगाण्यांचा धिंगाणा पाहिला आणि तो भयंकर संतापला; त्याने आपल्या हातातल्या दगडी पाट्या खाली डोंगराच्या पायथ्याशी फेकून फोडून टाकल्या.

20नंतर लोकांनी बनविलेले ते सोन्याचे वासरू मोशेने तोडून फोडून ते अग्नीत जाळले. व कुटून त्याची पूड केली; मग ती पाण्यात टाकली. नंतर ते पाणी त्याने इस्त्राएल लोकांस पिण्यास दिले.

21मोशे अहरोनास म्हणाला, “ह्या लोकांनी तुझे असे काय केले होते की तू त्यांना असे भयंकर पाप करावयास लावलेस?”

22अहरोन मोशेला म्हणाला, “स्वामी, असे माझ्यावर रागावू नका; ह्या लोकांची प्रवृति पापाकडे आहे, हे आपणास माहीत आहे.

23लोक मला म्हणाले, ‘मोशेने आम्हाला मिसर देशातून काढून बाहेर आणले; परंतु आता त्याचे काय झाले हे आम्हाला माहीत नाही; तेव्हा आमच्यापुढे चालतील असे देव तू आमच्यासाठी करून दे.’

24तेव्हा मी त्यांना सांगितले, ‘जर तुम्हाकडे सोन्याची कुंडले असतील तर ती मला द्या.’ तेव्हा लोकांनी मला त्यांच्याकडील सोने दिले; मी सोने भट्टीत टाकले आणि तिच्यातून हे वासरू बाहेर आले.”

25मोशेने पाहिले की अहरोनाने लोकांवरचे नियंत्रण ढिले केले त्यामुळे ते बेभान होत गेले आणि त्यांच्या मूर्खपणाच्या आचरणाचा तमाशा त्यांच्या शत्रूंनी पाहिला.

26तेव्हा मोशे छावणीच्या दाराजवळ उभा राहिला आणि म्हणाला, “ज्या कोणाला परमेश्वराच्या मागे यावयाचे असेल, त्याने मजकडे यावे,” आणि लगेच लेवी वंशाचे सर्व लोक मोशेकडे जमा झाले.

27मग मोशे त्यांना म्हणाला, “इस्त्राएलाचा देव परमेश्वर काय म्हणतो ते मी तुम्हांस सांगतो, ‘प्रत्येकाने आपल्या कमरेस तलवार लटकावावी आणि छावणीच्या ह्या प्रवेशव्दारापासून त्या प्रवेशव्दारापर्यत अवश्य जावे आणि प्रत्येक माणसाने आपला भाऊ, मित्र व शेजारी यांना अवश्य जिवे मारावे.”

28लेवी वंशाच्या लोकांनी मोशेची आज्ञा पाळली आणि त्यादिवशी सुमारे तीन हजार इस्त्राएल लोक मेले.

29मग मोशे म्हणाला, “आज आपणाला परमेश्वराकरता समर्पण करून प्रत्त्येक पुरुषाने आपल्या पुत्रावर व भावावर चालून जावे, म्हणजे आज तो तुम्हाला आशीर्वाद देईल.”

30दुसऱ्या दिवशी सकाळी मोशेने लोकांना सांगितले, “तुम्ही भयंकर पाप केले आहे! परंतु आता मी परमेश्वराकडे पर्वतावर जातो; काहीतरी करून कदाचित् मला तुमच्या पापांचे प्रायश्चित करता येईल.”

31तेव्हा मोशे माघारी परमेश्वराकडे जाऊन म्हणाला, हाय, हाय ह्या लोकांनी फार घोर पातक केले आहे. आपणासाठी सोन्याचे देव बनविले;

32तरी आता तू त्यांच्या ह्या पापांची क्षमा कर! परंतु जर तू त्यांच्या पापांची क्षमा करणार नसशील तर मग तू लिहिलेल्या जीवनी पुस्तकातून मला काढून टाक.

33परंतु परमेश्वर मोशेला म्हणाला, “जे मजविरुद्ध पाप करतात केवळ त्या लोकांचीच नांवे मी माझ्या पुस्तकातून काढून टाकतो.

34तेव्हा तू आता खाली जा आणि मी सांगतो तेथे लोकांना घेऊन जा; माझा दूत तुजपुढे चालेल व तुला मार्ग दाखवील जेव्हा पाप केलेल्या लोकांना शिक्षा करण्याची वेळ येईल तेव्हा त्यांना शिक्षा केली जाईल.”

35अहरोनाने बनवलेले वासरू लोकांनीच बनविले होते, म्हणून परमेश्वराने त्यांना ताडण केले.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Exodus 32 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran