Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Leviticus 16 >> 

1अहरोनाचे दोन मुलगे परमेश्वरासमोर गेले असताना मरण पावले त्यानंतर परमेश्वर मोशेशी बोलला.

2परमेश्वर मोशेला म्हणाला, "तुझा भाऊ अहरोन ह्याच्याशी बोल व त्याला सांग की त्याने वाटेल त्यावेळी परमपवित्रस्थानात अंतरपटाच्या आत पवित्र कोशावर असलेल्या दयासनापुढे जाऊ नये; अहरोन जर तेथे जाईल तर तो मरेल, कारण तेथे दयासनावरील ढगात मी दर्शन देत असतो;

3परमपवित्रस्थानात जाण्यापूर्वी अहरोनाने पापार्पणासाठी एक गोऱ्हा व होमार्पणासाठी एक मेंढा आणावा.

4त्याने पाण्याने स्नान करावे मग तागाचा पवित्र सदरा व तागाचे चोळणे आपल्या अंगात घालावे; तागाच्या कमरपट्ट्याने आपली कमर कसावी आणि तागाचा फेटा बांधावा; ही पवित्र वस्त्रे आहेत.

5मग त्याने इस्राएलाच्या मंडळीकडून पापार्पणासाठी दोन बकरे व होमार्पणासाठी एक मेंढा घ्यावा.

6अहरोनाने आपल्यासाठी पापार्पणाचा गोऱ्हा अर्पण करून स्वत:साठी व आपल्या घराण्यासाठी प्रायश्चित करावे.

7त्यानंतर त्याने ते दोन बकरे घेऊन दर्शनमंडपाच्या दारापाशी परमेश्वरासमोर उभे करावेत.

8अहरोनाने त्या दोन बकऱ्यावर चिठ्या टाकाव्या; एक चिठ्ठी परमेश्वरासाठी व दुसरी पाप वाहुन नेणाऱ्या बकऱ्यासाठी

9ज्या बकऱ्यावर परमेश्वरासाच्या नावाची चिठ्ठी निघेल तो बकरा अहरोनाने पापार्पण म्हणून अर्पण करावा;

10पाप वाहून नेण्यासाठी अशी चिठ्ठी निघालेला बकरा परमेश्वरासमोर जिवंत उभा करावा व त्याच्याद्वारे प्रायश्चित व्हावे म्हणून पाप वाहून नेण्यासाठी रानात सोडून द्यावा.

11अहरोनाने अापल्यासाठी पापार्पणाच्या गोऱ्ह्याचे अर्पण करून स्वत:साठी व स्वत:च्या घराण्यासाठी प्रायश्चित करावे. म्हणजे त्याने स्वत:हासाठी गोऱ्हा पापार्पण म्हणुन वधावा.

12नंतर अहरोनाने परमेश्वरासमोर असलेल्या वेदीवरील निखाऱ्यांनी भरलेले धुपाटणे घ्यावे आणि कुटून बारीक केलेला ओंजळभर सुगंधी धूप अंतरपटामागील आतल्या खोलीत आणावा.

13त्याने तो धुप परमेश्वरासमोर अग्नीवर, असा घालावा की त्याच्या धुराने साक्षपटावरील दयासन व्यापून टाकावे, म्हणजे तो मरणार नाही;

14त्याचप्रमाणे त्याने गोऱ्ह्याचे काही रक्त घेऊन ते दयासनासमोर बोटाने शिंपडावे आणि काही रक्त दयासनासमोर बोटाने सात वेळा शिंपडावे.

15मग अहरोनाने लोकांसाठी आणलेला पापार्पणाचा बकरा वधावा; त्याचे रक्त अंतरपटाच्या आत घेऊन जावे आणि त्याने गोऱ्ह्याच्या रक्ताचे जसे केले तसेच बकऱ्याच्या रक्ताचे करावे म्हणजे ते दयासनावर व दयासनासमोर शिंपडावे.

16अाणखी त्याने इस्राएली लोकांची अशुद्धतेची कामे, त्यांची बंडखोरी व त्यांची सर्व पापे ह्या सर्वांबद्दल परमपवित्रस्थानासाठी प्रायश्चित करावे; परमेश्वर त्यांच्यामध्ये जेथे वसती करतो त्या, लोकांच्या अशुद्धतेने व्याप्त असलेल्या दर्शनमंडपासाठीही त्याने तसेच करावे.

17अहरोन प्रायश्चित करण्यासाठी परमपवित्रस्थानात प्रवेशकरण्यासाठी जाईल तेव्हा, तो स्वतःसाठी व स्वत:च्या घराण्यासाठी आणि इस्राएल लोकांसाठी प्रायश्चित करून बाहेर येईपर्यंत दर्शनमंडपात कोणीही नसावे व कोणीही तेथे जाऊ नये.

18मग त्याने तेथून निघून परमेश्वरासमोरील वेदीपाशी जावे व तिच्यासाठी प्रायश्चित करावे, त्याने गोऱ्ह्याचे काही रक्त व बकऱ्याचे काही रक्त घेऊन त्या वेदीच्या चारही बाजूच्या शिंगांना लावावे.

19मग त्याने काही रक्त घेऊन आपल्या बोटाने ते सात वेळा तिच्यावर शिंपडावे; अशा प्रकारे त्याने इस्राएली लोकांच्या अशुद्धतेपासून ती शुद्ध व पवित्र करावी.

20जेव्हा परमपवित्रस्थान, दर्शनमंडप आणि वेदी ह्यांच्याकरता तो प्रायश्चित करणे संपवतो त्यानंतर त्याने तो जिवंत बकरा सादर करावा.

21अहरोनाने आपले दोन्ही हात त्या जिवंत बकऱ्याच्या डोक्यावर ठेवून इस्राएली लोकांची सर्व पापे व अपराध ह्यांचा अंगिकार करावा; व ती त्या बकऱ्याच्या डोक्यावर ठेवून त्याला घेऊन जाण्यासाठी तयार असलेल्या माणसाच्या हाती रानात पाठवून द्यावे.

22तेव्हा तो बकरा त्या लोकांच्या सर्व दुष्कर्मांचा भार घेऊन निर्जन रानात वाहून नेईल; त्या माणसाने त्या बकऱ्याला रानात सोडून द्यावे.

23मग अहरोनाने पुन्हा दर्शनमंडपात जावे आणि परमपवित्रस्थानात जाण्यापूर्वी घातलेली तागाची वस्त्रे काढावी आणि त्याने ती तेथेच ठेवावीत.

24मग त्याने एखाद्या पवित्र ठिकाणी पाण्याने आंघोळ करावी, आपली वस्त्रे घालावी व तेथून बाहेर येऊन स्वत:साठी होमार्पण करावे तसेच लोकांसाठीही होमार्पण करावे आणि स्वत:साठी व लोकांसाठी प्रायश्चित करावे.

25मग त्याने पापार्पणाच्या चरबीचा वेदीवर होम करावा.

26ज्या माणसाने पाप वाहून नेण्यासाठी निवडलेला बकरा रानात सोडून दिला त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने आंघोळ करावी व त्यानंतर तो छावणीत प्रवेश करु शकतो.

27पापार्पणाच्या ज्या गोऱ्ह्याचे व बकऱ्याचे रक्त प्रायश्चितासाठी पवित्रस्थानात नेले होते त्या दोन्ही पशूंना छावणीच्या बाहेर न्यावे. तेथे त्यांचे कातडे, मांस व शेण ही अग्नीत जाळून टाकावीत.

28ज्या माणसाने ती जाळून टाकली त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने आंघोळ करावी; यानंतर तो छावणीत येवू शकतो.

29तुमच्यासाठी हा एक कायमचा विधी असावा; सातव्या महिन्याच्या दशमीस तुम्ही अन्न न घेता उपास करावा आणि त्या दिवशी कोणीही कोणतेही काम करू नये, मग तो तुमच्यात जन्मलेल्यांपैकी असो किंवा तुमच्यात राहणारा परदेशीय असो;

30हे यासाठी की ह्या दिवशी तुमच्यासाठी तुम्ही तुमच्या सर्व पापांपासून शुद्ध व्हावे म्हणून प्रायश्चित करण्यात येईल, जेणेकरून तुम्ही परमेश्वरासमोर शुद्ध व्हाल.

31तुमच्यासाठी हा पूर्ण विश्रामाचा शब्बाथ आहे; तुम्ही उपवास करावा व कसलेही काम करु नये; हा तुमच्यामध्ये कायमचा विधी असणार आहे.

32तेव्हा आपल्या पित्याच्या जागी मुख्य याजक म्हणून ज्याची निवड होऊन ज्याचा अभिषेक होईल त्याने तागाची पवित्र वस्त्रे घालून प्रायश्चित करावे.

33त्याने परमपवित्रस्थान, दर्शनमंडप व वेदी तसेच याजकवर्ग आणि सर्व इस्राएल लोक ह्याच्यासाठी प्रायश्चित करावे.

34इस्राएल लोकांसाठी त्यांच्या सर्व पापाबद्दल वर्षातून एकदा प्रायश्चित करण्याकरिता हा कायमचा विधी होय परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणे त्यांनी ते सर्व केले.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Leviticus 16 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran