Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Numbers 14 >> 

1त्या रात्री सर्व मंडळीने गळा काढून जोरजोरात आक्रोश केला आणि रडले.

2इस्त्राएल लोकांनी मोशे आणि अहरोनाविरुद्ध तक्रारी केल्या. सर्व मंडळी त्यांना म्हणाली “आम्ही मिसर देशामध्ये किंवा रानात मेलो असतो तर बरे झाले असते.

3तरवारीने आमचा नाश व्हावा म्हणून या नवीन प्रदेशात युद्धात जाण्यासाठीच परमेश्वराने आम्हाला इथे आणले का? शत्रू आम्हाला मारून टाकील आणि आमच्या बायका मुलांना घेऊन जाईल. मिसर देशात परत जाणेच आमच्या दृष्टीने जास्त बरे आहे.”

4नंतर ते एकमेकांना म्हणाले, “आपण आता दुसरा नेता निवडू आणि मिसर देशात परत जाऊ.”

5तिथे जमलेल्या सर्व इस्त्राएलांच्या मंडळीसमोर मोशे आणि अहरोन पालथे पडले.

6नूनाचा मुलगा यहोशवा आणि यफुन्नेचा मुलगा कालेब, जे कोणी देश तपासणीसाठी पाठवले त्यातले काही होते, त्यांनी आपली वस्त्रे फाडली.

7ते इस्त्राएल लोकांच्या सर्व मंडळीशी ते बोलले. ते म्हणाले, आम्ही जो देश हेरायला येथून तेथे फिरलो तो देश खूप चांगला आहे.

8जर परमेश्वर आपल्यावर प्रसन्न झाला तर तो आपल्याला त्या देशात नेईल आणि तो दूध व मध वाहणारा देश आपल्याला देईल.

9“परंतु परमेश्वराविरुद्ध बंड करू नका आणि त्या देशातल्या लोकांची भीती बाळगू नका. आपल्या अन्नाप्रमाणे आपण त्यांना सहज भक्ष्य करू. त्यांचे संरक्षण त्यांच्यापासून काढले जाईल, कारण परमेश्वर आमच्याबरोबर आहे. त्यांना घाबरु नका.”

10पण सर्व मंडळी म्हणू लागली त्यांना दगडमार करा. परंतु परमेश्वराचे तेज सभामंडपावर इस्त्राएल लोकांना दिसले.

11परमेश्वर मोशेला म्हणाला, “हे लोक कोठवर मला तुच्छ लेखतील? ह्यांच्यामध्ये मी केलेली शक्तिशाली चिन्हे पाहूनही त्याची पर्वा न करता माझ्यावर विश्वास ठेवण्यास चुकत आहेत.

12मी त्यांना मरीने मारून टाकीन. मी त्यांचा वारसा हक्क काढून घेईल, आणि मी तुझ्या स्वतःच्या कुळापासून त्यांच्यापेक्षा मोठे व सामर्थ्यशाली राष्ट्र करीन.”

13मोशे परमेश्वराला म्हणाला, जर तू असे केलेस तर ते मिसरी लोक ऐकतील कारण तू आपल्या सामर्थ्याने ह्या लोकांना बाहेर आणले.

14ते त्या देशातल्या राहणाऱ्यांना हे सांगतील, त्यांनी ऐकले आहे की तू परमेश्वर या लोकांच्या मध्ये आहेस, कारण तू परमेश्वर प्रत्यक्ष दिसत आहेस तुझा ढग त्यांच्यावरती उभा राहतो, आणि दिवसा ढगाच्या खांबात रात्री त्या ढगाचा अग्नीच्या खांबात तू त्यांच्यापुढे चालतोस.

15आता जर तू या लोकांना एका माणसाप्रमाणे मारले, तर ज्या राष्ट्रांनी तुझी किर्ती ऐकली आहे ते बोलतील आणि म्हणतील,

16परमेश्वराने त्यांना जो देश देण्याचे शपथपूर्वक सांगितले होते त्यात तो आणू शकला नाही म्हणून त्याने त्यांना रानात मारून टाकले.

17“म्हणून आता मी विनंती करतो, तुझ्या महान सामर्थ्याचा उपयोग कर. तू, म्हणाला होतास,

18परमेश्वर रागवायला मंद आहे आणि विपुल दयेने भरलेला आहे. तो अपराधांची व अधर्माची क्षमा करतो पण जे लोक अपराधी आहेत त्यांची मुळीच गय करत नाही. तो पूर्वजांच्या पापाबद्दल त्यांच्या वंशजाच्या तिसऱ्या व चवथ्या पिढीवर वडिलांच्या अन्यायाची शिक्षा लेकरांना करतो.

19मी तुला विनंती करतो, तुझ्या महान विश्वासनीयतेच्या कराराने त्यांच्या पापांची क्षमा कर. त्यांनी मिसर सोडल्यापासून आतापर्यंत तू जसा त्यांना क्षमा करीत आला आहेत तशीच आताही त्यांना क्षमा कर.”

20परमेश्वर म्हणाला, “तू विनंती केल्याप्रमाणे मी त्यांना क्षमा केली आहे.”

21पण खचित जसा मी जिवंत आहे आणि सारी पृथ्वी परमेश्वराच्या वैभवाने भरलेली आहे.

22ज्या सर्व लोकांनी माझे वैभव आणि मिसर देशात व रानात सामर्थ्याची चिन्हे पाहिले. तरी दहादा त्यांनी माझी परीक्षा पाहिली आणि माझी वाणी ऐकली नाही.

23मी जो देश त्यांच्या पूर्वजांना शपथपूर्वक देऊ केला तो खचित पाहणार नाही. ज्यांनी मला तुच्छ मानले त्यांच्यापैकी तो कोणीही पाहणार नाही.

24पण माझा सेवक कालेब याच्यासोबत वेगळा आत्मा होता. तो माझे अनुकरण पूर्णपणे करतो. म्हणून ज्या देशात तो गेला होता त्या देशात मी त्याला नेईल. आणि त्याच्या वंशजांना तो देश वतन होईल.

25अमालेकी आणि कनानी लोक खोऱ्यात रहात आहेत. म्हणून उद्या तुम्हीही जागा सोडली पाहिजे. तांबड्या समुद्राकडे रस्त्यावरच्या रानात परत जा.

26परमेश्वर मोशे आणि अहरोनाशी बोलला. तो म्हणाला,

27ही दुष्ट मंडळी माझ्याविरुद्ध टिका करते त्यांचे मी किती काळ सहन करू? इस्त्राएली लोक माझ्याविरूध्द तक्रार करतात त्या मी ऐकल्या आहेत.

28तू त्यांना सांग, परमेश्वर म्हणतो, मी जिवंत आहे. जसे तुम्ही माझ्या कानात बोलला तसे मी करीन.

29तुमची प्रेते ह्या रानात पडतील. तुमच्यापैकी ज्यांची गणना झाली त्यांच्या पूर्ण संख्येतील वीस वर्षांचा किंवा त्याहून अधिक वयाचे ज्यांनी माझ्याविरुद्ध कुरकुरले,

30ज्या देशात तुमचे घर देण्याचे वचन मी तुम्हाला दिले त्यात तुमच्यापैकी कोणीही जाणार नाही. फक्त यफुन्नेचा मुलगा कालेब आणि नूनाचा मुलगा यहोशवा जातील.

31ज्या तुमच्या मुलाबाळाविषयी तुम्ही म्हणाला की, त्यांची लूट होईल. मी त्यांना त्या देशात नेईल. तुम्ही जो देश नाकारला तो देश ते अनुभवतील.

32आणि तुमच्याविषयी तर तुमची प्रेते या रानात पडतील.

33तुमची प्रेते ह्या रानात नष्ट होईपर्यत चाळीस वर्षे तुमची मुलेबाळे तुम्ही केलेल्या विश्वासघाताची शिक्षा भोगीत रानात भटकणारी होतील.

34तुम्हाला तुमच्या पापाबद्दल चाळीस वर्षे दु:ख भोगावे लागेल. त्या माणसांना तो प्रदेश शोधायला चाळीस दिवस लागले. त्या प्रत्येक दिवसासाठी एक वर्ष मी तुमच्या विरोधात असणे ही किती भयानक गोष्ट आहे हे तुम्हाला समजेल.

35“मी परमेश्वर आहे आणि मी बोललो आहे. मी वचन देतो की या दुष्ट माणसांना मी या सर्व गोष्टी करीन. माझ्याविरुद्ध जाण्यासाठी ते लोक एकत्र आले म्हणून ते सर्व या रानात मरतील.”

36मोशेने ज्या लोकांना नवीन प्रदेश शोधण्यासाठी पाठवले होते त्याच लोकांनी परत येऊन इस्त्राएल लोकांमध्ये तक्रारी पसरावयाला सुरुवात केली. ते लोक म्हणाले की त्या प्रदेशात जाण्याइतके आपले लोक शक्तिवान नाहीत.

37ज्यांनी वाईट वर्तमान आणले ते पुरुष जबाबदार होते ते परमेश्वरासमोर मरीने मेले.

38यफुन्नेचा मुलगा कालेब आणि नूनाचा मुलगा यहोशवा हे ही तो देश शोधायला पाठवलेल्या लोकांत होते परंतु परमेश्वराने त्या दोघांना वाचवले.

39मोशेने या सर्व गोष्टी इस्त्राएल लोकांना सांगितल्या. लोक खूप दु:खी झाले.

40दुसऱ्या दिवशी पहाटे लोकांनी डोंगरावर असलेल्या त्या देशात जायला सुरुवात केली. लोक म्हणाले, “आम्ही पाप केले आहे. आम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवला नाही याचे आम्हाला वाईट वाटते. परमेश्वराने वचन दिलेल्या देशात आम्ही जाऊ.”

41पण मोशे म्हणाला, “तुम्ही परमेश्वराची आज्ञा का पाळत नाही? तुम्हाला यश मिळणार नाही.

42त्या देशात जाऊ नका. परमेश्वर तुमच्याबरोबर नाही म्हणून तुमचा सहज पराभव होऊ शकेल.

43अमालेकी आणि कनानी लोक आहेत तुम्ही तरवारीने पडाल. तुम्ही परमेश्वरापासून दूर गेला आहात म्हणून युध्दाच्या वेळी तो तुमच्याबरोबर नसेल आणि तुम्ही सर्व युद्धात मारले जाल.”

44परंतु लोकांनी मोशेवर विश्वास ठेवला नाही. ते उंच डोंगरावरच्या प्रदेशात गेले. परंतु मोशे आणि परमेश्वराचा आज्ञापटाचा कोश त्यांच्याबरोबर गेला नाही.

45डोंगरावरच्या प्रदेशात राहणारे अमालेकी आणि कनानी लोक खाली आले आणि त्यांनी इस्त्राएल लोकांवर हल्ला केला. त्यांनी इस्त्राएल लोकांचा सहज पराभव केला आणि हर्मापर्यंत त्यांचा पाठलाग केला.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Numbers 14 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran