Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  2 Samuel 10 >> 

1पुढे अम्मोन्यांचा राजा नाहाश मरण पावला. त्याच्यानंतर त्याचा मुलगा हानून राज्यावर आला.

2दावीदाने विचार केला, नाहाशचा माझ्यावर लोभ होता तेव्हा त्याचा मुलगा हानून याच्याशी मी सौजन्याने वागेन दावीदाने मग हानूनला पितृशोक झाला म्हणून त्याच्या सांत्वनासाठी आपल्या सेवकांना पाठवले तेव्हा ते सेवक अम्मोन्यांच्या प्रांतात आले.

3पण अम्मोनी अधिकारी त्यांचा स्वामी हानून याला म्हणाले, तुमच्या सांत्वनासाठी माणसे पाठवून दावीद तुमच्या वडीलांचा मान राखतोय असे तुम्हाला वाटते का? उलट गुप्तपणे तुमच्या प्रांतातील खबर काढायला त्याने या लोकांना पाठवले आहे. त्यांचा तुझ्याविरुद्ध उठाव करायचा बेत आहे.

4तेव्हा हानूनने दावीदाच्या त्या सेवकांना ताब्यात घेतले, आणि त्यांच्या दाढ्या अर्ध्या छाटल्या त्यांची कंबरेखालची वस्त्रे मध्यभागी फाडून ठेवली एवढे करून त्यांना त्याने परत पाठवले.

5लोकांकडून हे दावीदाला कळले तेव्हा त्याने आपल्या या सेवकांची गाठ घेण्यास माणसे पाठवली हे सेवक खूप लज्जीत झाले होते. दावीदाने त्यांना सांगितले, तुमच्या दाढ्या वाढून पूर्ववत होईपर्यंत यरीहो येथेच राहा मग यरुशलेम येथे या.

6आपण दावीदाचे शत्रुत्व ओढवले आहे हे अम्मोन्यांच्या लक्षात आले. तेव्हा त्यांनी बेथ-रहोब आणि सोबा येथील अरामी माणसे मोलाने घेतली. अराम्यांचे पायदळ वीस हजारांचे होते. शिवाय माका राजाची एक हजार माणसे तसेच तोबचे बारा हजार सैनिक घेतले.

7दावीदाने हे ऐकले तेव्हा आपल्या लढाऊ सैन्यासह यवाबाला पाठवले.

8तेव्हा अम्मोनी लोकांनी बाहेर पडून युध्दाला सज्ज झाले व नगराच्या वेशीपाशी त्यांनी व्यूह रचला, सोबा आणि रहोब येथील अरामी तसेच माकाचे व तोबचे सैनिक हे सर्व मिळून स्वतंत्रपणे युद्धासाठी उभे राहिले.

9अम्मोन्यांनी पुढून तसेच मागून आपल्याला घेरले आहे हे यवाबाने पाहिले तेव्हा त्याने इस्राएलातील उत्तम योध्यांची निवड केली त्यांना अराम्यांच्या विरुद्ध लढायला सज्ज केले.

10मग आपला भाऊ अबीशय याच्या हवाली आणखी काही माणसांना करून अम्मोन्यांचा सामना करायला सांगितले.

11यवाब अबीशयला म्हणाला, अरामी मला भारी पडत आहेत असे दिसले तर तू माझ्या मदतीला ये. जर अम्मोनी प्रबल आहेत असे लक्षात आले तर मी तुझ्या मदतीला येईन.

12हिम्मत बाळग आपल्या लोकांसाठी, देवाच्या नगरांसाठी आपण पराक्रमाची शिकस्त करु. परमेश्वर त्याला योग्य वाटेल तसे करील.

13यानंतर यवाबाने आपल्या लोकांसह अराम्यांवर चढाई केली. अरामी लोकांनी त्यांच्या समोरुन पळ काढला.

14अराम्यांनी पलायन केलेले पाहताच अम्मोनीही अबीशय समोरुन पळून गेले आणि आपल्या नगरात परतले. अम्मोन्यांबरोबरच्या या लढाई नंतर यवाब यरुशलेमला परतला.

15इस्राएलानी आपला पराभव केला हे अराम्यांनी पाहिले. तेव्हा ते सर्व एकत्र आले आणि त्यांनी (मोठे सैन्य उभारले)

16हद्देजरने नदीच्या पलीकडे राहाणाऱ्या अराम्यांना एकत्र आणण्यासाठी माणसे पाठवली. हे अरामी हेलाम येथे आले. हद्देजरचा सेनापती शोबख याने त्यांचे नेतृत्व केले.

17हे दावीदाच्या कानावर आले. तेव्हा त्याने सर्व इस्राएलीना एकत्र आणले. यार्देन नदी पार करून ते हेलाम येथे गेले तेथे अराम्यांनी सर्व तयारीनिशी हल्ला केला.

18पण दावीदाने अराम्यांचा पराभव केला. अराम्यांनी इस्राएल लोकां समोरुन पळ काढला. दावीदाने सातशे रथांवरील माणसे आणि चाळीस हजार घोडेस्वार यांना ठार केले. अरामी सैन्याचा प्रमुख शोबख यालाही दावीदाने ठार केले.

19हद्देजरच्या मांडलीक राजांनीही इस्राएलांनी केलेला हा पराभव पाहिला. तेव्हा त्यांनी इस्राएलांशी तह केला व इस्राएलांचे ते चाकर झाले. पुन्हा अम्मोन्यांना मदत करायची अम्मोन्यांनी धास्ती घेतली.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  2 Samuel 10 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran