Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  2 Samuel 11 >> 

1वसंत ऋतूमध्ये ज्यावेळी राजे युध्द मोहिमांवर जातात त्यावेळी दावीदाने यवाबाला सर्व नोकरा चाकरांचा लवाजमा आणि समस्त इस्राएलांना अम्मोन्यांच्या संहारासाठी पाठवले. यवाबाच्या सैन्याने अम्मोन्यांच्या राब्बा या राजधानीच्या शहराला वेढा घातला दावीद मात्र यरूशलेम येथेच राहिला.

2संध्याकाळी तो आपल्या पलगांवरुन उठला आणि राजमहालाच्या छतावरुन फिरु लागला. तिथून त्याला एक स्त्री स्नान करताना दिसली ती अतिशय रुपवान होती.

3तेव्हा दावीदाने आपल्या सेवकवर्गाला बोलवून तिची माहिती काढली सेवकाने सांगितले ती अलीयमची मुलगी बथशेबा उरीया हित्ती याची पत्नी आहे.

4तिला आपल्याकडे घेऊन यायला दावीदाने निरोप्याला पाठवले ती आल्यावर दावीदाने तिच्याशी शरीरसंबंध केला नंतर स्नान करून शुध्द होऊन ती पुन्हा आपल्या घरी परतली.

5पण बथशेबा गर्भवती राहिली दावीदाला तिने निरोप पाठवला तिने सांगितले, मी गरोदर आहे.

6दावीदाने यवाबाला निरोप पाठवला की उरीया हित्तीला माझ्याकडे पाठवा तेव्हा यवाबाने उरीया हित्तीला दावीदकडे पाठवले.

7उरीया आल्यावर दावीद त्याच्याशी बोलला. उरीयाला त्याने यवाब, सर्व सैन्य, लढाई यांचे वर्तमान विचारले.

8मग म्हणाला, घरी जा आणि आराम कर उरीया महालातून बाहेर पडला त्यानंतर त्याच्यासाठी राजातर्फे भेट पाठवण्यात आली

9पण उरीया घरी गेला नाही तो महालाच्या बाहेरच दाराशी झोपून राहिला. राजाच्या सेवक वर्गाप्रमाणेच तो तिथे झोपला.

10उरीया घरी परतला नसल्याचे सेवकांनी दावीदाला सांगितले तेव्हा दावीद उरीयाला म्हणाला तू लांबून प्रवास करून आला आहेस तू घरी का गेला नाहीस?

11उरीया दावीदाला म्हणाला पवित्र कराराचा कोश इस्राएलचे सैनिक आणि यहूदा हे राहूट्यांमध्ये राहात आहेत. माझा धनी यवाब आणि महाराजांचे (दावीदाचे) सेवक ही खुल्या मैदानात तळ देऊन आहेत. अशा वेळी मीच तेवढे घरी जाऊन खाणे-पिणे पत्नीच्या सहवासात झोपणे योग्य होणार नाही.

12दावीद उरीयाला म्हाणाला, आजच्या दिवस इथे राहा उद्या मी तुला युध्दभूमीवर पाठवतो उरीयाने त्या दिवशी यरुशलेममध्येच मुक्काम केला.

13दुसऱ्या दिवशी सकाळी दावीदाने त्याला भेटायला बोलावले. दावीदाबरोबर उरीयाने भोजन केले. दावीदाने त्याला बेहोश होईपर्यंत मद्य पाजले पण तरी उरीया घरी गेला नाही. त्या संध्याकाळी तो राजाच्या सेवकांबरोबरच महालाच्या दाराशी झोपायला गेला.

14दुसऱ्या दिवशी सकाळी दावीदाने यवाबासाठी एक पत्र लिहून ते उरीयाला न्यायला सांगितले.

15त्या पत्रात दावीदाने लिहिले होते आघाडीवर जेथे तुंबळ युध्द चालले असेल तेथे उरीयाला पाठव त्याला एकट्याला तेथे सोडा म्हणजे तो युध्दात कामी येईल.

16यवाबाने नगराची टेहेळणी करून सर्वात लढवय्ये अम्मोनी कोठे आहेत ते पाहिले आणि उरीयाला तेथे नेमले.

17राब्बा नगरातील लोक यवाब विरुद्ध चालून आले दावीदाची काही माणसे मारली गेली उरीया हित्ती हा त्यापैकी एक होता.

18नंतर यवाबाने युध्दातील हकिकतीचे सविस्तरवृत्त दावीदाला पाठवले.

19युध्दात जे जे झाले ते सर्व सांगायला त्याने आपल्या नोकराला सांगितले.

20यवाब सेवकाला म्हणाला, कदाचित राजा संतापून म्हणेल यवाबाचे सैन्य नगराच्या इतके जवळ भिडले कसे? शत्रू तटाच्या भितीवरुन शिरसंधान करतील हे त्याला ठाऊक असायला हवे.

21तेबेसमध्ये यरुब्बेशेथचा पुत्र अबीमलेख याला एका स्त्रीने मारले हे आठवते ना? तिने तटबंदीवरुन जात्याची तळी उचलून अबीमलेखवर टाकली. असे असताना हा इतक्या जवळ का गेला? राजा दावीद असे काही म्हणाला तर त्याला हे ही म्हणावे उरीया हित्ती हा तुमचा सेवकही यात मारला गेला.

22निरोप्याने दावीदाकडे जाऊन यवाबाने जे जे सांगयला सांगितले ते सर्व कथन केले.

23तो म्हणाला अम्मोन्यांनी आमच्यावर मैदानात हल्ला केला आम्ही त्यांचा सामना करून त्यांना नगराच्या वेशीपर्यंत पळवून लावले.

24मग तटबंदीवरील काही लोकांनी आपल्या शिपायांवर बाणांचा वर्षाव केला त्यात काही जण ठार झाले उरीया हित्ती हा तुमचा सेवकही प्राणाला मुकला.

25दावीद त्या निरोप्याला म्हणाला, यवाबाला सांग निराश होऊ नको हिम्मत सोडू नको तलवारीने कोणाचाही संहार होऊ शकतो राब्बावर आणखी जोरदार हल्ला चढवा तुम्ही जिंकाल. यवाबाला माझा हा निरोप सांगून प्रोत्साहन दे.

26उरीया मरण पावल्याचे बथशेबाला कळले तिने पतिनिधनाबद्दल शोक केला.

27काही काळाने तिचे दुःख ओसरल्यावर दावीदाने सेवकाकरवी तिला आपल्याकडे आणले. ती त्याची पत्नी झाली आणि त्याच्या पुत्राला तिने जन्म दिला. पण दावीदाचे हे नीच कृत्य परमेश्वराला पसंत पडले नाही.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  2 Samuel 11 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran