Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  2 Kings 11 >> 

1आणि अहज्याची आई अथल्या हीने आपला मुलगा मरण पावला हे पाहिल्यावर, ती उठली आणि सर्व राजसंतानांची हत्या केली.

2पण यहोशेबा, ही राजा योरामची मुलगी आणि अहज्याची बहीण. योवाश हा राजाच्या अनेक मुलांपैकी एक. इतर मुलांची हत्या होत असताना यहोशेबाने योवाशला बाजूला घेतले आणि आपल्या झोपायच्या खोलीत लपवून ठेवले. तिने योवाश आणि त्याची दाई यांना लपवले. यहोशेबा आणि ती दाई यांनी योवाशला अथल्याच्या तावडीतून सोडवले म्हणून तो मारला गेला नाही.

3योवाश आणि यहोशेबा परमेश्वराच्या मंदिरात सहा वर्षे लपून राहिले. आणि यहूदावर अथल्याचे राज्य होते.

4सातव्या वर्षी महायाजक यहोयादाने अधिकाऱ्यांना त्यांच्या हूजरे आणि पाहारेकरी यांच्यासूद्धा बोलावून घेतले. आणि त्यांना आपल्याबरोबर परमेश्वराच्या मंदिरात नेले. यहोयादाने त्यांच्याशी शपथ व करार करून घेऊन, मग योवाश या राजपुत्राला त्यांच्यापुढे आणले.

5यहोयादाने त्यांना एक आज्ञा केली. तो म्हणाला, “तुम्हाला आता मी सांगतो तसे करायचे आहे. प्रत्येक शब्बाथला तुमच्यापैकी एकतृतीयांश लोकांनी आत यायचे. राजाचे त्याच्या घरात तुम्ही संरक्षण करायचे.

6आणि दुसरे एकतृतीयांश लोकांच्या गटाने सूर वेशीवर थांबायचे आणि तिसऱ्या एकतृतीयांश गटाने पहारेकऱ्यांच्या मागे राहायचे.

7आणि शब्बाथ दिवसाला जे सेवा नाही करत, तुमच्यापैकी असे दोनगट परमेश्वराच्या मंदिराचे रक्षण करतील आणि राजा योवाशला संरक्षण देतील.

8राजा योवाश बाहेर जाईल व आत येईल, तिथे सर्ववेळ तुम्ही त्याच्याबरोबर राहिले पाहिजे. तुम्ही त्याच्याभोवती कडे करावे व प्रत्येक पहारेकऱ्याच्या हातात शस्त्र असेल आणि कोणीही आपल्या फार जवळ आल्यास तुम्ही त्याला मारुन टाकावे.”

9याजक यहोयादने ज्या ज्या आज्ञा दिल्या त्या सर्वांचे त्या शताधीपतींनी पालन केले. प्रत्येक अधिकाऱ्याने आपल्या माणसांना बरोबर घेतले. जी श्ब्बाथात आंत येणारी होती आणि जी शब्बाथात बाहेर जाणारी होती. हे सर्व लोक यहोयादाकडे गेले.

10यहोयादाने भाले आणि ढाली अधिकाऱ्यांच्या हवाली केल्या. दावीदाची परमेश्वराच्या मंदिरात ठेवलेली शस्त्रे ती हीच.

11मंदिराच्या डाव्या टोकापासून उजव्या टोकापर्यंत हे रखवालदार हातात आपापली शस्त्रे घेऊन उभे राहिले. ते वेदी आणि मंदिर यांच्याभोवती तसेच राजा मंदिरात येई तेव्हा त्याच्या भोवती उभे राहात.

12मग यहोयादाने योवाशला बाहेर काढले. त्याला त्यांनी मुकुट घातला आणि आज्ञापट दिला. मग त्यांनी त्याला राजा करून त्याचाअभिषेक केला व टाळ्या वाजवून त्यांनी “राजा चिरायु होवो” म्हणून जयघोष केला.

13हुजऱ्यांचा आणि लोकांचा हा गलबला राणी अथल्याच्या कानावर गेला. तेव्हा ती परमेश्वराच्या मंदिरापाशी गेली.

14राजाची रीतीप्रमाणे स्तंभाजवळ उभे राहायची जी जागा तिथे अथल्याने राजाला उभे असलेले पाहिले. नेते आणि लोक कर्णे वाजवीत आहेत हे ही तिने पाहिले. लोकांना खूप आनंद झालेला आहे हे तिच्या लक्षात आले. कर्ण्यांचा आवाज ऐकून तिने नाराजी प्रदर्शित करण्याकरता आपली वस्त्रे फाडली आणि ती “फितुरी! फितुरी!” म्हणून ओरडू लागली.

15हुजऱ्यांवरील अधिकाऱ्यांना याजक यहोयादाने आज्ञा दिली, “अथल्याला मंदिराच्या आवाराबाहेर काढावे. तिच्या अनुयायांचा वध करावा. मात्र परमेश्वराच्या मंदिरात तो करु नये.”

16पहारेकऱ्यांनी मग तिला पकडले आणि घोडे ज्या दारातून आत येत असत त्या दाराने तिला बाहेर काढून तिचा त्यांनी वध केला.

17यहोयादाने नंतर परमेश्वर, राजा आणि लोक यांच्यात करार केला. राजा आणि लोक या दोघांवरही परमेश्वराची सत्ता आहे, असे त्या करारात होते. यहोयादाने या खेरीज राजा आणि लोक यांच्यातही एक करार केला. राजाची लोकांबाबत असलेली कर्तव्ये त्यात होती. तसेच लोकांनी राजाचे आज्ञापालन आणि अनुयायित्व करावे असे ही त्यात म्हटले होते.

18या नंतर लोक बाल या देवतेच्या देवळात गेले. त्यांनी बालच्या मूर्तीची तसेच तेथील वेद्यांची नासधूस, मोडतोड केली. त्यांचे तुकडेतुकडे केले बालचा याजक मत्तान याला वेद्यांसमोरच लोकांनी ठार केले.याजक यहोयाद याने परमेश्वराच्या मंदिरावर पहारेकरी नेमले.

19सर्व लोकांना घेऊन तो परमेश्वराच्या मंदिराकडून राजाच्या निवासस्थानी गेला. राजाचे विशेष सुरक्षा सैनिक आणि अधिकारी राजाबरोबर होते. त्यांच्यापाठोपाठ बाकीचे लोक गेले. राजमहालाच्या प्रवेशद्वारापर्यंत ते गेले. राजा योवाश मग सिंहासनावर बसला.

20लोक आनंदात होते आणि नगरात शांतता नांदत होती. महालाजवळच राणी अथल्या तलवारीने मारली गेली.

21योवाश राजा झाला तेव्हा सात वर्षांचा होता.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  2 Kings 11 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran