Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  1 John 4 >> 

1प्रियांनो, प्रत्येक आत्म्यावर विश्वास ठेवू नका. परंतु ते आत्मे देवापासून आहेत किंवा नाहीत याची परीक्षा करा. कारण जगात पुष्कळ खोटे संदेष्टे निघाले आहेत.

2अशाप्रकारे तुम्ही देवाचा आत्मा ओळखा; “येशू ख्रिस्त देह धारण करून आला.” हे जो प्रत्येक आत्मा कबूल करतो तो देवापासून आहे.

3आणि जो प्रत्येक आत्मा येशूला कबूल करत नाही, तो देवापासून नाही.हाच ख्रिस्तविरोधकाचा आत्मा आहे; तो येणार हे तुम्ही ऐकले आहे. तो जगात आताही आहे.

4माझ्या प्रिय मुलांनो, तुम्ही देवाचे आहात आणि त्यांना तुम्ही जिंकले आहे; कारण जगामध्ये जो आहे त्याच्यापेक्षां जो तुमच्यामध्ये आहे; तो महान देव आहे.

5ते आत्मे जगाचे आहेत म्हणून ते जगाच्या गोष्टी बोलतात व जग त्यांचे ऐकते.

6पण आम्ही देवाचे आहोत. जो देवाला ओळखतो तो आपले ऐकतो. परंतु जो देवाचा नाही तो आपले ऐकत नाही. अशारीतीने सत्य प्रकट करणारा आत्मा कोणता आणि फसवणारा आत्मा कोणता हे आपण ओळखतो.

7प्रियांनो, आपण एकमेकांवर प्रीती करावी, कारण प्रीती देवाकडून आहे, आणि जो कोणी प्रीती करतो तो प्रत्येक जण देवापासून जन्मला आहे आणि देवाला आेळखतो.

8जो प्रीती करीत नाही, तो देवाला ओळखत नाही. कारण देव प्रीती आहे.

9देवाने आपला एकुलता एक पुत्र या जगात पाठविला यासाठी की त्याच्याद्वारे आम्हाला जीवन मिळावे.अशाप्रकारे त्याने त्याची आम्हावरील प्रीती दाखवली आहे.

10आम्ही देवावर प्रीती केली असे नाही तर त्याने आम्हावर प्रीती केली व आपल्या एकुलत्या एका पुत्राला आमच्या पापाकरिता प्रायश्चित्त म्हणून पाठवले; यातच खरी प्रीती आहे.

11प्रियांनो, जर देवाने आमच्यावर अशाप्रकारे प्रीती केली तर आम्ही एकमेकांवर प्रीती केलीच पाहिजे.

12देवाला कोणी कधीही पाहिले नाही. पण जर आपण एकमेकांवर प्रीती केली तर देव आपल्यामध्ये राहतो व त्याची प्रीती आपल्यात पूर्ण होते.

13अशाप्रकारे आम्हाला समजू शकते की तो आमच्यामध्ये राहतो व आम्ही त्याच्यामध्ये राहतो, त्याने त्याच्या आत्म्यातून आपल्याला दिले आहे.

14ही गोष्ट आम्ही पाहिली आहे व आम्ही साक्ष देतो की, जगाचा तारणारा म्हणून पित्याने पुत्राला पाठवले आहे.

15जर कोणी “येशू हा देवाचा पुत्र आहे” हे कबूल करतो तर त्याच्याठायी देव राहतो आणि देव त्यांच्यामध्ये राहतो.

16आणि म्हणून आम्ही ओळखतो आणि त्या प्रीतीवर आम्ही विश्वास ठेवतो की, जी देवाने आमच्यावर केली. देव प्रीती आहे.आणि जो प्रीतीत राहतो तो देवामध्ये राहतो आणि देव त्यामध्ये राहतो.

17ह्यात आपल्यामध्ये प्रीती पूर्ण केलेली आहे यासाठी की, न्याय ठरण्याच्या दिवशी आम्हाला धैर्य असावे, कारण जसा तो आहे तसेच आपणही या जगात आहोत.

18प्रीतीच्या ठायी भिती नसते. इतकेच नव्हे तर पूर्ण प्रीती भीती घालवून देते. भीतीमध्ये शासन आहे आणि भीती बाळगणारा प्रीतीमध्ये पूर्ण झालेला नाही.

19पहिल्याने त्याने आपणावर प्रीती केली, म्हणून आपण प्रीती करतो.

20“मी देवावर प्रीती करतो, ” असे म्हणून जर कोणी आपल्या बंधूचा व्देष करील, तर तो लबाड आहे. कारण डोळ्यांपुढे असलेल्या आपल्या बंधूवर जो प्रीती करीत नाही त्याला न पाहिलेल्या देवावर प्रीती करता येणे शक्य नाही.

21जो देवावर प्रीती करतो त्याने आपल्या बंधूवरही प्रीती करावी, ही त्याची आपल्याला आज्ञा आहे.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  1 John 4 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran