Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  1 Chronicles 29 >> 

1राजा दावीद सर्व इस्राएल समुदायाला म्हणाला, माझा मुलगा शलमोन यालाच देवाने निवडले आहे. तो अजून तरुण व अननुभवी आहे. पण हे काम फार महत्वाचे आहे. हा महाल काही माणसासाठी नव्हे तर परमेश्वर देवासाठी आहे.

2माइया देवाच्या मंदिरासाठी मी सर्वोत्तम पुरवठा दिला आहे. सोन्याच्या वस्तूंसाठी सोने व चांदीच्या वस्तूसाठी चांदी, पितळेच्या वस्तूसाठी पितळ, लोखंडाच्या वस्तूंसाठी लोखंड, लाकडी सामानासाठी लाकूड, जडावाच्या कामासाठी गोमेद, पाषाण, विविधरंगी मौल्यवाने रत्ने आणि संगमरवर दगड हे ही विपुलतेने देऊ केले आहे.

3आता कारण मी माझे चित्त देवाच्या मंदिराकडे लावले आहे. म्हणून पवित्र मंदिरासाठी मी जी ही तयारी केली त्याशिवाय आणखी माझा वैयक्तिक सोन्यारुप्याचा ठेवाही देत आहे.

4एकशे दहा टन ओफीरचे शुध्द सोने, दोनशे साठ टन निर्भेळ रुपे मी दिले. मंदिराच्या भिंती या रुप्याने झाकायच्या आहेत.

5कुशल कारागिरांनी मंदिरातील तऱ्हेतऱ्हेच्या वस्तू कराव्या म्हणून त्यासाठी लागणारे सोनेरुपे मी दिले. आता तुम्हा इस्राएलींपैकी किती जण आज परमेश्वरासाठी काही द्यायला तयार आहात?

6तेव्हा, वडीलधारी मंडळी, इस्राएल घराण्यांचे प्रमुख सरदार, अधिकारी, राजसेवेतील कारभारी यासर्वांनी आपापल्या बहुमोल वस्तू देणगीदाखल दिल्या.

7देवाच्या निवासस्थानासाठी त्यांनी दिलेल्या वस्तू एकशे नव्वद टन सोने, तीनशे पंच्याहत्तर टन रुपे, सहाशे पंच्याहत्तर टन पितळ, आणि तीन हजार सातशे पन्नास टन लोखंड दिले.

8ज्यांच्याकडे मौल्यवान रत्ने होती त्यांनी ती परमेश्वराच्या मंदिरासाठी दिली. गेर्षोन घराण्यातील यहीएल याच्या हाती ती दिली.

9या सर्व लोकांनी अगदी मनापासून स्वखुशीने अर्पण दिले. त्यामुळे सर्वानी आनंद केला. राजा दावीदही महा आनंदित झाला.

10त्या समुदायापुढे दावीदाने परमेश्वराचे स्तुतिगीत म्हटले, हे परमेश्वरा, इस्राएलाच्या देवा, आमच्या पित्या, सदासर्वकाळ तू धन्य आहेस.

11महिमा, पराक्रम, शोभा, विजय आणि सन्मान ही सर्व तुझीच आहेत कारण आकाशात व पृथ्वीवर जे जे काही आहे ते तुझेच आहे. हे परमेश्वरा, हे राज्य तुझेच आहे. या सगळ्याहून उच्च पदास पोहचलेला तूच आहेस.

12संपत्ती आणि सन्मानही तुझ्याकडून आहेत. तूच सर्वांवर अधिकार करतोस. सत्ता आणि सामर्थ्य तुझ्या हातांत आहे. कोणालाही थोर आणि बलवान करणे तुझ्याच हातात आहे.

13देवा, आम्ही तुझे आभार मानतो आणि तुझ्या प्रतापी नावाची स्तुती करतो.

14या सगळ्या गोष्टी देणारा मी कोण? किंवा हे लोक तरी कोण? तुझ्यामुळेच त्या आमच्याकडे आल्या. तुझ्याकडून मिळालेलेच आम्ही तुला परत करत आहोत.

15आमच्या पूर्वजांप्रमाणेच आम्ही सुध्दा परदेशी व प्रवासी आहोत. आमचे पृथ्वीवरचे दिवस सावलीसारखे आहेत आणि पृथ्वीवर टिकून राहण्याची काही आशा नाही.

16हे परमेश्वरा, आमच्या देवा, तुझ्या पवित्र नावाच्या सन्मानासाठी तुझे मंदिर बांधायला या सगळ्या गोष्टी आम्ही जमा केल्या. ही सामग्री तुझ्यामुळेच प्राप्त झालेली आहे. जे आहे ते सगळे तुझेच आहे.

17हे देवा, लोकांची अंतःकरणे तू पारखतोस आणि सरळपण तुला आवडते हे मी जाणतो. मी शुध्द आणि प्रामणिक मनाने हे सगळे तुला आनंदाने अर्पण करत आहे. हे सगळे तुझे लोक इथे हजर आहेत आणि या सर्व वस्तू स्वखुशीने अर्पण केल्या आहेत हे मी आनंदाने पाहिले आहे.

18हे परमेश्वर अब्राहाम, इसहाक आणि इस्राएल या आमच्या पूर्वजांचा तूच देव आहेस. तू आपल्या लोकांच्या अंतःकरणाच्या ठायी हे विचार व ह्या कल्पना निरंतर राहतील व त्यांची मने तुझ्याकडे लागतील असे कर.

19माझा मुलगा शलमोन याने तुझ्या आज्ञा, नियम आणि विधी यांचे अंतःकरणपूर्वक पालन करावे, आणि या सर्व गोष्टी कराव्या आणि ज्या मंदिराची मी तयारी केली आहे ते बांधावे.

20तेथे जमलेल्या सर्व लोकांना दावीद म्हणाला, “आता आपल्या परमेश्वर देवाला धन्यवाद द्या.” तेव्हा आपल्या पूर्वजांनी ज्याची उपासना केली त्या परमेश्वराला लोकांनी धन्यवाद दिले. राजाच्या आणि परमेश्वराच्या सन्मानार्थ ते नतमस्तक झाले.

21दुसऱ्या दिवशी लोकांनी परमेश्वराला यज्ञ अर्पण केले. त्यांनी होमार्पणे वाहिली. एक हजार गोऱ्हे, एक हजार एडके, एक हजार कोकरे आणि त्याबरोबर पेयार्पणे त्यांनी अर्पण केली. शिवाय सर्व इस्राएलासाठी त्यांनी आणखीही पुष्कळच यज्ञ केले.

22मग परमेश्वरासमोर सर्व लोकांनी मोठ्या आनंदाने खाणेपिणे केले. दावीदाचा मुलगा शलमोन याला त्यांनी दुसऱ्यांदा राज्याभिषेक केला. राजपदासाठी शलमोनाला आणि याजक म्हणून सादोकला अभिषेक केला गेला. हे सर्व परमेश्वरासमोर झाले.

23त्यानंतर परमेश्वराच्या राजासनावर शलमोन स्थानापन्न झाला. शलमोनाने आपल्या वडीलांची जागा घेतली. राजा म्हणून तो यशस्वी ठरला. इस्राएलचे सर्व लोक शलमोनाचे आज्ञापालन करत.

24एकूणएक सरदार, सैनिक आणि राजा दावीदाची मुले यांना तो राजा म्हणून मान्य होता आणि ते सगळे त्याच्या आज्ञेत होते.

25परमेश्वरने शलमोनाला सर्व इस्त्राएलाच्या देखत फार थोर केले. आणि पूर्वी इस्त्राएलाच्या कोणत्याही राजाला नव्हता असा राजाचा मान त्याला दिला.

26इशायाचा मुलगा दावीद याने संपूर्ण इस्राएलावर चाळीस वर्षे राज्य केले.

27दावीद हेब्रोन नगरात सात वर्षे राजा होता. मग यरुशलेममध्ये त्याची कारकीर्द तेहत्तीस वर्षांची होती.

28पुढे वृध्द झाल्यावर दावीदाला मृत्यू आला. त्याला सफल आणि दीर्घ आयुष्य लाभले. वैभव आणि सन्मान यांची त्याला कमतरता नव्हती. त्याच्यानंतर त्याच्या मुलगा शलमोन राजा झाला.

29राजा दावीदाचा इतिहास पहिल्यापासून शेवटपर्यत संदेष्टा शमुवेल याच्या ग्रंथात आणि संदेष्टा नाथानाच्या ग्रंथात तसेच गाद या संदेष्ट्याचा ग्रंथात लिहिलेला आहे.

30त्याचे पराक्रम आणि त्याची कारकीर्द, इस्राएल आणि सर्व देश यांच्यावर या काळात आलेले प्रसंग याची हकीकत या ग्रंथांमध्ये आहे.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  1 Chronicles 29 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran