Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  1 Chronicles 17 >> 

1आणि असे झाले की, राजा आपल्या घरी रहात होता, तो नाथान संदेष्ट्यास म्हणाला, “पहा, मी गंधसरुच्या घरात राहत आहे, पण परमेश्वराचा कराराचा कोश मात्र अजूनही एका तंबूतच रहात आहे ”

2तेव्हा नाथान दावीदास म्हणाला, “जा, तुझ्या मनात जे आहे ते कर, कारण देव तुझ्याबरोबर आहे.”

3पण त्याच रात्री देवाचे वचन नाथानाकडे आले व म्हणाले

4जा आणि माझा सेवक दावीद याला सांग, परमेश्वर असे म्हणतो, मला राहण्यासाठी तू घर बांधायचे नाही.

5कारण मी इस्राएलास वर आणले त्यादिवसापासून आजपर्यत मी घरात राहिलेलो नाही. त्याऐवजी, मी विविध ठिकाणी, तंबूतून व मंडपातूनच रहात आलो आहे.

6सर्व इस्राएलाबरोबर ज्या ज्या ठिकाणांमध्ये मी फिरत आलो तेथे तेथे ज्यांना माझ्या लोकांचे पालन करण्यासाठी मी नेमले त्या इस्त्राएलाच्या पुढाऱ्यांतील कोणा एकालाही माझ्यासाठी तुम्ही गंधसरूचे घर का बांधले नाही, असा एक शब्द तरी मी कधी बोललो काय?

7तर आता, माझा सेवक दावीद याला सांग की, "सर्वशक्तिमान परमेश्वराचे असे म्हणणे आहे की, तू माझ्या इस्राएल लोकांचा अधिपती व्हावे म्हणून मी तुला कुरणातून, मेंढरांच्या मागून काढून घेतले.

8आणि जेथे कोठे तू गेलास त्याठिकाणी मी तुझ्याबरोबर होतो आणि तुझ्या सर्व शत्रूंना तुझ्यापुढून कापून टाकले. आणि पृथ्वीवर जे कोणी महान लोक आहेत त्यांच्या नावासारखे मी तुझे नाव करीन.

9माझ्या इस्राएल लोकांना मी एक जागा नेमून देईल आणि त्यांना त्या ठिकाणी स्थीर करीन, म्हणजे ते आपल्या स्वतःच्या जागी राहतील व त्यांना कसलाही त्रास होणार नाही. पूर्वीसारखे दुष्ट लोक त्यांच्यावर जुलूम करणार नाही.

10मी माझ्या इस्राएल लोकांवर न्यायाधीश नेमले होते त्या दिवसापासून ते जसे त्यांना त्रास देणार नाही. आणि मी तुझ्या सर्व शत्रूंचा मोड करीन, मी तुला आणखी सांगतो की, परमेश्वर तुझे घर बांधील.

11आणि असे होईल की जेव्हा तुझे दिवस परिपूर्ण होऊन तू आपल्या पूर्वजाकडे गेल्यावर, मी तुझ्यानंतर तुझ्या वंशातून जो तुझा मुलगा, त्याला मी उभे करीन, मी त्याचे राज्य स्थापीन.

12तो माझ्यासाठी घर बांधील आणि मी त्याचे सिंहासन सर्वकाळ स्थापित करीन.

13मी त्याचा पिता होईन आणि तो माझा पुत्र होईल. मी माझा विश्वासाचा करार त्याच्यापासून काढून घेणार नाही, जसा मी शौलाकडून काढून घेतला, जो तुझ्यापूर्वी राज्य करत होता.

14मी त्याला माझ्या घरात आणि राज्यात सर्वकाळ ठेवीन, त्याचे राजासन सर्वकाळ स्थापीन.

15नाथान दावीदाशी बोलला आणि त्याने त्याला सर्व वचने व संपूर्ण दर्शनाबद्दल सविस्तर सांगितले.

16नंतर दावीद राजा आत गेला व परमेश्वरासमोर जाऊन बसला; तो म्हणाला, हे परमेश्वर देवा, मी कोण आहे, आणि माझे घराणे काय की तू मला येथपर्यत आणले आहे?

17आणि हे देवा, तुझ्यादृष्टीने ही केवळ लहान गोष्ट होती, पण तू तुझ्या सेवकाच्या घराविषयी भविष्यात येणाऱ्या बऱ्याच दिवसाबद्दल बोलला आहेस. व हे परमेश्वर देवा, मला तू भविष्यातील पिढ्या दाखवल्या आहेत.

18तुझ्या सेवकाचा तू सन्मान केला आहेस. आणखी मी, दावीद, तुला काय बोलू? तुझ्या सेवकाला तू विशेष ओळख दिली आहेस.

19हे परमेश्वरा, तुझ्या सेवकासाठी व तुझा स्वतःचा हेतु पूर्ण व्हावा, म्हणून तू ह्या सर्व महान गोष्टी प्रगट करण्यासाठी अदभुत कृत्ये केलीस.

20हे परमेश्वरा, जे आम्ही आजवर नेहमी ऐकले आहे. तुझ्यासारखा कोणी नाही आणि तुझ्याशिवाय कोणीच देव नाही.

21आणि तुझ्या इस्राएल लोकांसारखे दुसरे कोठले राष्ट्र पृथ्वीवर आहे ज्यांना तू, आपलेच लोक व्हावेत, म्हणून देव स्वतः त्यांना मिसरातून सोडवण्यास गेला; ह्या तुझ्या लोकांना तू मिसरातून सोडवले तिच्या देखत महान व भयानक कृत्ये करून तू आपले नाव केले. ज्यांना तू मिसरातून सोडवले होते, त्या तुझ्या लोकांपुढून इतर राष्ट्रास घालवून दिले.

22तू इस्राएलांना आपले स्वतःचे लोक सर्वकाळासाठी करून ठेवले आणि परमेश्वरा तू त्यांचा देव झालास.

23म्हणून आता, हे परमेश्वरा, तुझ्या सेवकाला आणि त्याच्या घराण्याला तू हे वचन दिले आहेस, ते सर्वकाल स्थिर कर. तू बोलला आहेस तसे कर.

24तुझे नाव सर्वकाळ स्थापित व्हावे व थोर केले जावे, असे म्हणून, सैन्याचा परमेश्वर इस्राएलाचा देव आहे. दावीद, तुझा सेवक याचे घराणे तुझ्यासमोर स्थापित व्हावे.

25कारण, माझ्या देवा, तू आपल्या सेवकास हे प्रगट केले की, तू त्याच्यासाठी घर बांधशील. याकरता तुझ्या सेवकाला, तुझ्याकडे प्रार्थना करण्याचे धैर्य मिळाले आहे.

26आता हे परमेश्वरा, तूच देव आहेस आणि तुझ्या सेवकाला हे चांगले अभिवचन दिले आहे.

27तर आता, संतुष्ट होऊन तुझ्या सेवकाच्या घराण्याला तुझ्यापुढे सर्वकाळ राहण्याचा आशीर्वाद दिला आहे. हे परमेश्वरा, तू, आशीर्वाद दिलास आणि ते सर्वकाळ आशीर्वादित आहे.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  1 Chronicles 17 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran