Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  1 Chronicles 15 >> 

1दावीदाने दावीद नगरात स्वत:साठी घरे बांधली. तसेच त्याने कोश ठेवण्यासाठी एक स्थान तयार केले व त्यासाठी तंबू केला.

2मग दावीद म्हणाला, “फक्त लेवींनाच देवाचा कोश वाहून आणण्याची परवानगी आहे. या कामासाठी आणि सर्वकाल परमेश्वराची सेवा करण्यासाठीच त्यांची निवड झाली आहे.”

3मग दावीदाने परमेश्वराच्या कोशासाठी जे ठिकाण तयार केले होते तो वर आणायला सर्व इस्राएल लोकांना यरुशलेमेत एकत्र जमा केले.

4दावीदाने अहरोनाचे वंशज आणि लेवी यांनाही एकत्र जमवले.

5कहाथाच्या घराण्यातील उरीयेल त्यांचा प्रमुख होता व त्याचे नातेवाइक असे एकशे वीस माणसे होती.

6मरारीच्या कुळातला असाया हा त्यांचा नेता होता व त्याचे नातेवाइक दोनशे वीस माणसे होती.

7गर्षोमच्या घराण्यातला योएल हा त्यांचा प्रमुख होता व त्याचे नातेवाइक असे एकशे तीस माणसे होती.

8अलीसाफानच्या घराण्यापैकी त्यांचा नेता शमाया होता व त्याचे नातेवाइक दोनशे माणसे होते.

9हेब्रोनच्या वंशातला अलीएल त्यांच्या नेता होता व त्याचे नातेवाइक ऐंशी माणसे होते.

10उज्जियेलच्या घराण्यातला अमीनादाब हा प्रमुख होता व त्याचे नातेवाइक एकशे बारा माणसे होती.

11दावीदाने मग सादोक आणि अब्याथार याजकांना बोलावले. आणि तसेच उरीयेल, असाया, योएल, शमाया, अलीएल आणि अम्मीनादाब या लेवींनाही बोलावून घेतले.

12दावीद त्यांना म्हणाला, “तुम्ही लेवी घराण्यांचे प्रमुख आहात. तुम्ही आपल्या भावांसहित आपणास पवित्र करा. यासाठी की, इस्त्राएलांचा देव परमेश्वर याच्या कोशासाठी मी तयार केलेल्या जागेत तुम्ही तो आणावा.

13पहिल्या वेळी तुम्ही तो उचलून आणला नव्हता. त्याच्या विधीचे पालन केले नाही किंवा त्याचा धावा केला नाही, म्हणून आपला देव परमेश्वर याने आपल्याला तडाका दिला.”

14यावरून याजक व लेवी यांनी इस्त्राएलाचा देव परमेश्वर याचा कोश आणण्यासाठी आपणांस पवित्र केले.

15मोशेने परमेश्वराच्या वचनाप्रमाणे आज्ञा केली होती त्याप्रमाणे लेव्यांनी देवाच्या कोशास लावलेल्या त्याच्या काठ्या आपल्या खांद्यावर घेऊन वाहिला.

16दावीदाने लेवींच्या प्रमुखांना सांगितले की, सतार, वीणा, ही तंतूवाद्ये, झांजा, ही संगीत वाद्ये मोठ्याने वाजवून आनंदाने उंच स्वराने गायन करणारे असे तुमच्या भावांतले गायकांची नेमणूक करा.

17लेवींनी मग हेमान आणि त्याचे भाऊ आसाफ आणि एथान यांना नेमले. हेमान हा योएलचा मुलगा. आसाफ बरेख्याचा मुलगा. एथान कुसायाचा मुलगा. हे सर्वजण मरारीच्या घराण्यातले होते.

18याखेरीज लेवींचा आणखी एक गट होता. जखऱ्या, बेन, यजीएल, शमीरामोथ, यहीएल, उन्न, अलीयाब, बनाया, मासेमा, मत्तिथ्या, अलीफलेह, मिकनेया, ओबेद-अदोम आणि ईयेल हे ते होत. हे द्वारपाल होते.

19हेमान, आसाफ आणि एथान हे गाणारे, यांना पितळेच्या झांजा मोठ्याने वाजवायला नेमले होते.

20जखऱ्या, अजीएल, शमीरामोथ, यहीएल, उन्नी, अलीयाब, मासेया, बनाया हे अलामोथ या सुरावर तंतूवाद्ये वाजवायला नेमले होते.

21मत्तिथ्या, अलीफलेह, मिकनेया, ओबेद-अदोम, ईयेल आणि अजज्या हे शमीनीथ सुरावर वीणा वाजवण्याच्या कामावर होते.

22लेवींचा प्रमुख कनन्या हा मुख्य गायक होता. गायनात निपुण असल्यामुळे त्याच्यावर ही कामगिरी होती.

23बरेख्या आणि एलकाना हे कोशाचे रक्षक होते.

24शबन्या, योशाफाट, नथानेल, अमासय, जखऱ्या, बनाया आणि अलियेजर हे याजक देवाच्या कोशापुढे चालताना कर्णे वाजवत होते. ओबेद-अदोम आणि यहीया हे कोशाचे आणखी दोन रक्षक होते.

25अशाप्रकारे दावीद, इस्राएलमधील वडील, हजारांवरचे सरदार हे परमेश्वराच्या कराराचा कोश ओबेद-अदोमच्या घरातून उत्साहाने आणवयाला तिकडे गेले.

26परमेश्वराचा करार कोश उचलून आणणाऱ्या लेव्यांना देवाने साहाय्य केले. त्यांनी सात गोऱ्हे आणि सात मेंढे यांचे यज्ञार्पण केले.

27करारकोश वाहून नेणाऱ्या सर्व लेव्यांनी तलम वस्त्राचे अंगरखे घातले होते. गायक प्रमुख कनन्या आणि इतर सर्व गायक यांनी तलम झगे घातले होते. दावीदाने तागाचे एफोद घातले होते.

28अखेर सर्व इस्राएल लोकांनी परमेश्वराचा कराराचा कोश आणला. जयघोष करत रणशिंगाच्या नादांत, कर्णे, झांजा, सतारी, वीणा अशी तंतूवाद्ये वाजवत त्यांनी तो आणला.

29पण परमेश्वराच्या कराराचा कोश दावीद नगरात पोहचला तेव्हा शौलची मुलगी मीखल हिने खिडकीतून बाहेर पाहिले. तिने दावीद राजाला नाचताना, जल्लोष करताना पाहून तिने आपल्या अंतःकरणात त्याला तुच्छ लेखले.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  1 Chronicles 15 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran