Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Leviticus 8 >> 

1परमेश्वर मोशेला म्हणाला,

2अहरोन व त्याच्याबरोबर त्याचे मुलगे ह्यांना आणि त्यांची वस्त्रे अभिषेकाचे तेल, पापार्पणाचा गोऱ्हा दोन मेंढे आणि बेखमीर भाकरीची टोपली घेऊन,

3दर्शनमंडपाच्या दाराजवळ सर्व मंडळीला एकत्र जमवून आण.

4परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे मोशेने केले. मंडळी दर्शनमंडपाच्या प्रवेशद्वाराशी जमली.

5मग मोशे मंडळीला म्हणाला, “परमेश्वराने जे करायचे आज्ञापिले, ते हे.”

6मग मोशेने अहरोन व त्याच्या मुलांना आणवून पाण्याने आंघोळ घातली.

7मग त्याने अहरोनाला विणलेला सदरा घातला, त्याच्या कमरेला कमरबंद बांधला; मग त्याला झगा घातला, नंतर त्याच्यावर एफोद चढवला आणि त्यावर कुशलतेने विणलेली पट्टी आवळून बांधली.

8मग मोशेने त्याच्यावर ऊरपट बांधला आणि त्याच्यात उरीम व थुम्मीम ठेवले;

9नंतर त्याच्या डोक्यावर फेटा ठेवला; आणि फेट्याच्या पुढल्या भागावर सोन्याची पट्टी म्हणजे पवित्र मुकुट ठेवला; परमेश्वराने जसे करण्यास सांगितले होते, तसेच मोशेने केले.

10मग मोशेने अभिषेकाचे तेल घेतले आणि पवित्र निवासमंडपावर व त्यातील सर्व वस्तूंना आभिषेक करुन त्यांना पवित्र केले.

11अभिषेकाच्या तेलातून थोडे घेऊन त्याने ते वेदीवर सात वेळा शिंपडले आणि वेदी, तिची सर्व उपकरणे, गंगाळ व त्याची बैठक यांच्यावरही त्याने अभिषेकाचे तेल शिंपडले व पवित्र केले.

12मग मोशेने थोडे अभिषेकाचे तेल अहरोनाच्या डोक्यावर ओतले व अशा प्रकारे त्याने अभिषेक करून त्याला पवित्र केले.

13मग मोशेने अहरोनाच्या मुलांना आणले, त्यांना विणलेले सदरे घातले, कमरेस कमरबंद घातले व त्यांच्या डोक्यांना फेटे बांधले; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने हे केले.

14मग मोशेने पापार्पणाचा गोऱ्हा आणला आणि अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी त्या गोऱ्ह्याच्या डोक्यावर आपले हात ठेवले.

15मग मोशेने तो वधला व त्याचे रक्त घेऊन आपल्या बोटाने वेदीच्या सर्व शिंगांना ते लावले, अशाप्रकारे त्याने वेदी शुद्ध केली आणि ते रक्त वेदीच्या पायथ्यावर ओतले, देवासाठी त्याने ती वेगळी केली. ह्या प्रकारे ती पवित्र करण्यासाठी त्याने प्रायश्चित केले.

16गोऱ्हाच्या आंतड्यावरील सर्व चरबी, काळजावरील चरबीचा पडदा आणि चरबीसहित दोन्ही गुरदे घेऊन मोशेने वेदीवर त्यांचा होम केला.

17परंतु गोऱ्हा, त्याचे कातडे, त्याचे मांस व त्याचे शेण ही सर्व छावणीबाहेर नेऊन अग्नीत जाळून टाकली, परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे मोशेने हे केले.

18मग त्याने होमापर्णाचा मेंढा आणला. अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी त्याच्या डोक्यावर आपले हात ठेवले.

19मग मोशेने तो वधला व त्याचे रक्त त्याने वेदीवर व सभोवती शिंपडले.

20मग मोशेने त्या मेंढ्याचे कापून तुकडे केले, मग त्याचे डोके, तुकडे व चरबी हे सर्व घेऊन त्याने वेदीवर होम केला.

21त्याची आतडी पाय पाण्याने धुवून मोशेने वेदीवर संपूर्ण मेंढ्याचे होमार्पण केले. ते परमेश्वरासाठी सुवासीक हव्य झाले, परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने हे केले.

22मग मोशेने दुसरा मेंढा आणला; तो अहरोन व त्याची मुले यांची याजक म्हणून नेमणूक झाली हे दाखवण्याकरिता होता. अहरोन व त्याच्या मुलांनी आपले हात त्या मेंढ्याच्या डोक्यावर ठेवले.

23मोशेने त्याचा वध केला व त्याचे थोडे रक्त घेऊन अहरोनाच्या उजव्या कानाच्या पाळीला: उजव्या हाताच्या अंगठ्याला व उजव्या पायाच्या अंगठ्याला लावले.

24मग मोशेने अहरोनाच्या मुलांना आणून त्याच्या उजव्या कानाच्या पाळीला, उजव्या हाताच्या अंगठ्याला व उजव्या पायाच्या अंगठ्याला, काही रक्त लावले व मग ते रक्त त्याने वेदीवर व सभोवती शिंपडले.

25मोशेने चरबी, चरबीदार शेपूट, आंतड्यावरील सर्व चरबी काळजावरील चरबीचा पडदा, दोन्ही गुरदे, त्यांच्यावरील चरबी व उजवी मांडी घेतली;

26दररोज एक बेखमीर भाकरीची टोपली देवासमोर ठेवली जात असे मोशेने त्यातून एक बेखमीर पोळी, तेल लावलेली एक भाकर व एक पापडी घेऊन त्या, चरबीवर व मागच्या बाजूच्या उजव्या मांडीवर ठेवल्या.

27हे सर्व त्याने अहरोन व त्याच्या मुलांच्या हातावर ठेवले आणि परमेश्वरासमोर ओवाळणीचे अर्पण म्हणून ते ओवाळले.

28मग मोशेने ते त्यांच्या हातातून घेऊन वेदीवरील होमार्पणासहित त्यांचा होम केला; अहरोन व त्याचे मुलगे ह्यांचे याजक म्हणून समर्पण करण्यासाठी हे अर्पण केले. हे होमार्पण होते हे सुवासीक हव्य होय. हे अग्नीद्ववारे परमेश्वराला केलेले अर्पण होते.

29मोशेने मेंढ्याच्या उराचा भाग घेऊन ओवाळणीचे अर्पण म्हणून तो परमेश्वरासमोर ओवाळला; याजकाच्या समर्पणासाठी असलेल्या मेंढ्याचा हा भाग मोशेच्या वाट्याचा होता; परमेश्वराने दिलेल्या आज्ञेप्रमाणे मोशेने हे केले.

30मग मोशेने अभिषेकाचे काही तेल व वेदीवरील काही रक्त घेऊन अहरोन व त्याची वस्त्रे, व त्याच्यासहित त्याचे मुलगे व त्यांची वस्त्रे ह्यांच्यावर शिंपडले आणि अहरोन व त्याची वस्त्रे व त्याच्याबरोबर त्याचे मुलगे व त्यांची वस्त्रे पवित्र केली.

31मोशे अहरोन व त्याचे मुलगे ह्याना म्हणाला, “मी सांगितल्याप्रमाणे, ‘अहरोन व त्याच्या मुलांनी हे मांस खावे;’ तेव्हा ही भाकरीची टोपली व याजकाच्या समर्पणासाठीचे हे मांस घ्या; दर्शनमंडपाच्या दारापाशी ते शिजवा आणि मी सांगितल्याप्रमाणे मांस व भाकर तेथेच खा.

32मांस व भाकर ह्यातून काही उरले तर ते अग्नीत जाळून टाका;

33तुमच्या समर्पणाचा विधी सात दिवस चालेल; ते सात दिवस पूर्ण होईपर्यंत तुम्ही दर्शनमंडपाच्या बाहेर जाऊ नये.

34परमेश्वराने आज्ञा केली आहे की आज केल्याप्रमाणे तुमच्यासाठी प्रायश्चित करावे.

35तेव्हा दर्शनमंडपाच्या दारापाशी तुम्ही सात दिवस व रात्री राहा, ही परमेश्वराची आज्ञा तुम्ही पाळली नाहीतर तुम्ही मराल; कारण मला तशी आज्ञा दिली आहे.”

36तेव्हा मोशेच्याद्वारे परमेश्वराने ज्या गोष्टींविषयी आज्ञा दिली होती त्या सर्व अहरोन व त्याच्या मुलांनी केल्या.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Leviticus 8 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran