Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  2 Chronicles 5 >> 

1मग शलमोनाने काढलेले परमेश्वराच्या मंदिराचे सर्व काम समाप्त झाले. आपले वडील दावीद यांनी मंदिरासाठी दिलेल्या सर्व वस्तू त्याने आत आणल्या सोन्या रुप्याच्या सर्व वस्तू आणि इतर सामानसुमान त्याने आणले. मंदिराच्या कोषागारात त्याने या सर्व वस्तू ठेवल्या.

2पुढे शलमोनाने परमेश्वराचा कराराचा कोश दावीदनगराहून म्हणजेच सीयोनमधून आणण्यासाठी इस्राएल मधील सर्व वडीलधारी मंडळी, आपापल्या घराण्यांचे प्रमुख, यांना यरूशलेम येथे बोलावून घेतले.

3सातव्या महिन्यातील मंडपाच्या सणाच्या दिवशी सर्व इस्राएल लोक शलमोनाकडे आले.

4सर्व इस्राएलाचे वडीलधारे जमल्यावर लेवींनी कराराचा कोश उचलून घेतला.

5याजक आणि लेवी यांनी मिळून तो यरुशलेमला आणला. दर्शन मंडप आणि तेथे असलेली सर्व पवित्र पात्रे त्यांनी बरोबर आणली.

6राजा शलमोन आणि इस्राएलाचे लोक कराराच्या कोशाला सामोरे गेले कोशासमोर त्यांनी मेंढरांचे आणि गुराढोरांचे बळी अर्पण केले. मोजदाद करता येऊ नये इतके प्राणी त्यांनी बळी दिले.

7एवढे झाल्यावर, मंदिराच्या आतल्या मुद्दाम तयार करवून घेतलेल्या सर्वात पवित्र गाभाऱ्यात याजकांनी तो परमेश्वराचा करारकोश आणला. करुबांच्या पखांच्या बरोबर खाली तो त्यांनी ठेवला.

8कोशावरती करुबांच्या पखांनी आपले छत्र धरले होते. कोश आणि त्याचे दांडे त्यांनी झाकले.

9हे दांडे सर्वांत पवित्र गाभाऱ्यासमोरुन दिसतील इतके लांब होते पण मंदिराच्या बाहेरुन ते दिसत नसत. आजपर्यंत ते तेथे आहेत.

10दोन दगडी पाट्यांखेरीज या करार कोशात काहीही नव्हते. होरेब पर्वतावर मोशेने त्या दोन पाट्या या कराराच्या कोशात ठेवल्या होत्या. इस्राएल लोक मिसरमधून बाहेर पडल्यावर परमेश्वराने त्यांच्याशी जो करार केला तो या होरेब पर्वतावरच.

11एवढे झाल्यावर याजक गाभाऱ्यातून बाहेर आले. ते सर्व पवित्र झाले होते. ते सर्व नेमके कोणकोणत्या गटातले होते हे यावेळी महत्वाचे नव्हते. आतून बाहेर आल्यावर ते पुन्हा पवित्र झाले.

12मग सर्व लेवी गायक वेदीच्या पूर्वेला उभे राहिले आसाफ, हेमान आणि यदुथूनचे सर्व गायक वर्ग हजर होते. त्यांची मुले आणि भाऊबंददेखील आले होते. यासर्वांनी शुभ्र तलम वस्त्रे घातली होती झांजा, सारंग्या आणि वीणा ही वाद्ये त्यांनी हातात घेतली होती. या लेवी गायकांबरोबर ऐकशे वीस याजक होते आणि ते कर्णे वाजवत होते.

13गायन आणि वादन एका सुरात चालले होते. एका सुरात त्यांनी परमेश्वराचे स्तवन केले आणि त्याला धन्यवाद दिले. कर्णे, झांजा इत्यादी वाद्यांचा एक जल्लोष उडाला. त्यांच्या गाण्याचा आशय असा होता: परमेश्वराची स्तुती कारण तो चांगला आहे. त्याची खरी प्रीति सर्वकाळ राहाते. तेव्हा परमेश्वराचे सर्व मंदिर मेघाने भरुन गेले.

14त्या मेघामुळे याजकांना तेथे सेवेला उभे राहता येईना, कारण परमेश्वराच्या तेजाने देवमंदिर भरुन गेले होते.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  2 Chronicles 5 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran