Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  2 Chronicles 34 >> 

1योशीया, राजा झाला तेव्हा आठ वर्षांचा होता. त्याने यरूशलेममध्ये एकतीस वर्षे राज्य केले.

2त्याने वर्तन योग्य प्रकारचे होते परमेश्वराची त्याच्या कडून जशी अपेक्षा होती तसेच तो वागला आपला पूर्वज दावीद याच्याप्रमाणे त्याने सत्कृत्ये केली. सन्मार्गावरुन तो ढळला नाही.

3आपल्या कारकीर्दीच्या आठव्या वर्षीच तो आपला पूर्वज दावीद याच्या परमेश्वराच्या भजनी लागला. योशीयाने लहान वयातच हा मार्ग पत्करला आणि कारकीर्दीच्या बाराव्या वर्षी यहूदा आणि यरुशलेममधील उंच स्थाने, अशेरा देवीचे खांब, कोरीव आणि ओतीव मूर्ती यांची मोडतोड केली.

4लोकांनी त्याच्या समोरच बआलदेवतांच्या मूर्ती फोडून टाकल्या. वरच्या भागात असलेल्या धूप जाळण्याच्या वेद्या योशीयाने उद्ध्वस्त केल्या. ओतीव आणि कोरीव मूर्तीचाही त्याने पार चुरा करून टाकला आणि हे चूर्ण, ज्या लोकांनी बआल देवतांसाठी यज्ञ केले त्यांच्या कबरीवर पसरले.

5बआल देवतांची पूजा करणाऱ्या याजकांच्या अस्थी देखील त्याने त्यांच्याच वेद्यांवर जाळून टाकल्या. अशाप्रकारे यहूदा आणि यरूशलेममधून योशीयाने मूर्तिपूजेचा पुरा बीमोड केला.

6मनश्शे, एफ्राइम, शिमोन, नफताली येथपर्यंतच्या शहरांतून आणि त्यांच्या आसपासच्या पडीक जागेत त्याने हेच केले.

7त्याने वेद्या मोडून टाकल्या, अशेरा खांबांची मोडतोड करून चुर्ण केले धूपाच्या वेद्या उखडणे ही इस्राएलभरची मोहीम उरकल्यावर योशीया यरुशलेमला परतला.

8योशीयाने राज्याची सूत्रे हाती घेतल्याच्या अठराव्या वर्षी शाफान, मासेया, आणि योवाह यांना परमेश्वर देवाचे मंदिर दुरुस्तीसाठी पाठवले. शाफानच्या वडलांचे नाव असल्या, मासेया हा नगराचा कारभारी होता आणि योवाहचे वडील योवाहाज. योवाह हा बखरकार होता. यहूदा आणि मंदिर यांच्या शुध्दीकरणासाठी मंदिराच्या डागडुजीचे हे काम योशीयाने अंगावर घेतले.

9ही माणसे हिल्कीया या मुख्य याजकाकडे गेली. मनश्शे, एफ्राइम आणि उर्वरित सर्व इस्राएलमधून लोकांनी देवाच्या मंदिरासाठी दिलेला पैसा लेवी द्वारपालांनी जमा केला होता. सर्व यहूदा प्रांत, बन्यामिनचा प्रदेश आणि यरुशलेममधून देखील त्यांनी पैसे जमा केले होते. ही रक्कम हिल्कीयाकडे त्यांनी सुपूर्द केली.

10मग, परमेश्वराच्या मंदिराच्या बांधकामावर देखरेख करणाऱ्यांना लेवींनी हे पैसे दिले आणि देखरेख करणाऱ्यांना परमेश्वराच्या मंदिराची दुरुस्ती करण्यासाठी कामगारांना दिले.

11ताशीव चिरे, लाकूड यांच्या खरेदीसाठी गवंडी, सुतार या लोकांना पैसे देण्यात आले. मंदिराच्या दुरुस्तीसाठी आणि कडीपाटासाठी लाकूड लागले. यहूदाचा राजांनी या पूर्वी मंदिराची योग्य देखभाल न केल्यामुळे मंदिराच्या इमारती जीर्ण झाल्या होत्या.

12कामगारांनी मन लावून काम केले. यहथ व ओबद्या हे मरारी कुळातील लेवी देखरेख करत होते. कहाथी वंशातील जखऱ्या आणि मशुल्लाम हे ही देखरेखीच्या कामावर होते. वाद्ये वाजवण्यात निपुण असलेले लेवीसुध्दा होते.

13ते कारागिरांवर आणि मजुरांवर देखरेख करत होते. चिटणीस, कारभारी आणि द्वारपाल म्हणूनही काही लेवी काम करत होते.

14परमेश्वराच्या मंदिरातील पैसा लेवी बाहेर आणत असताना हिल्कीया या याजकाला मोशेमार्फत आलेला नियमशास्त्राचा ग्रंथ सापडला.

15तेव्हा हिल्कीयाने शाफान या चिटणीसाला असा ग्रंथ सापडल्याचे सांगुन, शाफनला तो दिला.

16शाफानने तो योशीयाकडे आणला. राजाला तो म्हणाला, “तुझे सेवक तुझ्या आज्ञेप्रमाणे वागत आहेत.

17परमेश्वराच्या मंदिरातील पैसा घेऊन त्यातून ते देखरेख करणाऱ्यांना आणि मजुरांना वेतन देत आहेत”

18शाफान पुढे राजाला म्हणाला, “याजक हिल्कीयाने मला हे पुस्तक दिले आहे.” शाफानने मग राजाला पुस्तकातील मजकूर वाचून दाखवला.

19तो नियमशास्त्रग्रंथ ऐकत असता राजा योशीयाने आपले कपडे फाडले.

20आणि हिल्कीया, शाफानचा मुलगा अहीकाम, मीखाचा मुलगा अब्दोन, चिटणीस शाफान आणि आपला सेवक असाया यांना योशीयाने आज्ञा केली की.

21“माझ्या आणि इस्राएल व यहूदा येथे आता शिल्लक असलेल्या लोकांच्या वतीने परमेश्वराला जाऊन विचारा. या पुस्तकातील वचनांविषयी त्याला विचारा. आपल्या पूर्वजांनी परमेश्वराचे म्हणणे न जुमानल्यामुळे परमेश्वराचा आपल्यावर कोप झाला आहे. आपल्या पूर्वजांचे वर्तन या पुस्तकातील वचनांना अनुसरुन नव्हते.”

22हिल्कीया आणि राजाचे सेवक हुल्दा या संदेष्टीकडे गेले. हुल्दा ही शल्लूमची बायको. शल्लूम ताकहतचा आणि ताकहत इस्त्राचा मुलगा. इस्त्रा राजाच्या वस्त्रागाराचा प्रमुख होता. हुल्दा यरुशलेमच्या नवीन भागात राहात होती. हिल्कीया आणि राजाचे सेवकयांनी तिला सर्व हकीगत सांगितली.

23हुल्दा त्यांना म्हणाली, इस्राएलाचा परमेश्वर देव याचे म्हणणे असे आहे: राजा योशीयाला म्हणावे:

24परमेश्वर म्हणतो, “या प्रदेशावर आणि इथे राहणाऱ्या लोकांवर मी अरिष्ट आणणार आहे.” यहूदाच्या राजाला जे पुस्तक वाचून दाखवण्यात आले. त्यातील मजकुरात आहेत ती सर्व संकटे त्यांच्यावर ओढवतील.

25माझ्याकडे पाठ फिरवून इतर देवतांपुढे त्यांनी धूप जाळला म्हणून मी असे करणार आहे. आपल्या दुष्कृत्यांमुळे लोकांनी मला सतंप्त केले आहे. या क्रोधाचा अंगार त्यांच्यावर बरसेल आणि तो शांत होणार नाही.

26पण यहूदाचा राजा योशीया याला सांग. त्यानेच तुला माझ्याकडे पाठवले आहे की तू नुकतेच जे ऐकलेस त्याविषयी इस्राएलाचा परमेश्वर देव म्हणतो:

27योशीया, पश्चात्तापाने तू माझ्यापुढे विनम्र झालास. खेदाने आपले कपडे फाडलेस. तू रडलास. तू मृदू अंत:करणाचा असल्यामुळे

28तुझ्या पूर्वजांकडे मी तुला नेईन. तुला शांत मरण येईल. या प्रदेशावर आणि लोकांवर जी संकटे कोसळतील ती तुला पाहायला लागणार नाहीत. हिल्कीया आणि राजाचे सेवक या सर्वांनी हा निरोप राजाला येऊन सांगितला.

29तेव्हा राजा योशीयाने यहूदा आणि यरुशलेममधील सर्व वडीलधाऱ्यांना भेटीसाठी एकत्र बोलावले.

30राजा परमेश्वराच्या मंदिरात गेला. यहूदातील सर्व प्रजा, यरुशलेममधील सर्व थोर तसेच सामान्य माणसे, याजक आणि लेवी हे सर्व राजासोबत होते. परमेश्वराच्या मंदिरात सापडलेल्या कराराच्या ग्रंथातील सर्व वचने तेथे राजाने त्यांना वाचून दाखवली.

31मग राजा उभा राहिला. त्याने परमेश्वराशी करार केला. परमेश्वराला अनुसरायचे, त्याचे आज्ञा, नियम आणि विधी पाळायचे त्याने कबूल केले. हे सर्व त्याने मन:पूर्वक करायचे मान्य केले. नियमशास्त्रातील वचनांप्रमाणे वागायचे कबूल केले.

32मग त्याने यरुशलेम आणि बन्यामिन मधील लोकांना ही या करारपालनात सामील करून घेतले. यरुशलेमचे लोक आपल्या पूर्वचांच्या देवाचा करार पाळू लागले.

33इस्राएलमध्ये वेगवेगळ्या देशांमधल्या विविध मूर्ती होत्या. पण त्या सर्व अनिष्ट मूर्ती योशीयाने फोडून तोडून टाकल्या. इस्राएल लोकांना त्याने परमेश्वर देवाची सेवा करायला लावले. आणि योशीया जिवंत असेपर्यंत लोक आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याचीच उपासना करत होते.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  2 Chronicles 34 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran