Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  2 Chronicles 23 >> 

1यहोयादाने सातव्या, वर्षांनंतर आपले सामर्थ्य दाखवले. त्याने यरोहामचा मुलगा अजऱ्या यहोहानानचा मुलगा इश्माएल, ओबेदचा मुलगा अजऱ्या, अदायाचा मुलगा मासेया आणि जिक्रीचा मुलगा अलीशाफाट या मुख्य अधिकाऱ्यांशी करार केला.

2त्यांनी यहूदाभर फिरुन यहूदात विखुरलेल्या लेवींना आणि इस्राएलच्या कुलप्रमुखांना एकत्र आणले. मग ते सर्व यरुशलेम येथे गेले.

3तेथे देवाच्या मंदिरात सर्व समुदायाने राजाशी करार केला. यहोयादा या लोकांना म्हणाला, परमेश्वर दावीदाच्या संततीविषयी जे बोलला आहे त्याला अनुसरुन राजाचा मुलगा गादीवर येईल.

4आता तुम्ही करायचे ते असे: तुमच्यापैकी जे एक तृतीयांश याजक आणि लेवी शब्बाथच्या दिवशी कामाला येतात त्यांनी मंदिरावर पहारा करावा.

5एकतृतीयांश लोकांनी राजमहालावर पहारा करावा, आणि उरलेल्या एकतृतीयांश लोकांनी वेशीपाशी असावे. यांच्याखेरीज बाकी सर्व लोकांनी परमेश्वराच्या मंदिराच्या आवारात राहावे.

6कोणालाही परमेश्वराच्या मंदिरात येऊ देऊ नये याजक व सेवा करणारे लेवी त्यांनीच मात्र आत यावे कारण ते याच कामासाठी नेमलेले आहेत. पण इतरांनी परमेश्वराने नेमून दिलेली आपापली कामे करायची आहेत.

7लेवींनी राजाच्या निकट राहायचे. प्रत्येकाजवळ आपली तलवार सज्ज असावी. कोणी मंदिरात घुसायाचा प्रयत्न केल्यास त्याला ठार करावे. सर्वांनी राजाची सावलीसारखी सोबत करावी.

8लेवी आणि यहूदा या सर्व लोकांनी यहोयादा या याजकाने ज्या आज्ञा केल्या त्या सर्वांचे पालन केले. यहोयादाने याजकांपैकी कोणाचीही गय केली नाही. त्यामुळे शब्बाथच्या दिवशी आळीपाळीने आत येणाऱ्या व कामावरुन बाहेर जाणाऱ्या सर्वाची व्यवस्था केली.

9दावीद राजाचे भाले, छोट्या ढाली आणि मोठ्या ढाली ही शस्त्रे देवाच्या मंदिरामध्ये ठेवलेली होती. यहोयादा याजकाने शंभर सैनिकांच्या तुकड्यांच्या प्रमुखांना त्या दिल्या.

10आणि त्यांनी कुठे, कसे उभे राहायचे ते सांगितले. प्रत्येकाजवळ आपापले शस्त्र होते. मंदिराच्या थेट उजव्या कोपऱ्यापासून डाव्या बाजूपर्यंत ही शस्त्रधारी माणसे उभी राहिली. वेदी, मंदिर आणि राजा यांच्याजवळ ती उभी होतीच.

11मग त्यांनी राजपुत्राला बाहेर आणले आणि त्याच्या मस्तकावर मुगुट चढवला. त्याच्या हाती आज्ञापट दिला. योवाशला त्यांनी राजा केले. यहोयादा आणि त्याची मुले यांनी त्याला अभिषेक केला. “राजा चिरायु होवो” असे ते सर्वजण म्हणाले.

12मंदिराकडे लगबगीने जाणाऱ्या लोकांचा गलका आणि राजाचा जयजयकार अथल्याने ऐकला. तेव्हा ती मंदिरात लोकांकडे आली.

13पाहते तो तिला राजा दिसला. प्रवेशद्वाराशी तो राजस्तंभाजवळ उभा होता. कर्णे वाजवणारे कारभारी आणि लोक राजा जवळ उभे होते. देशभरचे लोक कर्णे वाजवून आनंद व्यक्त करत होते. गाणारे वाद्ये वाजवत होते आणि त्यांनी म्हटलेल्या स्तवनगीतापाठोपाठ लोक म्हणत होते. तेव्हा आपली तीव्र नापसंती दाखवण्यासाठी अथल्याने आपले कपडे फाडले आणि फितुरी, फितुरी असे ती ओरडली.

14याजक यहोयादा याने सेनापतींना पुढे आणले. त्यांना तो म्हणाला, तिला सैन्याच्या रागांमधून बाहेर काढा. तिच्या मागे जो जाईल त्याला तलवारीने मारुन टाका. मग याजकाने सैन्याला आज्ञा दिली, परमेश्वराच्या मंदिरात अथल्याचा वध करु नका.

15राजमहालाच्या घोडावेशीजवळ अथल्या पोचताच सैनिकांनी तिला पकडले आणि त्याठिकाणी तिला जिवे मारले.

16यहोयादाने मग सर्व लोक आणि राजा यांच्याबरोबर एक करार केला. आपण सर्व परमेश्वराचे लोक आहोत असा तो करार होता.

17मग सर्वजण बआल देवतेच्या मंदिरात गेले आणि त्या मूर्तीची त्यांनी नासधूस केली. तिथल्या इतर मूर्ती आणि वेदीदेखील मोडून तोडून टाकल्या. बआलच्या वेदीपुढेच त्यांनी बआलचा याजक मत्तान याला ठार केले.

18यहोयादाने मग परमेश्वराच्या मंदिरातील याजकांची नेमणूक केली. हे याजक लेवी होते आणि दावीदाने त्यांना मंदिराचे मुखत्यारपद दिले होते. मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे परमेश्वराला होमबली अर्पण करणे, हे त्यांचे काम होते. दावीदाच्या आज्ञेनुसार आनंदाने गायन करत त्यांनी होमबली अर्पण केले

19कोणीही अशुध्दतेने मंदिराच्या आत येवू नये, म्हणून यहोयादाने परमेश्वराच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराशीच द्वारपाल नेमले

20सर्व सैन्याधिकारी, लोकनायक, सरदार आणि सर्व प्रजा यांना यहोयादाने आपल्याबरोबर घेतले. मग त्याने राजाला परमेश्वराच्या मंदिराबाहेर काढले. तिथून वरच्या वेशीतून ते राजमहालात पोचले. तेथे त्यांनी राजाला सिंहासनावर बसवले.

21अथल्याचा तलवारीने वध झाला त्या नंतर यहूदा लोकांमध्ये आनंदी आनंद पसरला आणि यरुशलेम नगर शांत झाले.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  2 Chronicles 23 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran