Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  2 Chronicles 2 >> 

1परमेश्वराच्या नावासाठी एक मंदिर तसेच स्वत:साठी एक राजमहालही बांधायचे शलमोनाने ठरवले.

2डोंगरातून दगडाचे चिरे काढायला ऐंशी हजार लोक आणि सत्तर हजार मजूर त्याने नेमले. मजुरांच्या कामावर देखरेख करण्यासाठी शलमोनाने तीन हजार सहाशे मुकादम नेमले.

3सोराचा राजा हिराम याला शलमोनाने निरोप पाठवला, माझे वडील दावीद यांना केलीत तशीच मला मदत करा त्यांचे निवासस्थान बांधायला उपयोगी पडावे म्हणून तुम्ही गंधसरुचे लाकूड पाठवले होते.

4मी माझ्या परमेश्वर देवाच्या नावाच्या सन्मानार्थ एक मंदिर बांधणार आहे. तेथे आम्ही रोज परमेश्वरासमोर सुगंधी धूप जाळू तसेच एका खास मेजावर पवित्र भाकर ठेवू. शिवाय, रोज सकाळ संध्याकाळ शब्बाथच्या दिवशी दर नव चंद्रदर्शनी आणि आमचा देव परमेश्वराने नेमून दिलेल्या सहभोजनाच्या दिवशी आम्ही होमार्पणे वाहू इस्राएल लोकांनी सर्वकाळ पाळायचा हा नियमच आहे.

5आमचा परमेश्वर हा सर्व देवतांपेक्षा श्रेष्ठ आहे म्हणून मी त्याच्यासाठी भव्य मंदिर उभारणार आहे.

6परमेश्वरासाठी निवासस्थान बांधणे कोणाला कस शक्य आहे? स्वर्ग किंवा संपूर्ण विश्वही त्याला सामावून घ्यायला अपुरे आहे. तेव्हा त्याच्यासाठी म्हणून मंदिर बांधणे मलाही शक्य नाही. मी आपला त्याच्या प्रीत्यर्थ धूप जाळण्यासाठी फक्त एक ठिकाण बांधू शकतो एवढेच.

7तर, सोने, चांदी, पितळ आणि लोखंड या धातुकामात प्रवीण असा कारागिर तुम्ही माझ्याकडे पाठवून दिलात तर बरे. त्याला जांभळे, किरमिजी आणि निळे वस्त्र करता यावे. कोरीव कामाचेही त्याला चांगले शिक्षण मिळालेले असावे. माझ्या वडलांनी निवडलेल्या इतर कारागिरांबरोबर तो इथे यहूदा आणि यरुशलेममध्ये काम करील.

8लबानोनमधून माझ्यासाठी गंधसरू, देवदार आणि रक्तचंदन यांचे लाकूडही पाठवावे. लबानोनमधले तुझे लाकूडतोड्ये चांगले अनुभवी आहेत हे मला माहीत आहे त्या तुमच्या सेवकाना माझे सेवक मदत करतील.

9मी बांधायला घेतलेले मंदिर चांगले विशाल आणि सुंदर होणार असल्यामुळे मला लाकूड मोठ्या प्रमाणावर लागणार आहे.

10लाकडासाठी वृक्षतोड करणाऱ्या तुमच्या सेवकांना मी पुढीलप्रमाणे मेहनताना देईन: विस हजार कोर बुशेल गहू, विस हजार कोर जव, विस हजार बथ द्राक्षारस आणि विस हजार बथ तेल.

11हिरामने मग शलमोनाला उत्तर पाठवले. त्यात त्याने असा निरोप पाठवला की, शलमोन, परमेश्वराचे आपल्या प्रजेवर प्रेम आहे. म्हणून तर त्याने तुला त्यांचा राजा म्हणून नेमले.

12हिराम पुढे म्हणाला, इस्राएलाचा परमेश्वर देव धन्य असो. स्वर्ग आणि पृथ्वीची निर्मिती त्यानेच केली. राजा दावीदाला त्याने सूज्ञ पुत्र दिला आहे. शलमोन, तू सूज्ञ आणि विचारी आहेस. तू परमेश्वरासाठी मंदिर तसेच स्वतःसाठी राजवाडा बांधायला निघाला आहेस.

13हिराम अबी नावाचा एक कुशल कारागीर मी तुझ्याकडे पाठवतो.

14त्याची आई दान वंशातील असून त्याचे वडील सोर नगरातले होते. हा कारागीर सोने, चांदी, पितळ, लोखंड, दगड आणि लाकूड यांच्या कामात तरबेज आहे. जांभळे, निळे आणि अत्यंत तलम असे उंची किरमिजी वस्त्र करण्यातही तो निपुण आहे. त्याला सांगितलेली कोणतीही गोष्ट तो तिचे योग्य रेखाटन करून कोरून काढू शकतो. तो तुझ्या आणि तुझ्या वडलांच्या, माझ्या स्वामी दाविदाच्या कसबी कारागिरांबरोबर काम करील.

15“तुम्ही गहू, जव, तेल आणि द्राक्षारस देण्याचे कबूल केले आहे ते सर्व आमच्या नोकरांना द्यावे.

16आणि लबानोनमधून आम्ही तुम्हाला हवे तितके लाकूड झाडे तोडून पाठवू. ओडक्यांचे तराफे करून आम्ही ते इथून समुद्रमार्गे यापो येथे पोचते करु. तेथून ते तुम्ही यरूशलेमला न्यावे.”

17शलमोनाने यानंतर इस्राएलमधल्या सर्व उपऱ्या लोकांची गणना केली. दावीदाने गणती केली होती त्यानंतरची ही गणती. दावीद हा शलमोनाचा पिता या गणनेत त्यांना एक लाख त्रेपन्न हजार सहाशे उपरे लोक मिळाले.

18शलमोनाने त्यापैकी सत्तर हजार जणांना ओझी वाहायला निवडले आणि ऐंशी हजार लोकांना डोंगरातून दगड काढायच्या कामासाठी निवडले. उरलेल्या तीन हजार सहाशे उपऱ्यांना या काम करणाऱ्यांवर देखरेख करणारे मुकादम म्हणून नेमले.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  2 Chronicles 2 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran