Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  2 Chronicles 14 >> 

1अबीयाला पुढे आपल्या पूर्वजांसोबत चिरविश्रांती मिळाली. दावीदनगरात लोकांनी त्याचे दफन केले. त्याचा मुलगा आसा हा त्याच्यानंतर राज्य करु लागला आसाच्या कारकिर्दीत लोकांना दहा वर्षे शांतता लाभली.

2आसाने परमेश्वर देवाच्या दृष्टीने न्याय्य आणि उचित असा कारभार केला.

3त्याने मूर्तिपूजेसाठी वापरात येणाऱ्या चमत्कारिक वेद्या काढून टाकल्या. उच्च स्थाने पाडली आणि पवित्र मानले जाणारे स्तंभ फोडून टाकले. आसाने अशेरा देवीचे खांबही उदध्वस्त केले.

4त्याने यहूदी लोकांना परमेश्वर देवाला अनुसरायची आज्ञा केली. त्यांच्या पूर्वजाचा देव तोच. त्या परमेश्वराने घालून दिलेल्या आज्ञा आणि नियम पाळायला फर्मावले.

5यहूदाच्या सगळ्या नगरांमधली उच्च स्थाने आणि धूप जाळायच्या वेद्या आसाने काढून टाकल्या. आसाच्या कारकीर्दीत त्यामुळे राज्यात शांतता नांदत होती.

6या काळात आसाने यहूदात भक्कम तटबंदीची नगरे बांधली. परमेश्वराने शांतता दिल्यामुळे या काळात आसा युध्दमुक्त राहिला.

7आसा यहूदातील लोकांना म्हणाला, “ही नगरे बांधून त्याभोवती तटबंदी करु. त्यांना कोट, बुरुज, वेशी आणि अडसर करु. या प्रदेशात आपण राहात आहोत, तेव्हाच हे करु. परमेश्वर देवाला अनुसरल्यामुळे हा देश आपल्याला मिळाला आहे. त्याने आपल्याला स्वास्थ्यही दिले आहे.” तेव्हा त्यांनी ते बांधले व यश मिळविले.

8आसाच्या सैन्यात यहूदाच्या वंशातील तीन लाख जण आणि बन्यामिन वंशातील दोन लाख ऐंशी हजार पुरूष होते. यहूदा लोकांकडे मोठ्या ढाली आणि भाले होते. बन्यामिनाकडे लहान ढाली होत्या. तसेच धनुष्य-बाण होते. हे सर्व पराक्रमी आणि बलवान लढवय्ये होते.

9पुढे जेरहने आसावर स्वारी केली. जेरह हा कूशी होता त्याच्या कडे दहा लाख सैनिक आणि तीनशे रथ होते. जेरह आपल्या सैन्याला घेऊन मारेशा नगरापर्यंत आला.

10आसा त्याच्याशी सामना करायला निघाला. मारेशा जवळच्या सफाथाच्या खोऱ्यात त्याने आपले सैन्य उभे केले.

11आसा आपल्या परमेश्वर देवाला हाक मारुन म्हणाला, “परमेश्वरा, या बलाढ्य सेनेपुढे दुर्बलांना तूच मदत करु शकतोस. तूच आमच्या मदतीला उभा राहा. आम्ही तुझ्यावर भरवसा ठेवून आहोत. तुझे नाव घेऊनच आम्ही या विशाल सेनेला तोंड देणार आहोत. परमेश्वर देवा, तुझ्यावर कोणी विजय मिळवू नये.”

12मग परमेश्वराने आसाच्या यहूदा सेनेकडून कूशी सैन्याचा पराभव करवला. कूशी सैन्याने पळ काढला.

13आसाच्या सैन्याने गरारपर्यंत कुशींचा पाठलाग केला. त्यात कूशींची एवढी प्राणहानी झाली की पुन्हा लढाईला उभे राहायचे बळ त्यांच्यात राहिले नाही. परमेश्वरापुढे आणि त्याच्या सैन्यापुढे ते पार धुळीस मिळाले. आसाच्या लोकांनी कूर्शींच्या मौल्यवान वस्तू लुटल्या.

14गरारच्या आसपासच्या सर्व गावांचा आसाच्या सैन्याने पराभव केला. तिथल्या लोकांनी परमेश्वराची धास्ती घेतली. या गावांमध्ये लुटण्यासारखे बरेच काही होते. ते आसाच्या सैन्याने घेतले.

15मेंढपाळांच्या वस्त्यांवर आसाच्या सैन्याने धाड घातली. तेथून त्यांनी बरीच मेंढरे आणि उंट घेतले आणि ते यरुशलेमला परतले.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  2 Chronicles 14 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran