1परमेश्वर देव सोबत असल्यामुळे दाविदाचा पुत्र शलमोन एक बलाढ्य राज्यकर्ता झाला व परमेश्वराने त्याला फार सामर्थ्यवान केले.
2शलमोन सर्व इस्राएल लोकांशी म्हणजेच, सरदार, अधिकारी, न्यायाधीश, इस्राएलमधील प्रमुख मंडळी या सर्वांशी बोलला.
3मग तो आणि त्याच्या बरोबरची ही सर्व मंडळी गिबोन येथील उच्चस्थानी गेली. परमेश्वराचा सभामंडप तेथे होता, परमेश्वराचा सेवक मोशे आणि इस्राएल लोक रानात असतांना मोशेने तो बनवला होता.
4दावीदाने परमेश्वराच्या कराराचा कोश किर्याथ यारीमाहून यरूशलेम येथे आणला होता. यरूशलेमेमध्ये तो ठेवण्यासाठी दावीदाने जागा तयार केली होती. कराराच्या कोशासाठी त्याने यरुशलेमेमध्ये तंबू उभारला होता.
5उरीचा मुलगा बसालेल याने पितळी वेदी केली होती. ती वेदी गिबोन येथील परमेश्वराच्या निवसमंडपासमोर होती, म्हणून शलमोन आपल्या बरोबरच्या इस्राएल लोकांसह गिबोन येथे परमेश्वराचा सल्ला घेण्यासाठी गेला.
6परमेश्वराच्या निवासमंडपासमोरील पितळी वेदी वर शलमोनाने एक हजार होमार्पणे केली.
7त्या रात्री देवाने शलमोनाला दर्शन दिले तो म्हणाला, शलमोना, माग! तुला काय हवय ते?
8शलमोन परमेश्वराला म्हणाला, माझे वडील दावीद यांच्यावर तुझी फार कृपा दृष्टी होती, त्यांच्या जागी तू मला राजा म्हणून निवडलेस.
9आता, हे परमेश्वर देवा, तू माझे वडील दावीद यांना दिलेले वचन पूर्ण कर, कारण ज्या राष्ट्राचा तू मला राजा केले आहेस, त्याच्या प्रजेची संख्या पृथ्वीवरील मातीच्या रज:कणांसारखी विपुल आहे.
10या लोकांना उचित मार्गाने नेण्यासाठी मला शहाणपण आणि ज्ञान दे, तुझ्या एवढ्या बहुसंख्य लोकांवर राज्य करणे कोणाला जमणार?
11तेव्हा परमेश्वर शलमोनाला म्हणाला, हे तुझ्या मनात होते, आणि तू धनसंपत्ती, ऐश्वर्य किंवा मान-सन्मान यांची मागणी केली नाहीस व शत्रूंचाही नि:पात व्हावा असेही मागितले नाहीस, तसेच स्वत:साठी दीर्घायुष्य मागितले नाहीस तर ज्यांचा मी तुला राजा केले त्या प्रजेवर राज्य करता यावे म्हणून तू शहाणपण आणि ज्ञान मागितलेस-
12आता तुला ज्ञान व बुद्धी देण्यात आली आहेत; तुझ्या पुर्वीच्या कोणाही राजाला मिळाले नाही व तुझ्यानंतर कोणत्याही राजाला मिळणार नाही एवढे मी तुला ऐश्वर्य, संपत्ती व मानसन्मान देखील देईन.
13तेथून शलमोन गिबोनाच्या उच्चस्थानाहून, सभामंडपासमोरून यरूशलेमेस आला, व इस्त्राएलावर राज्य करू लागला.
14शलमोनाने घोडे आणि चौदाशे रथ यांची जमवाजमव सुरु केली. त्याच्याकडे बारा हजार घोडेस्वार जमा झाले. त्यांना त्याने रथांसाठी जागा असलेल्या नगरांमध्ये ठेवले, व काही जनांना त्याने आपल्याजवळ यरूशलेम येथेच ठेवून घेतले.
15त्याने यरूशलेममध्ये सोन्याचांदीचा एवढा साठा केला की, सोने व चांदी दगडांप्रमाणे विपुल झाली होती तर गंधसरूचे लाकूड पश्चिमेकडील डोंगराळ भागात उंबराचे लाकूड जसे विपुल होते तसे केले.
16मिसर आणि क्यू येथून शलमोनाने घोडे मागवले होते. त्याचे व्यापारी क्यू येथे घोड्यांची खरेदी करत.
17त्यांनी मिसरमधून सहाशे शेकेल चांदीला एकेक रथ आणि दिडशे शेकेल चांदीला घोडा या प्रमाणे ही खरेदी केली. हित्ती आणि अरामी राजांना मग ते हे रथ आणि घोडे विकत.