Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  1 Kings 20 >> 

1बेन-हदाद अरामाचा राजा होता. त्याने आपल्या सर्व सैन्याची जमवाजमव केली. त्याच्या बाजूला बतीस राजे होते. त्यांच्याकडे घोडे आणि रथ होते. त्यांनी शोमरोनला वेढा घातला आणि युध्द पुकारले.

2इस्राएलचा राजा अहाब याच्याकडे नगरात बेनहदादने दूतांकरवी निरोप पाठवला.

3संदेश असा होता, “बेन-हदादचे म्हणणे आहे, तुमच्याकडील सोने रुपे तुम्ही मला द्यावे. तसेच तुझ्या बायका आणि पुत्रेही माझ्या हवाली करावी.”

4यावर इस्राएलाच्या राजाचे उत्तर असे होते, “महाराज मी तर आता तुमच्याच ताब्यात आहे, हे मला मान्य आहे. त्यामुळे जे माझे ते सर्व तुमचेच आहे.”

5अहाबाकडे हे दूत पुन्हा एकदा आले आणि म्हणाले, “बेन-हदादचे म्हणणे असे आहे, तुझ्याजवळचा सोन्याचांदीचा ऐवज तसेच बायकापुत्रे तू माझ्या स्वाधीन केली पाहिजेस.

6उद्याच मी माझ्या माणसांचे एक शोधपथक तिकडे पाठवणार आहे. ते तुझ्या तसेच तुझ्या कारभाऱ्यांच्या घराची झडती घेतील. तुमच्याजवळच्या सर्व मौल्यवान चीजा त्या माणसांच्या हवाली करा. ती माणसे त्या वस्तू मला आणून देतील.”

7तेव्हा इस्त्राएलचा राजा अहाबाने आपल्या देशातील सर्व वडीलधाऱ्या माणसांची सभा घेतली. अहाब त्यांना म्हणाला, “हे पाहा, हा मणुष्य माझे कसे अनिष्ट करू पाहत आहे. आधी त्याने माझ्या जवळचे सोनेचांदी तसेच माझी बायका पुत्रे मागितली. त्याला मी कबूल झालो. आणि आता त्याला सर्वच हवे आहे.”

8यावर ती वडीलधारी मंडळी आणि इतर लोक म्हणाले, “त्याच्या म्हणण्याला मान झुकवू नको. तो म्हणतो तसे करु नको.”

9मग राजा अहाबाने बेन-हदादकडे निरोप्याला सांगीतले त्याला सांग माझा स्वामी अहाबाने सांगितले, तुझी पहिली मागणी मला मान्य आहे. पण तुझ्या दुसऱ्या आज्ञेच मी पालन करु शकत नाही. बेन-हदादला त्याच्या दूतांनी हा निरोप सांगितला.

10तेव्हा बेन-हदादकडून दुसरा निरोप आला. त्या निरोपात म्हटले होते, “शोमरोनचा मी पूर्ण विध्वंस करीन. तिथे काहीही शिल्लक उरणार नाही. आठवणी दाखल काही घेऊन यावे असेही माझ्या माणसांना काही राहणार नाही. असे झाले नाहीतर देव माझे तसे करो व त्यापेक्षा अधीक करो.”

11इस्त्राएलच्या राजाचे त्याला उत्तर गेले. त्यात म्हटले होते. “बेन-हदादला जाऊन सांगा की, जो चिलखत चढवतो त्याने, जो ते उतरवण्याइतक्या दीर्ख काळापर्यंत जगतो त्याच्या इतके फुशारुन जाऊ नये.”

12राजा बेन-हदाद इतर राजांच्या बरोबर आपल्या तंबूत मद्यपान करत बसला होता. त्यावेळी हे दूत आले आणि राजाला हा संदेश दिला. त्याबरोबर बेनहदादने आपल्या माणसांना नगरापुढे चढाईचा व्यूह रचायला सांगितले. त्याप्रमाणे लोकांनी आपापल्या जागा घेतल्या.

13त्यासमयी इकडे एक संदेष्टा इस्त्राएलाचा अहाब राजांकडे आला. राजाला तो म्हणाला, “अहाब राजा, परमेश्वराचे तुला सांगणे आहे की, ‘एवढी मोठी सेना बघितलीस? मी, प्रत्यक्ष परमेश्वर, तुझ्या हस्ते या सैन्याचा पराभव करवीन. म्हणजे मग मीच परमेश्वर असल्याबद्दल तुझी खात्री पटेल.”

14अहाबाने विचारले. या पराभवासाठी तू कोणाला हाताशी धरशील तेव्हा तो संदेष्टा म्हणाला, प्रांत अधिकाऱ्यांच्या हाताखालच्या तरुणांची परमेश्वर मदत घेईल यावर राजाने विचारले, “या सैन्याचे नेतृत्व कोण करील? तूच ते करशील” असे संदेष्ट्याने सांगितले.

15तेव्हा अहाब राजाने अधिकाऱ्यांच्या हाताखालच्या तरुणांची कुमक गोळा केली. त्या तरुणांची संख्या दोनशे बत्तीस भरली. मग राजाने इस्राएलाच्या सर्व फौजेला एकत्र बोलावले. तेव्हा ते एकंदर सात हजार होते.

16राजा बेन-हदाद आणि त्याच्या बाजूचे बत्तीस राजे दुपारी आपापल्या तंबूमध्ये मद्यपान करण्यात आणि नशेत गुंग होते. त्यावेळी अहाबाने हल्ला चढवला.

17तरुण मदतनीस आधी चालून गेले. तेव्हा शोमरोनमधून सैन्य बाहेर आल्याचे राजा बेन-हदादच्या माणसांनी त्याला सांगितले.

18तेव्हा बेन-हदाद म्हणाला, “ते हल्ला करायला आले असतील किंवा सलोख्याची किनंती करायला आले असतील. त्यांना जिवंत पकडा.”

19राजा अहाबाच्या तरुणांची तुकडी नगरातून बाहेर पडली आणि इस्राएलचे सैन्य मागोमाग येत होते.

20प्रत्येक इस्राएलीने समोरुन येणाऱ्याला ठार केले. त्याबरोबर अरामामधली माणसे पळ काढू लागली. इस्राएलाच्या सैन्याने त्यांचा पाठलाग केला. राजा बेन-हदाद तर एका रथाच्या घोड्यावर बसून पळाला.

21इस्त्राएल राजाने सेनेचे नेतृत्व करून अरामाच्या फौजेतील सर्व घोडे आणि रथ पळवले. अरामाची मोठी कत्तल उडवली.

22यानंतर तो संदेष्टा इस्त्राएल राजा अहाबाकडे गेला आणि म्हणाला, “अरामाचा राजा बेन-हदाद पुढच्या वसंत ऋतुत पुन्हा तुझ्यावर चालून येईल. तेव्हा तू आता परत जा आणि आपल्या सैन्याची ताकद आणखी वाढव. काळजीपूर्वक आपल्या बचावाचे डावपेच आखा.”

23अरामाच्या राजाचे अधिकारी त्याला म्हणाले, इस्राएलाचे देव हा पाहाडावरील देव आहेत. आपण डोंगराळ भागात लढलो. म्हणून इस्राएलांचा जय झाला. तेव्हा आता आपण सपाटीवर लढू म्हणजे जिंकू.

24आता तुम्ही असे करायला हवे त्या राजांकडे सैन्याचे नेतृत्व न देता त्यांच्या जागी सेनापती नेमा.

25“जेवढ्या सेनेचा संहार झाला तेवढी पुन्हा उभी करा. घोडे आणि रथ मागवा. मग आपण सपाटीवर इस्राएलोकांचा सामना करु म्हणजे जय आपलाच.” बेनहदादने हा सल्ला मानला आणि सर्व तजवीज केली.

26वसंत ऋतुत बेन-हदादने अराममधील लोकांना एकत्र आणले आणि तो इस्राएलवरील हल्ल्यासाठी अफेक येथे आला.

27इस्राएलही युध्दाला सज्ज झाले. अरामी सैन्याविरुध्द लढायला गेले. अराम्यांच्या समोरच त्यांनी आपला तळ दिला. शत्रूसैन्याशी तुलना करता, इस्राएल म्हणजे शेरडांच्या दोन लहान कळपांसारखे दिसत होते. अरामी फौजेने सगळा प्रदेश व्यापला होता.

28एक देवाचा माणूस (संदेष्टा) इस्राएलाच्या राजाकडे एक निरोप घेऊन आला. निरोप असा होता. “परमेश्वर म्हणतो, ‘मी डोंगराळ भागातला देव आहे असे या अरामी लोकांचे म्हणणे आहे. सपाटीवरचा मी देव नव्हे असे त्यांना वाटते. तेव्हा या मोठ्या सेनेचा मी तुमच्या हातून पराभव करणार आहे. म्हणजे संपूर्ण प्रदेशाचा मी परमेश्वर आहे हे तुम्ही जाणाल.

29दोन्ही सेना सात दिवस समोरासमोर तळ देऊन बसल्या होत्या. सातव्या दिवशी लढाईला सुरुवात झाली. इस्राएल लोकांनी अरामाचे एक लक्ष सैनिक एका दिवसात ठार केले.”

30जे बचावले ते अफेक येथे पळून गेले. यातील सत्तावीस हजार सैनिकांवर शहराची भिंत कोसळून पडली. बेन-हदादनेही या शहरात पळ काढला होता. तो एका खोलीत लपला होता.

31त्याचे सेवक त्याला म्हणाले, इस्राएलाचे राजे दयाळू आहेत असे आम्ही ऐकून आहो. आपण कबंरेस गोणताट नेसून आणि डोक्याभोवती दोरखंड आवळून इस्राएलाच्या राजाकडे जाऊ कदाचित् तो आपल्याला जीवदान देईल.

32त्या सर्वांनी मग गोणताट घातले. डोक्याभोवती दोरी बांधली आणि ते इस्राएलाच्या राजाकडे आले. त्याला म्हणाले, तुमचा दास बेन-हदाद तुमच्याकडे जीवदान मागत आहे. अहाब म्हणाला, “म्हणजे तो अजून जिवंत आहे? तो माझा बंधूच आहे.”

33बेन-हदादला अहाब ठार करणार नाही अशा अर्थाचे त्याने काहीतरी आश्वासक बोलावे अशी बेनहदादच्या बरोबरच्या लोकांची इच्छा होती. तेव्हा अहाबाने बेन-हदादला भाऊ म्हटल्यावर ते ताबडतोब, हो, बेन-हदाद तुमचा भाऊच आहे अहाबाने बेन-हदादला “आपल्यासमोर बोलावून घेतले.” त्याप्रमाणे तो आला. मग राजा अहाबाने त्याला आपल्याबरोबर रथात बसायला सांगितले.

34बेन-हदाद अहाबाला म्हणाला, “माझ्या वडीलांनी तुझ्या वडीलांकडून जी गावे घेतली ती मी तुला परत करीन. मग, माझ्या वडीलांनी शोमरोन मध्ये बाजारपेठा वसवल्या तशा तुला दिमिष्कात करता येतील”अहाब त्यावर म्हणाला, “या कारावर ती तुला मुक्त करायला तयार आहे.” तेव्हा या दोन राजांनी आपसात शांतिचा करार केला. मग राजा अहाबाने राजा बेन-हदादला मुक्त केले.

35त्यानंतर संदेष्टयांच्या शिष्यापैकी एका संदेष्ट्याने दुसऱ्या संदेष्ट्याला सांगितले, “मला एक फटका मार.” परमेश्वराचीच तशी आज्ञा होती म्हणून तो असे म्हणाला, पण दुसऱ्या संदेष्ट्यांने तसे करायचे नाकारले.

36तेव्हा पहिला संदेष्टा म्हणाला, “तू परमेश्वराची आज्ञा पाळली नाहीस. तेव्हा तू इथून बाहेर पडशील तेव्हा सिंह तुझा जीव घेईल” तो दुसरा संदेष्टा तेथून निघाला तेव्हा खरोखरच सिंहाने त्याला ठार मारले.

37मग हा पहिला संदेष्टा एका माणसाकडे गेला. त्याला त्याने स्वत:ला “फटका मारायला” सांगितले. त्या माणसाने तसे केले आणि संदेष्ट्याला घायाळ केले.

38त्या संदेष्ट्याने मग स्वत:च्या तोंडाभोवती एक फडके गुंडाळून घेतले. त्यामुळे तो कोण हे कोणालाही ओळखू येऊ शकत नव्हते. हा संदेष्टा मग वाटेवर राजाची वाट पाहात बसला.

39राजा तिथून जात होता. तेव्हा संदेष्टा त्याला म्हणाला, मी लढाईवर गेलो होतो. आपल्यापैकी एकाने एका शत्रू सैनिकाला माझ्यापुढे आणले आणि मला सांगितले, याच्यावर नजर ठेव. हा पळाला तर याच्या जागी तुला आपला जीव द्यावा लागेल किंवा शंभर रत्तल चांदीचा दंड भरावा लागेल.

40पण मी इतर कामात गुंतलो होतो. तेव्हा तो माणूस पळून गेला यावर इस्राएलाचा राजा म्हणाला, “त्या सैनिकाला तू निसटू दिलेस हा तुझा गुन्हा तुला मान्य आहे. तेव्हा निकाल उघडच आहे. तो माणूस म्हणाला ते तू केले पाहिजेस.”

41आता त्या संदेष्ट्याने तोंडावरचे फडके काढले. इस्राएली राजाने त्याला पाहिले आणि तो संदेष्टा असल्याचे त्याने ओळखले.

42मग तो संदेष्टा राजाला म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, मी ज्याचा वध करावा म्हणून सांगितले. त्याला तू मोकळे सोडलेस. तेव्हा आता त्याच्या जागी तू आहेस. तू मरशील. तुझ्या शत्रूच्या ठिकाणी तुझे लोक असतील तेही जिवाला मुकतील.”

43यानंतर इस्राएलचा राजा शोमरोनाला आपल्या घरी परतला. तो अतिशय चिंताग्रस्त आणि खिन्न झाला होता.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  1 Kings 20 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran