Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  1 Kings 2 >> 

1दावीदाचा मरणकाळ जवळ येऊन ठेपला होता. तेव्हा त्याने शलमोनाला आज्ञा देऊन सांगितले,

2आता मी जगाच्या रीतीप्रमाणे जाणार आहे. तर तू हिमंत धर, खंबीर, जबाबदार पुरुष हो.

3आता परमेश्वर देवाच्या सर्व आज्ञांचे काळजीपूर्वक पालन कर त्याच्या मार्गाने जा, परमेश्वराच्या सर्व आज्ञा, नियम, कराराचे आदेश, व निर्णय काटेकोरपणे मोशेच्या नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे पाळ. त्यामुळे तू जिथे जाशील तिथे, व जे कार्य हातात घेशील त्यात यशस्वी होशील.

4तू परमेश्वराचे म्हणणे ऐकल्याने तो ही मला दिलेली वचने पाळील, जर मी सांगितलेल्या मार्गाने मनपासून आणि प्रामाणिकपणाने, तुझी पुत्रे चालली, तर इस्राएलाच्या राजासनावरून तुझ्या वंशातला पुरुष खुटंणार नाही.

5सरुवेचा पुत्र यवाब याने माझ्याशी काय केले ते लक्षात आहे ना? त्याने इस्राएल सैन्याच्या दोन सेनापतींना, नेराचा पुत्र अबनेर आणि येथेरचा पुत्र अमासा यांना ठार केले आणि मुख्य म्हणजे, शांततेच्या काळात त्याने हा रक्तपात केला आहे व त्याची तलवार खोचायचा कमरबंद आणि त्याच्या पायातले सैनिकी जोडे त्यांच्या रक्ताने रक्ताळलेले आहेत.

6तुझ्याजवळ असलेल्या ज्ञानाने यवाबाबरोबर, जसे तुला योग्य वाटेल तसा तू वाग व त्याचे पिकलेले केस शांतीने कबरेत उतरू देेऊ नको.

7गिलादाच्या बर्जिल्ल्य याच्या मुलांवर दया असू दे. त्यांच्याशी सख्य ठेव आणि तुझ्या पंगतीला त्यांना बसू दे. तुझा भाऊ अबशालोम याच्यापासून मी पळ काढला तेव्हा त्यांनीच मला मदत केली.

8“गेराचा पुत्र शिमी तुझ्याजवळ आहे हे लक्षात ठेव, तो बहूरीम मधल्या बन्यामीन वंशातला आहे. मी महनाइमासला पळ काढला तेव्हा त्याने माझ्याविषयी फार वाईट शाप उद्गगार काढले. पुढे तो मला यार्देन नदीजवळ भेटायला आला. त्याला मी परमेश्वरासमक्ष वचन दिले की, मी तुला तलवारीने ठार करणार नाही.

9पण आता त्याला तू निर्दोष समजू नकोस. तू सुज्ञ मनुष्य आहेस, त्याला काय करायचे ते तुला समजते. त्या पिकलेल्या केसाच्या म्हाताऱ्याला रक्ताचे स्नान घालून कबरेत पाठव.”

10मग दावीद मरण पावला. आपल्या पुर्वजाजवळ दावीद नगरात त्याचे दफन झाले.

11हेब्रोनवर सात वर्ष आणि यरुशलेम येथे तेहतीस वर्ष असे एकंदर चाळीस वर्षे दावीदाने इस्राएलावर राज्य केले.

12आता शलमोन आपल्या वडीलांच्या दावीदाच्या राजासनावर बसला. व त्याची सत्ता बळकटीने स्थापन झाली.

13यानंतर हग्गीथेचा पुत्र अदोनीया शलमोनाची आई बथशेबा हिच्याकडे गेला. बथशेबाने त्याला विचारले, तू शांंतीने आला आहेस ना अदोनीया म्हणाला, हो, ही शांतता भेट आहे.

14मला तुमच्याशी काही बोलायचे आहे. बथशेबा म्हणाली, “मग बोल.”

15अदोनीया म्हणाला, एक काळ असा होता की, हे राज्य माझे होते. तुम्हाला हे माहीत आहे. मी राजा आहे अशीच इस्राएलाच्या सर्व लोकांची भावना होती. पण पुढे सगळे बदलले. आता माझा भाऊ गादीवर आहे. परमेश्वरानेच त्याची निवड केली आहे.

16आता माझे एक मागणे आहे. कृपाकरून नाही म्हणून नकोस बथशेबाने “तुला काय हवे?” असे विचारले.

17अदोनीया म्हणाला, “राजा शलमोन तुला नाही म्हणणार नाही, तू सांगशील ते काहीही करील तेव्हा शुनेममधल्या त्या अबीशग नावाच्या तरुणीशी मला लग्र करायची संमती हवी आहे.”

18बथशेबा म्हणाली, “ठीक आहे, मी राजाशी बोलते.”

19मग बथशेबा राजा शलमोनाकडे अदोनीयाच्या वतीने बोलण्यास गेली. तिला पाहिल्यावर तो उठून उभा राहिला. मग तिला वंदन करून तो राजासनावर बसला. सेवकांना सांगून त्याने आईसाठी दुसरे राजासन आणवले. ती त्याच्या उजव्या हाताला बसली.

20नंतर बथशेबा त्याला म्हणाली, मला एक छोटीशी विनंती तुझ्याजवळ करायची आहे. कृपाकरून नाही म्हणून नकोस राजा म्हणाला, “आई, तुला काय हवे ते माग मी नकार देणार नाही.”

21ती म्हणाली, “तुझा भाऊ अदोनीया याला शुनेमच्या अबीशगेशी लग्न करु दे.”

22राजा शलमोन आपल्या आईला म्हणाला, “अदोनीयासाठी केवळ शुनेमकरीण अबीशगेची मागणी कशाला करतेस? त्याच्यासाठी राज्यदेखिल का मागत नाहीस, तो माझा मोठा भाऊ आहे म्हणून आणि याजक अब्याथार आणि यवाब, सरुवेचा यांच्यासाठी देखील राज्य माग.”

23मग परमेश्वराची शपथ घेऊन शलमोन राजा म्हणाला, “अदोनीयाने ही मागणी करून आपल्या जीवावर संकट आणले आहे; तसे न घडले तर परमेश्वर तसेच त्यापेक्षा अधीक माझे करो.

24इस्राएलचा राजा म्हणून परमेश्वराने माझी निवड केली आहे. माझे वडील दावीद यांच्या गादीवर त्याने मला बसवले आहे. आपण दिलेला शब्द पाळून राज्याची सत्ता परमेश्वराने आमच्या घराण्यात ठेवली आहे. तेव्हा आता त्याची शपथ घेऊन सांगतो की अदोनीयाला आज मृत्युदंड होईल.”

25राजा शलमोनाने यहोयादाचा पुत्र बनायाला आज्ञा दिली; आणि बनायाने बाहेर जाऊन अदोनीयाला ठार केले.

26मग राजा शलमोन अब्याथार याजकाला म्हणाला, “तुलाही मी मारायला हवे पण अनाथोथ येथल्या आपल्या घरी मी तुला जाऊ देतो. माझ्या वडील दावीदाबरोबर मार्गक्रमण करतांना परमेश्वराचा पवित्र कराराचा कोश उचलून न्यायला तू मदत केलीस म्हणून तुला मी यावेळी जिवे मारत नाही. शिवाय त्यांच्या कठीण काळातही तू दावीदाला साथ दिली आहेस”

27शिलो येथील याजक एली आणि त्याचे कुटुंब यांच्याविषयी देवाने असेच सांगितले होते परमेश्वर जे बोलला ते पूर्ण व्हावे म्हणून, परमेश्वराच्या याजक पदावरून शलमोनाने अब्याथार याजकाला काढून टाकले.

28ही बातमी यवाबाच्या कानावर गेल्यावर तो भयभीत झाला. त्याने अबशालोमला न देता अदोनीयाला पठिंबा दिला होता. म्हणून तो त्वरीत परमेश्वराच्या पवित्र मंडपात गेला आणि वेदीची शिंगे घट्ट धरुन बसला.

29कोणीतरी यवाब हा परमेश्वराच्या मंडपात वेदीपाशी आहे हे राजा शलमोनाला सांगितले. तेव्हा शलमोनाने यहोयादाचा पुत्र, बनाया यास पाठवले, तो त्यास म्हणाला जा, त्याच्यावर हल्ला कर.

30बनाया परमेश्वराच्या पवित्र मंडपात जाऊन यवाबाला म्हणाला, “तेथून बाहेर पड ही राजाची आज्ञा आहे.” पण यवाब म्हणाला मी येथेच मरेन. तेव्हा बनायाने राजाकडे जाऊन त्याला हे सांगितले यवाब म्हणतो मि वेदीपाशीच मरेन.

31तेव्हा राजाने बनायाला हुकुम केला, “तो म्हणतो तसे कर त्याला तिथेच ठार कर, मग त्याचे दफन कर. म्हणजे मग आमच्या घराण्यावरचा यवाबाचा कलंक पुसला जाईल. यवाबाने निरपराधांची हत्या केली तो हा कलंक होय.

32त्याने केलेला रक्तपात परमेश्वर त्याच्याच शिरी उलटवील, माझे वडील दावीद यास नकळत नेराचा पुत्र अबनेर आणि येथेरचा पुत्र अमासा या आपल्यापेक्षा न्यायी व चांगल्या अशा दोन माणसांना त्याने तलवारीने मारले होते. अबनेर इस्राएल सैन्याचा सेनापती तर अमासा यहूदा सैन्याचा सेनापती होता.

33त्यांचा रक्तपात यवाबाच्या शिरी त्याच्या संततीच्या शिरी उलटवून सर्वदा राहील. पण दावीद, त्यांचे वंशज, त्याच्या घराण्यातील राजे आणि त्याचे राज्य यांना देवाच्या कृपेने निरंतर शांतता लाभेल.”

34तेव्हा यहोयादाचा पुत्र बनाया याने यवाबाला ठार केले व वाळवंटातील त्याच्या घराजवळ त्याचे दफन करण्यात आले.

35यवाबाच्या जागी मग राजा शलमोनाने यहोयादाचा पुत्र बनायाची सेनापती म्हणून नेमणूक केली आणि अब्याथाराच्या जागी मुख्य याजक म्हणून सादोकाची केली.

36मग राजाने शिमीला बोलावणे पाठवले. त्याला सांगितले, “इथे यरुशलेमामध्ये स्वत:साठी घर बांधून राहा. हे नगर सोडू नको.

37हे नगर सोडून किद्रोन झऱ्यापलीकडे गेलास तर त्या गुन्ह्याबद्दल तुला जीव गमवावा लागेल. व तुझे रक्त तुझ्या माथी असेल.”

38तेव्हा शिमी राजाला म्हणाला, “ठीक आहे, महाराज मी तुमचा दास तुमच्या सागंण्याप्रमाणे करील” शिमी मग यरुशलेमेमध्येच पुष्कळ दिवस राहिला.

39पण तीन वर्षांनंतर शिमीचे दोन नोकर पळून गेले. गथचा राजा आणि माकाचा, पुत्र आखीश याच्याकडे ते गेले, आपले चाकर गथ येथे असल्याचे शिमीला कोणीतरी कळवले.

40तेव्हा शिमीने आपल्या गाढवावर खोगीर चढवले आणि तो गथ येथे आखीश राजाकडे आपले नोकर शोधायला निघाला. तिथे ते मिळाल्यावर त्यांना त्याने परत घरी आणले.

41शिमी यरुशलेमेहून गथला जाऊन आल्याचे कोणीतरी शलमोनाला सांगितले.

42तेव्हा राजाने शिमीला बोलावून घेतले. शलमोन त्याला म्हणाला, यरुशलेम सोडलेस तर तुझा वध होईल हे मी तुला देवाची शपथ घेऊन सांगितले होते ना? तू हे गाव सोडून इतरत्र गेलास तर तुझ्या मृत्यूला तूच जबाबदार राहशील? आणि तू त्याला कबूल झाला होतास. तू म्हणतोस ते मान्य आहे.

43परमेश्वराची शपथ व मी तुला दिलेली आज्ञा तू का मानली नाहीस?

44मग राजा शिमीस म्हणाला, माझे वडील दावीद यांचे तू बरेच अपराध केले आहेस ते तुला माहीती आहेत तर परमेश्वर तुझ्या दुष्टाईचे फळ तुझ्या माथी आनील.

45पण शलमोन राजाला परमेश्वराचे आशीर्वाद राहतील. दावीदाचे राज्य तो सदासर्वकाळ सुरक्षित ठेवील.

46मग राजाने यहोयादाचा पुत्र बनायाला शिमीचा वध करायची आज्ञा दिली आणि बनायाने ती अंमलात आणली. आता शलमोनाची आपल्या राज्यावर पूर्ण पकड बसली.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  1 Kings 2 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran