Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  1 Kings 14 >> 

1याच सुमारास यराबामाचा पुत्र अबीया आजारी पडला.

2तेव्हा यराबाम आपल्या पत्नीला म्हणाला, “तू शिलो येथे जाऊन तिथल्या अहीया या संदेष्ट्याला भेट. मी इस्राएलचा राजा होणार हे भाकित त्यानेच केले होते. तसेच वेष पालटून जा म्हणजे लोक तुला माझी पत्नी म्हणून ओळखणार नाहीत.

3यराबामाने त्याच्या पत्नीला संदेष्ट्याकडे दहा भाकरी, काही पुऱ्या आणि मधाचा बुधला घेऊन पाठवले. मग आपल्या मुलाबद्दल विचार. अहीया तुला काय ते सांगेल.”

4मग यराबामाने सांगितल्यावरुन त्याची बायको शिलोला अहीया, या संदेष्ट्याच्या घरी गेली. अहीया खूप वृध्द झाला होता आणि म्हातारपणामुळे त्याला अंधत्वही आले होते.

5पण परमेश्वराने त्याला सूचना केली, “यराबामाची बायको आपल्या मुलाबद्दल विचारायला तुझ्याकडे येते आहे. तिचा पुत्र फार आजारी आहे.” मग अहीयाने तिला काय सांगायचे तेही परमेश्वराने त्याला सांगितले. यराबामाची बायको अहीयाच्या घरी आली. लोकांना कळू नये म्हणून तिने वेष पालटला होता.

6अहीयाला दारात तिची चाहूल लागली तेव्हा तो म्हणाला, “यराबामाची बायको ना तू? आत ये आपण कोण ते लोकांनी ओळखू नये म्हणून का धडपड करतेस? मला एक वाईट गोष्ट तुझ्या कानावर घालायची आहे.

7परत जाशील तेव्हा इस्राएलाचा परमेश्वर देव काय म्हणतो ते यराबामाला सांग. परमेश्वर म्हणतो, ‘अरे यराबाम, इस्राएलाच्या सर्व प्रजेतून मी तुझी निवड केली. तुझ्या हाती त्यांची सत्ता सोपवली.

8यापुर्वी इस्राएलावर दावीदाच्या घराण्याचे राज्य होते. पण त्यांच्या हातून ते काढून घेऊन मी तुला राजा केले. पण माझा सेवक दावीद याच्यासारखा तू निघाला नाहीस, तो नेहमी माझ्या आज्ञेप्रमाणे वागत असे. मन:पूर्वक मलाच अनुसरत असे. तो योग्य असलेल्या गोष्टी तो करीत असे.

9पण तुझ्या हस्ते अनेक पातके घडली आहेत. तुझ्या आधीच्या कोणत्याही सत्ताधीशापेक्षा ती अधिक गंभीर आहेत. माझा मार्ग तू केव्हाच सोडून दिला आहेस. तू इतर देवदेवतांच्या मूर्ति केल्यास याचा मला खूप राग आला आहे.

10तेव्हा यराबाम, तुझ्या घरात मी आता संकट निर्माण करीन. तुझ्या घरातील सर्व पुरुषांचा मी वध करीन. मग तो इस्त्राएलात बंदीत असो कि मोकळा आगीत शेण काहीही शिल्लक राहत नाही त्याप्रमाणे मी तुझ्या घराण्याचा समूळ नाश करीन.

11यराबामाच्या घरातल्या ज्याला नगरात मरण येईल त्याला कुत्री खातील आणि शेतात, रानावनात मरणारा पक्ष्यांचे भक्ष्य होईल. परमेश्वर हे बोलला आहे.”

12अहीया संदेष्टा मग यराबामाच्या बायकोशी बोलत राहीला. त्याने तिला सांगितले, “आता तू घरी परत जा. तू नगरात शिरल्याबरोबर तुझा पुत्र मरणार आहे.

13सर्व इस्राएल लोक त्याच्यासाठी शोक करतील आणि त्याचे दफन करतील. ज्याला रीतसर मुठमाती मिळेल असा, यराबामाच्या घराण्यातला हाच राहील. कारण फक्त त्याच्याठायीच इस्राएलचा देव परमेश्वर याला काहीसा चांगूलपणा दिसून आला आहे.

14परमेश्वर इस्राएलावर नवीन राजा नेमील. तो यराबामाच्या कुळाचा सर्वनाश करील. हे सगळे लौकरच घडेल.

15मग परमेश्वर इस्राएलाला चांगला तडाखा देईल. इस्राएल लोक त्याने भयभीत होतील. पाण्यातल्या गवतासारखे कापतील. इस्राएलाच्या पूर्वजांना परमेश्वराने ही चांगली भूमी दिली. तिच्यातून या लोकांना उपटून परमेश्वर त्यांना युफ्रटिस नदीपलीकडे विखरुन टाकील. परमेश्वर आता त्यांच्यावर भयंकर संतापलेला आहे, म्हणून तो असे करील. अशेरा मूर्ती त्यांनी उभारली याचा त्याला संताप आला.

16आधी यराबामाच्या हातून पाप घडले. मग त्याने इस्राएल लोकांना पापाला उद्युक्त केले. तेव्हा परमेश्वर त्यांना पराभूत करील.”

17यराबामाची बायको तिरसा येथे परतली. तिने घरात पाऊल टाकताक्षणीच तिचा पुत्र मेला.

18सर्व इस्राएल लोकांना त्याच्या मृत्यूचे दु:ख झाले. त्यांनी त्याचे दफन केले. या गोष्टी परमेश्वरच्या भाकिताप्रमाणेच घडल्या. हे वर्तवण्यासाठी त्याने त्याचा सेवक अहीया या संदेष्ट्याची योजना केली होती.

19राजा यराबामाने आणखीही बऱ्याच गोष्टी केल्या लढाया केल्या, लोकांवर तो राज्य करत राहिला. इस्राएलाच्या राजांचा इतिहास या ग्रंथात, त्याने जे जे केले त्याची नोंद आहे.

20यराबाम बावीस वर्षे तो राजा म्हणून सत्तेवर होता. नंतर तो मृत्यू पावला आणि आपल्या पूर्वजांबरोबर त्याचे दफन झाले. त्याचा पुत्र नादाब त्यानंतर सत्तेवर आला.

21शलमोनाचा पुत्र रहबाम यहूदाचा राजा झाला, तेव्हा तो एक्केचाळीस वर्षाचा होता. यरुशलेमेमध्ये त्याने सतरा वर्षे राज्य केले. परमेश्वराने स्वत:च्या सन्मानासाठी सर्व वंशातून या नगराची निवड केली होती. इस्राएलातील इतर नगरामधून त्याने हेच निवडले होते. रहबामाच्या आईचे नाव नामा, ती अम्मोनी होती.

22यहूदाच्या लोकांच्या हातूनही अपराध घडले याप्रकारे परमेश्वराने जे करु नका म्हणून सांगितले ते त्यांनी केले. परमेश्वराने कोप होईल, अशा चुका त्यांच्या हातून होतच राहिल्या. त्यांच्या पूर्वजांच्या पापांपेक्षाही त्यांची पापे वाईट होती.

23या लोकांनी उंचवटयांवर देऊळे, दगडी स्मारके आणि स्तंभ उभारले. परकीय दैवतासाठी हे सारे होते. प्रत्येक टेकडीवर आणि हिरव्यागार वृक्षाखाली त्यांनी केले व अशेरा मूर्ती स्थापील्या.

24परमेश्वराच्या पूजेचा एक भाग म्हणून लैंगिक उपभोगासाठी शरीरविक्रय करणारेही होते. अशी अनेक दुष्कृत्ये यहूदाच्या लोकांनी केली. या प्रदेशात यापुर्वी जे लोक राहत असत तेही अशाच गोष्टी करत. म्हणून देवाने त्यांच्याकडून तो प्रदेश काढून घेऊन इस्राएलाच्या लोकांना दिला होता.

25रहबामाच्या कारकिर्दीचे पाचवे वर्ष चालू असताना मिसरचा राजा शिशक याने यरुशलेमेवर स्वारी केली.

26त्याने परमेश्वराच्या मंदिरातील आणि महालातील खजिना लुटला. अरामाचा राजा हददेजर याच्या सैनिकांकडून ने ज्या शलमोनाने सोन्याच्या ढाली आणल्या होत्या, त्याही त्याने पळवल्या. दावीदाने त्या यरुशलेमेमध्ये ठेवल्या होत्या. सोन्याच्या सगळ्या ढाली शिशकने नेल्या.

27मग रहबाम राजाने त्यांच्या ऐवजी दुसऱ्या ढाली केल्या, पण या मात्र पितळी होत्या, सोन्याच्या नव्हत्या. महालाच्या दरवाजावर रखवाली करणाऱ्यांना त्याने त्या दिल्या.

28राजा परमेश्वराच्या मंदिरात जात असे तेव्हा प्रत्येक वेळी हे शिपाई बरोबर असत. ते या ढाली वाहात आणि काम झाल्यावर त्या ढाली ते परत आपल्या ठाण्यात भिंतीवर लटकावून ठेवत.

29यहूदाच्या राजांचा इतिहास या ग्रंथात राजा रहबामाच्या सर्व गोष्टींची नोंद आहे.

30रहबाम यराबाम यांचे परस्परांत अखंड युध्द चाललेले होते.

31रहबाम मेला आणि त्याचे आपल्या पूर्वजांबरोबर दफन झाले. दावीद नगरात त्याला पुरले. (याची आई नामा ती अम्मोनी होती) रहबामाचा पुत्र अबीयाम नंतर राज्यावर आला.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  1 Kings 14 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran