Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  James 4 >> 

1तुमच्या विश्र्वासणाऱ्या सहकाऱ्यात लढाया व भांडणे कोठून येतात? तुमच्या अवयवात ज्या वाईट वासना लढाई करतात त्यातून की नाही काय?

2तुम्ही लोभ धरता पण तुम्हाला मिळत नाही; तुम्ही घात व हेवा करता, पण तुम्हाला मिळवता येत नाही. तुम्ही भांडता व लढाई करता तरी तुम्हाला मिळत नाही, कारण तुम्ही मागत नाही.

3तुम्ही मागता आणि तुम्हाला मिळत नाही; कारण तुम्ही वाईट वासना बाळगून मागता, म्हणजे आपण आपल्या चैनीसाठी खर्चावे म्हणून मागता.

4हे देवाशी अप्रामाणिक पिढी! जगाशी मैत्री म्हणजे देवाशी वैर हे तुम्ही जाणत नाही काय? म्हणून जो कोणी जगाचा मित्र होऊ इच्छितो तो देवाचा वैरी आहे.

5किंवा ‘आपल्यात राहणारा आत्मा ईर्षावान’, असे शास्त्रलेख व्यर्थ म्हणतो, असे तुम्हाला वाटते काय?

6पण तो अधिक कृपा करतो, म्हणून शास्त्रलेख असे म्हणतो की, ‘देव गर्विष्ठांना विरोध करतो, पण लीनांवर कृपा करतो’.

7म्हणून देवाच्या अधीन रहा; आणि सैतानाला आडवा, म्हणजे तो तुमच्यापासून दूर पळून जाईल.

8तुम्ही देवाच्या जवळ या म्हणजे तो तुमच्याजवळ येईल. अहो पाप्यांनो, तुम्ही हात शुध्द करा; अहो व्दिमनाच्या मनुष्यांनो, अंतःकरणे शुध्द करा.

9दुःखी व्हा, शोक करा आणि रडा; तुमच्या हसण्याचा शोक होवो; तुमच्या आनंदाची खिन्नता होवो.

10परमेश्वरासमोर नम्र व्हा, म्हणजे तो तुम्हास उच्च करील.

11बंधूंनो, एकमेकांविषयी वाईट बोलू नका. जो बंधूविषयी वाईट बोलतो व आपल्या बंधूला दोष लावतो तो नियमशास्त्राविषयी वाईट बोलतो आणि नियमशास्त्राला दोष लावतो. पण तू जर नियमशास्त्राला दोष लावलास तर तू नियम पाळणारा नाहीस पण न्यायाधीश आहेस.

12जो तारण्यास व नष्ट करण्यास समर्थ आहे असा नियमशास्त्र देणारा व न्यायाधीश एकच आहे. मग शेजार्‍याला दोष लावणारा तू कोण?

13अहो! तुम्ही जे म्हणता की, ‘आज किंवा उद्या आपण ह्या गावाला जाऊ, तेथे वर्षभर राहू, आणि व्यापार करून कमावू’.

14पण उद्या काय होईल हे तुम्हाला माहीत नसते. तुमचे आयुष्य काय आहे? तुम्ही केवळ वाफ आहा; ती थोडा वेळ दिसते आणि नंतर, दिसेनाशी होते.

15त्याबद्दल तुम्ही असे म्हणा की, ‘परमेश्वराची इच्छा असल्यास आपण जिवंत असू, आणि हे करू किंवा ते करू’.

16आता, तुम्ही आपल्या योजनेचा अभिमान मिरवता. अशा प्रकारचा सर्व अभिमान व्यर्थ आहे.

17म्हणून चांगले करणे कळत असून, जो ते करीत नाही त्याला ते पाप आहे.



 <<  James 4 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran