Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Deuteronomy 20 >> 

1तुम्ही शत्रूवर चाल करून जाल तेव्हा त्यांचे घोडे, रथ आणि तुमच्यापेक्षा मोठे सैन्य पाहून घाबरुन जाऊ नका. कारण ज्याने तुम्हाला मिसरमधून बाहेर काढले तो परमेश्वर देव तुमच्याबरोबर आहे.

2तुम्ही युद्धावर जाल तेव्हा तुमच्या याजकाने आपल्या सैन्याकडे येऊन त्यांच्याशी बोलणे करावे.

3ती अशी, “इस्राएल लोकहो, ऐका. तुम्ही आज शत्रूवर चाल करून जात आहात. तेव्हा आपले धैर्य गमावू नका. भयभीत होऊ नका. मन कचरू देऊ नका, भिऊ नका, थरथर कापू नका शत्रूला पाहून घाबरु नका.

4कारण तुम्हाला देव परमेश्वर ह्याची साथ आहे. शत्रू विरुद्ध लढाई करायला तसेच विजय मिळवायला तो तुम्हाला मदत करणारा आहे.”

5मग लेवी अधिकाऱ्यांनी सैन्याला असे सांगावे, “नवीन घर बांधून अजून अर्पण केले नाही असा कोणी तुमच्यात आहे का? त्याने परत जावे. कारण तो युद्धात मरण पावल्यास दुसरा कोणी गृहप्रवेश करील.

6द्राक्षमळा लावून अजून त्याची तोडणी केली नाही, फळ चाखले नाही असा कोणी आहे काय? त्याने माघारी जावे कारण तो युद्धात मरण पावल्यास दुसराच कोणी त्याच्या मळ्यातील फळे खाईल.

7तसेच, वाडग निश्चय होऊन अजून लग्न झालेले नाही असा कोणी असल्यास त्याने परत जावे. कारण तो युद्धात कामी आल्यास त्याच्या वाग्दत्त वधूशी दुसरा कोणी लग्न करील.”

8त्या लेवी अधिकाऱ्यांनी पुढे हेही सांगावे की युद्धाच्या “भीत्रा व घाबरलेल्या मनाचा कोणी असल्यास त्याने घरी परत जावे. नाहीतर त्याच्यामुळे इतरांचेही ह्यदयाचे अवसान गळेल.”

9अशाप्रकारे सैन्याशी संभाषण केल्यानंतर अधिकाऱ्यांनी सेनापतींची नेमणूक करावी.

10तुम्ही एखाद्या नगरावर चाल करून जाल तेव्हा प्रथम शांततेच्या तहाची बोलणी करून पाहा.

11त्यांनी तुमच्या बोलण्याला शांतीने उत्तर देऊन नगराचे दरवाजे उघडले तर तेथील सर्व प्रजा तुमची गुलाम होईल व तुमची सेवाचाकरी करील.

12पण त्यांनी तुमची तहाची बोलणी फेटाळून लावली आणि ते युद्धाला सज्ज झाले तर मग नगराला वेढा घाला.

13आणि तुमचा देव परमेश्वर ते तुमच्या हाती देईल तेव्हा तेथील सर्व पुरुषांना तरवारीने ठार करा.

14पण त्या नगरातील बायका, मुले, गुरेढोरे इत्यादी लूट स्वत:साठी घ्या. तुमचा देव परमेश्वर ह्याने दिलेल्या या लुटीचा उपभोग घ्या.

15तुमच्यापासून फार लांब असणाऱ्या व तुमच्या प्रदेशाबाहेर असणाऱ्या नगरांबाबत असे करण्यात यावे.

16पण तुमचा देव परमेश्वर तुम्हाला देणार असलेल्या प्रदेशातील नगरे तुम्ही ताब्यात घ्याल तेव्हा तिथे मात्र कोणालाही जिवंत ठेवू नका.

17हित्ती, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी, यबूसी अशा एकूण एक सर्वांचा तुमचा देव परमेश्वर ह्याच्या आज्ञेप्रमाणे समूळ नाश करा.

18नाहीतर आपापल्या दैवतांची पूजा करताना ते ज्या अमंगळ गोष्टी करतात त्या ते तुम्हाला शिकवतील आणि तसे करणे आपला देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने पाप आहे.

19युद्धात एखाद्या नगराला तुम्ही फार काळ वेढा घालून राहिलात तर तेथील फळझाडांवर कुऱ्हाड चालवू नका. त्यांची फळे अवश्य खा पण झाडे तोडू नका. त्यांच्याशी युद्ध पुकारायला ती झाडे काही तुमची शत्रू नाहीत.

20पण ज्यांना फळ येत नाहीत ती झाडे तोडलीत तरी चालतील. युद्ध चालू असेल ते नगर पडेपर्यंत युद्धासाठी लागणारी तटबंदी बनवायला त्या लाकडाचा उपयोग हवा तर करा.



 <<  Deuteronomy 20 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran