Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 9 >> 

1मी माझ्या सर्व हृदयाने परमेश्वराला धन्यवाद देणार; मी तुझ्या सर्व अद्भुत कृत्यांबद्दल सांगेन.

2तुझ्यामध्ये मी आनंद व हर्ष करीन, हे परात्परा, मी तुझ्या नावाला महिमा गाईन.

3माझे शत्रू माघारी फिरतात, तेव्हा ते तुझ्यासमोर अडखळतात आणि नाश होतात.

4कारण तू माझा न्यायाला व माझा वादाला समर्थन केले आहे. तू तुझ्या सिंहासनावर न्यायी न्यायाधीश म्हणून बसला आहे.

5आपल्या युद्धाच्या आरोळीने तू राष्ट्रांस भयभीत असे केले आहे; तू दुष्टाचा नाश केला आहे. तू त्यांचे नाव सर्वकालपर्यंत खोडले आहे.

6जेव्हा तू त्यांच्या शहरांना अस्ताव्यस्त केले, तेव्हा शत्रूंची ओसाडी झाली आहे. त्यांची सर्व आठवण देखील नाहीशी झाली आहे.

7परंतु परमेश्वर अनंतकाळ असा आहे; त्याने त्याचे राजासन न्यायासाठी स्थापीले आहे.

8तो जगाचा न्याय प्रामाणिकपणाने करणार, राष्ट्रांसाठी तो न्यायी असा निर्णय देणार आहे.

9परमेश्वर पीडीतांचा आश्रयदुर्ग आहे, संकटकाळी तो बळकट दुर्ग असा आहे.

10जे तुझ्या नावाला ओळखतात, ते तुझ्यावर विश्वास ठेवतात. कारण हे परमेश्वरा जे तुला शोधतात त्यांना तू टाकले नाही.

11सीयोनमध्ये राहाणाऱ्या लोकांनो, तुम्ही परमेश्वराची स्तुती करा. ज्या महान गोष्टी त्याने केल्या त्याबद्दल इतर देशांना सांगा.

12जे परमेश्वराकडे मदतीसाठी गेले त्यांची आठवण त्याने ठेवली त्या गरीब लोकांना मदतीची याचना केली आणि परमेश्वर त्यांना विसरला नाही.

13“परमेश्वरा माझ्यावर दया कर, जो तू मला मरणाच्या दारातून उचलतोस तो तू, जे माझा द्वेष करतात त्यांच्यामुळे मी कसा पीडला जात आहे ते पाहा.

14अहा! म्हणजे यरुशलेमच्या प्रवेशद्वारात मी तुझी स्तुती वर्णून दाखवील. मी तुझ्या तारणात हर्ष करीन.

15राष्ट्रे त्यांच्याच खणलेल्या खाचेत पडले आहे; त्यांनी लपून ठेवलेल्या जाळ्यात त्यांचाच पाय गुंतला आहे.

16परमेश्वराने त्या वाईट लोकांना पकडले. परमेश्वर वाईट कृत्ये करणाऱ्यांना शिक्षा करतो हे ते शिकले हिग्गायोन.

17दुष्ट परतून मृतलोकांत टाकला जाईल, जे राष्ट्रे देवाला विसरले आहेत त्यांचे असेच होईल.

18कारण जो गरजवंत आहे, तो नेहमीच विसरला जाणार नाही. किंवा पीडलेल्यांची आशा कधीच तोडली जाणार नाही.

19हे परमेश्वरा, ऊठ, मनुष्यास प्रबळ न होवो; राष्ट्रांचा न्याय तुझ्यासमक्ष होवो.

20परमेश्वरा त्यांना भयभीत कर; ते केवळ माणसे आहोत हे त्यांना कळू दे. सेला



 <<  Psalms 9 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran