Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 102 >> 

1हे परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक; माझी आरोळीकडे लक्ष दे.

2मी संकटात असताना माझ्यापासून तोंड लपवू नकोस. माझ्याकडे लक्ष दे. जेव्हा मी तुला हाक मारतो,मला त्वरेने उत्तर दे.

3कारण माझे आयुष्य धुराप्रमाणे निघून जात आहे, आणि हाडे अग्नीसारखी जळून गेली आहेत.

4माझे हृदय चिरडून गेले आहे आणि मी गवताप्रमाणे कोमेजून गेलो आहे. मी जेवण खाण्यास असमर्थ आहे.

5माझ्या सततच्या कण्हण्यामुळे, मी फार क्षीण झालो आहे.

6मी रानातल्या पाणकोळ्याप्रमाणे झालो आहे. मी ओसाड ठिकाणातल्या घुबडाप्रमाणे झालो आहे.

7मी जागरण करीत आहे; धाब्यावर एकटे राहणाऱ्या एकाकी पक्ष्याप्रमाणे मी आहे

8माझे शत्रू सर्व दिवस मला टोमणे मारतात; ते माझी चेष्टा करतात माझे नाव वापरून शाप देतात.

9मी राख भाकरीप्रमाणे खाल्ली आहे आणि माझ्या पाण्यात माझे अश्रू मिसळले आहेत.

10कारण तुझ्या भयंकर क्रोधामुळे, तू मला वर उचलून घेऊन खाली फेकून दिलेस.

11माझे दिवस उतरत्या सावलीप्रमाणे झाले आहेत, आणि गवतासारखा मी कोमेजून गेलो आहे.

12पण हे परमेश्वरा, तू सर्वकाळ राजासनारूढ आहेस, आणि तुझी कीर्ती सर्व पिढ्यांसाठी सर्वकाळ राहील.

13तू उठून उभा राहशील आणि सियोनेवर दया करशील. तिच्यावर दया करण्याची वेळ आता आली आहे; नेमलेला वेळ आला आहे.

14कारण तुझे सेवक तिच्या दगडांची आवड धरतात आणि तिच्या नासधूसाची धूळ पाहून त्यांना कळवळा येतो.

15हे परमेश्वरा, राष्ट्रे तुझ्या नावाचा आदर करतील, आणि पृथ्वीवरील सर्व राजे तुझ्या वैभवाचा सन्मान करतील.

16परमेश्वर सियोन पुन्हा बांधेल आणि तो आपल्या गौरवाने प्रगट झाला आहे.

17आणखी तो अनाथाच्या प्रार्थनेला प्रतिसाद देईल. तो त्यांची प्रार्थना नाकारणार नाही.

18पुढील पिढीसाठी हे लिहून ठेवले जाईल आणि अजून ज्या लोकांचा जन्म झाला नाही ते परमेश्वराची स्तुती करतील.

19कारण परमेश्वराने आपल्या उच्च पवित्रस्थानातून जागेतून खाली पाहीले आहे. परमेश्वराने स्वर्गातून खाली पृथ्वीकडे पाहीले,

20तो बंदिवानाचे कण्हणे ऐकेल, ज्यांना मृत्यूदंडाची शिक्षा ठरवली होती त्यास सोडविले.

21नंतर सियोनेतील लोक परमेश्वराचे नाव सांगतील आणि यरुशलेमेत त्याची स्तुती करतील.

22जेव्हा परमेश्वराची एकत्र सेवा करण्यासाठी सगळी राष्ट्रे एकत्र येतील.

23त्याने माझी शक्ती जीवनाच्या मध्येच काढून घेतली. त्याने माझे दिवस कमी केले.

24मी म्हणालो, “हे माझ्या देवा,माझ्या जीवनाच्या मध्येच मला काढून घेऊ नकोस; तू येथे सर्व पिढ्यानपिढ्यातून आहेस.

25तू प्राचीन काळी पृथ्वीचा पाया घातला; आकाश तुझ्या हातचे कार्य आहे.

26ते नाहीसे होईल, पण तू राहशील; ते सर्व कापडाप्रमाणे जीर्ण होतील; कपड्यांसारखे तू त्यांना बदलशील आणि ते नाहीसे होतील.

27पण तू सारखाच आहे, आणि तुझ्या वर्षांना अंत नाही.

28तुझ्या सेवकांची मुले इथे कायम राहतील, आणि त्यांचे वंशज तुझ्या उपस्थितीत इथे राहतील.”



 <<  Psalms 102 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran