Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Exodus 31 >> 

1नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला

2पाहा, यहूदा वंशातील उरीचा मुलगा म्हणजे हूरचा नातू बसालेल याला मी निवडून घेतले आहे.

3देवाच्या आत्म्याने त्याला परिपूर्ण भरले आहे; आणि सर्व प्रकारची कामे करण्यासाठी मी त्याला अक्कल, बुद्धी व ज्ञान ही दिली आहेत.

4तो सोने, चांदी व पितळ यांच्या कलाकुसरीचे काम करील.

5तो रत्नांना सुंदर पैलू पाडील व हिरे जडवून देईल; तो लाकडावरील कोरीव कामही करील; आणि अशा सर्व प्रकारची कलाकुसरीची कामे करील.

6त्याच्याबरोबर काम करण्याकरता दान याच्या वंशातील अहिसामाखाचा मुलगा अहलियाब यालाही मी निवडले आहे; एवढेच नव्हे तर जेवढे म्हणून बुध्दिमान आहेत त्या सर्वांच्या ह्ददयात मी बुध्दि ठेवली आहे. ती यासाठी की, तुला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी सर्व गोष्टी तयार कराव्या.

7म्हणजे दर्शनमंडप आज्ञापटाचा कोश, त्यावरील दयासन आणि तंबूचे सर्व सामान;

8मेज व त्यावरील सर्व समान, शुद्ध सोन्याचा दीपवृक्ष व त्याची उपकरणे;

9होमवेदी व तिची उपकरणे, गंगाळ व त्याची बैठक;

10अहरोन व त्याच्या मुलांनी याजक या नात्याने माझी सेवा करताना घालावयाची, कुशलतेने विणलेले तलम व पवित्र वस्रे;

11अभिषेकाचे सुवासिक तेल आणि पवित्र स्थानी जाळावयाचा सुंगधी द्रव्याचा धूप. ह्या सर्व वस्तू मी तुला सांगितल्याप्रमाणे हे कारागिर तयार करतील.

12नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला,

13इस्त्राएल लोकांना हे सांग की, तुम्ही माझे शब्बाथ अवश्य पाळावेत, कारण की पिढ्यानपिढ्या तुमच्यामाझ्यामध्ये ही खूण आहे. ह्यावरून हे कळावे की, तुम्हांला पवित्र करणारा मी परमेश्वर आहे.

14“म्हणून शब्बाथ दिवस तुम्ही पवित्रपणे पाळावा; शब्बाथ दिवसाला जर कोणी भ्रष्ट करील तर त्याला अवश्य जिवे मारावे; जो कोणी त्यादिवशी काम करील, त्याला आपल्या लोकांतून बाहेर काढून टाकावे.

15सहा दिवस काम करावे. परंतु सातवा दिवस परमेश्वराचा पवित्र दिवस परमविश्रामाचा शब्बाथ होय. जर कोणी शब्बाथ दिवशी काम करील तर त्याला अवश्य ठार मारावे.

16इस्त्राएल लोकांनी शब्बाथ पाळावा; शब्बाथ हा निरंतरचा करार समजून त्यांनी तो पिढ्यानपिढ्या पाळावा.

17शब्बाथ दिवस इस्त्राएल लोकामध्ये व माझ्यामध्ये कायमची खूण आहे. परमेश्वराने सहा दिवस काम करून आकाश व पृथ्वी निर्माण केल्यावर सातव्या दिवशी स्वस्थ राहून विसावा घेतला.”

18या प्रमाणे परमेश्वराने सीनाय पर्वतावर मोशेबरोबर आपले बोलणे संपविले व मग त्याने आपल्या बोटांनी लिहिलेल्या दोन दगडी पाट्यांचे आज्ञापट त्याला दिले.



 <<  Exodus 31 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran