Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Exodus 24 >> 

1मग तो मोशेला म्हणाला, “तू, अहरोन, नादाब, अबीहू आणि इस्त्राएलांच्या वडिलापैकी सत्तरजण असे मिळून परमेश्वराकडे पर्वतावर चढून येऊन त्याला दुरुनच नमन करा;

2मग मोशे एकट्यानेच परमेश्वराजवळ यावे; इतरांनी जवळ येऊ नये, आणि इतर लोकांनी तर पर्वत चढून वरही येऊ नये.”

3मोशेने लोकांना परमेश्वराचे सर्व नियम व आज्ञा सांगितल्या; मग सर्व लोक एका आवाजात म्हणाले, “परमेश्वराने जी वचने सांगितलेली त्या सर्वाप्रमाणे आम्ही करू.”

4तेव्हा मोशेने परमेश्वराची सर्व वचने लिहून काढली आणि पहाटेस उठून मोशेने पर्वताच्या पायथ्याशी एक वेदी बांधली व त्याने इस्त्राएलाच्या बारा वंशाप्रमाणे बारा स्तंभ उभे केले.

5मग मोशेने इस्त्राएल लोकांपैकी काही तरुणांना परमेश्वराला होमबली व बैलाची शांत्यर्पणे अर्पण करण्यास पाठवले.

6मोशेने त्या अर्पणातून अर्धे रक्त घेऊन कटोऱ्यात ठेवले आणि अर्धे रक्त त्याने वेदीवर शिंपडले.

7मग मोशेने कराराचे पुस्तक घेऊन लोकांना वाचून दाखविले आणि ते ऐकून लोक म्हणाले, परमेश्वराने सांगितले आहे तसे करू आणि त्याने दिलेल्या आज्ञा आम्ही पाळू.

8मग मोशेने रक्त घेऊन व लोकांवर शिपडले, तो म्हणाला, “परमेश्वराने तुमच्याशी ह्या वचनाप्रमाणे करार केला आहे असे हे त्याचे रक्त आहे ”

9नंतर मोशे, अहरोन, नादाब, अबीहू व इस्त्राएल लोकांमधील सत्तर वडीलधारी माणसे पर्वतावर चढून गेले.

10तेथे त्यांनी इस्त्राएलाच्या देवाला पाहिले; इंद्रनीलमण्यांच्या चौथऱ्यासारखे तेथे काही होते, ते आकाशाप्रमाणे स्वच्छ होते

11इस्त्राएलातील वडिलधाऱ्या माणसांनी देवाला पाहिले परंतु त्याने त्यांचा नाश केला नाही. मग त्यांनी तेथे एकत्र खाणेपिणे केले.

12परमेश्वर मोशेला म्हणाला, “पर्वतावर मला भेटावयास ये; मी दोन दगडी पाट्यांवर इस्त्राएल लोकांच्या शिक्षणासाठी नियम व आज्ञा लिहिलेल्या आहेत; त्या मी तुला देतो.”

13तेव्हा मोशे व त्याचा मदतनीस यहोशवा हे उठले आणि मोशे देवाच्या पर्वतावर चढून गेला.

14मोशे इस्त्राएलांच्या वडीलांस म्हणाला आम्ही तुमच्याकडे परत येईपर्यत तुम्ही येथेच थांबा, मी परत येईपर्यत अहरोन व हूर हे तुमच्याबरोबर आहेत; कोणाचे काही प्रकरण असेल तर त्याने त्यांच्याकडे जावे.

15मग मोशे पर्वतावर चढून गेला आणि ढगाने पर्वत झाकून टाकला;

16परमेश्वराचे तेज सीनाय पर्वतावर उतरले; ढगाने सहा दिवस पर्वताला झाकून टाकले; सातव्या दिवशी परमेश्वराने मोशेला हाक मारली.

17इस्त्राएल लोकांना पर्वताच्या शिखरावर परमेश्वराचे तेज भस्म करणाऱ्या धगधगत्या अग्नीसारखे दिसत होते.

18मोशे पर्वतावर चढून आणखी वर ढगात गेला; मोशे चाळीस दिवस व चाळीस रात्र तेथे होता.



 <<  Exodus 24 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran