Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Judges 13 >> 

1तेव्हा इस्त्राएलाच्या लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने परत वाईट केले, यास्तव परमेश्वराने पलिष्ट्यांना त्यांच्यावर चाळीस वर्षे राज्य करण्याची परवानगी दिली.

2तेव्हा सरा येथला दानांच्या कुळाचा कोणी माणूस होता; त्याचे नाव तर मानोहा, आणि त्याची स्त्री वांझ होती, यास्तव तिला लेकरू झाले नव्हते.

3तेव्हा परमेश्वराच्या दूताने त्या स्त्रीला दर्शन दिले, आणि तिला म्हटले, पाहा, आता तू गरोदर राहण्यास असमर्थ होती आणि म्हणून तू मुलाला जन्म देऊ शकली नाही, परंतु तू गरोदर होऊन तू मुलाला जन्म देशील.

4आता तू काळजीपूर्वक राहा मद्य किंवा मादक द्रव्य पिऊ नको, आणि जे नियमाप्रमाणे अशुध्द जाहीर केले ते अन्न खाऊ नको.

5पाहा, तू गरोदर होशील आणि तू मुलाला जन्म देशील आणि त्याच्या डोक्याचे केस कापण्यासाठी कधीही वस्ताऱ्याचा उपयोग करू नको, कारण की ते मूल गर्भावस्थेपासूनच देवाचा नाजीर होईल. आणि तो इस्त्राएलाला पलिष्टयांच्या अधिकारातून सोडवायास आरंभ करील.

6तेव्हा त्या स्त्रीने जाऊन आपल्या नवऱ्याला असे सांगितले की, देवाचा माणूस माझ्याजवळ आला, आणि त्याचे स्वरूप देवाच्या दूताच्या स्वरूपासारखे फार भयंकर होते; यास्तव तो कोठला. हे मी त्याला विचारले नाही, आणि त्याने आपले नांव मला सांगितले नाही.

7परंतु तो मला म्हणाला, पाहा, तू गरोदर होशील, आणि तू मुलाला जन्म देशील; तर आता तू दारू आणि मादक द्रव्य पिऊ नको आणि ते काही नियमाप्रमाणे अशुध्द जाहीर केले आहे ते अन्न खाऊ नको; कारण तो मुल तुझ्या गर्भस्थानापासून त्याच्या मरणापर्यंत देवाचा नाजीर होईल.

8तेव्हां मानोहाने परमेश्वराजवळ विनंती करीत म्हटले, हे माझ्या प्रभू, माझे ऐक, जो देवाचा माणूस तू पाठवला होता, त्याने आमच्याजवळ पुन्हा येऊन, आणि तो मूल जन्मेल, त्यासाठी आम्ही काय करावे, हे आम्हास शिकवावे.

9तेव्हा देवाने मानोहाचा शब्द ऐकला, यास्तव देवाचा दूत त्या बाईजवळ ती शेतात बसली असता पुन्हा आला तिचा नवरा मानोहा तिच्या बरोबर नव्हता.

10तेव्हा ती बाई त्वरीत पळाली आणि आपल्या नवऱ्याला म्हणाली, पाहा, जो पुरूष त्या दिवशी माझ्याजवळ आला होता, तो माझ्या दृष्टीस पडला आहे.

11मग मानोहा उठून आपल्या बायकोच्यामागे चालून त्या पुरूषाजवळ गेला, आणि त्याला बोलला, जो पुरुष माझ्या बायको बरोबर बोलला होता, तो तूच आहेस काय? तेव्हा तो बोलला, मी आहे.

12मग मानोहा बोलला, आता तुझे शब्द खरे ठरो; परंतु त्या मुलासाठी काय नियम ठरवले आहेत आणि त्याचे काम काय असेल?

13तेव्हा परमेश्वराच्या दूताने मानोहाला म्हटले, जे मी या बाईला सांगितले, त्या विषयी हिने काळजी पूर्वक राहावे.

14द्राक्ष वेलापासून जे येते ते काहीही त्यातले हिने खाऊ नये, आणि दारू व मादक द्रव्य पिऊ नये, आणि जे नियमाप्रमाणे काही अशुध्द जाहीर केले आहे ते खाऊ नये; जे सर्व मी तिला आज्ञापिले त्याचे तिने पालन करावे.

15तेव्हा मानोहा परमेश्वराच्या दूताला म्हणाला, आम्ही तुला विनंती करतो थोडा वेळ थांब, तुझ्यासाठी करडू तयार करण्यास आम्हाला वेळ दे,

16परंतु परमेश्वराचा दूत मानोहाला बोलला, जरी मी थांबलो तरी, मी तुझे अन्न खाणार नाही; परंतु जर तू होमार्पण करशील, तर ते तुला परमेश्वर देवाला अर्पण करावे लागेल, (तेव्हा तो परमेश्वर देवाचा दूत होता, हे मानोहाला कळले नव्हते)

17मग मानोहाने परमेश्वराच्या दूताला म्हटले, तुझे नांव काय आहे, कारण की तुझे बोलणे खरे ठरल्यावर आम्ही तुझा आदर करू?

18तेव्हा परमेश्वराचा दूत त्याला म्हणाला, तू माझे नांव कशासाठी विचारतोस? ते आश्र्चर्यजनक आहे.

19मग मानोहाने करडू घेऊन खडकावर परमेश्वराला होमार्पण आणि अन्नार्पण केले; तेव्हा मानोहा व त्याची बायको पाहत असता, त्याने आश्चर्याचे काम केले.

20जेव्हा अग्नी वेदीवरून आकाशात चढला, तेव्हा परमेश्वराचा दूत त्या वेदीच्या अग्नीत चढला, आणि मानोहा व त्याची बायको यांनी पाहिले आणि आपली तोंडे भूमीस लावून नमन केले.

21मग परमेश्वराचा दूत मानोहाच्या व त्याच्या बायकोच्या दृष्टीस फिरून पडला नाही; तेव्हा मानोहाला कळले की तो परमेश्वराचा दूत होता.

22मग मानोहा आपल्या बायकोला म्हणाला, आपण खचीत मरू, का तर आपण देवाला पाहीले आहे.

23तेव्हा त्याची बायको त्याला म्हणाली, जर परमेश्वर देवाने आम्हास जिवे मारायास इच्छिले असते, तर त्याने आमच्या हातांतून होमार्पण व अन्नार्पण स्विकारले नसते, आणि ह्या सर्व गोष्टी आम्हास दाखवल्या नसत्या, आणि या वेळेच्या सारखे वर्त्तमान आम्हास कळवले नसते.

24नंतर त्या बाईला मुलगा झाला, आणि तिने त्याचे नाव शमशोन ठेवले; ते मुल वाढत गेले, आणि परमेश्वराने त्याला आशीर्वाद दिला.

25तेव्हा सरा व अष्टावोल यांच्या मध्यभागी दानाच्या छावणीत त्याला परमेश्वराचा आत्मा प्रेरणा करू लागला.



 <<  Judges 13 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran